वसईच्या महा ई सेवा केंद्रातून दिले जातात बोगस दाखले

वसई (प्रतिनिधी) : ऑटोरिक्षा परवाने मिळवण्यासाठी वसईच्या महा ई सेवा केंद्रातून बोगस दाखले दिले जात असल्याचे नायब तहसिलदारांनी उघडकिस आणले असून, याप्रकरणी १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ऑटोरिक्षा परवाने खुले करून त्यांसाठी महाराष्ट्रात १५ वर्षांचे वास्तव्य आवश्यक असल्याची अट घालण्यात आल्यामुळे हजारो परप्रांतिय अडचणीत आले होते.या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी मोठया प्रमाणात बोगस रहिवासी दाखले तयार केले आहेत.या कामी त्यांना महा ई सेवा केंद्राने मदत केल्याचे उघडकिस आले आहे. नायब तहसिलदार प्रदिप मुकणे यांच्या चाणाक्षपणामुळे हा प्रकार उघडकिस आला आहे.

वकील राईन नावाच्या इसमाने रहिवास दाखला मिळवण्यासाठी तहसिलदार कचेरीत अर्ज केला होता.त्यासाठी त्याने आगाशी येथील एका नामांकित शाळेचा दाखला जोडला होता. या दाखल्यांची कागदपत्रे तपासताना,नायब तहसिलदार प्रदिप मुकणे यांना शाळेच्या दाखल्याचा संशय आला.त्यांनी सदर शाळेत चौकशी केली असता,सदरचा दाखल शाळेने दिला नसल्याचे तसेच या नावाचा विद्यार्थी शाळेत कधीही नसल्याचे व्यवस्थापनाने त्यांना कळवले.त्यानंतर ९ जणांनी रहिवास दाखला मिळवण्यासाठी याच शाळेचे दाखले जोडल्याचे मुकणे यांच्या निदर्शनास आले.

त्यांची सखोल पडताळणी केल्यावर शाळेचे हे सर्व दाखले वसईत महा ई सेवा केंद्र चालवणाऱ्या संदीप कवळे याने दिल्याचे निष्पन्न झाले.कवळेच्या केंद्रामार्फत वय आणि राष्ट्रीय अधिवास दाखलेही दिल्याचे उघडकिस आल्यामुळे मुकणे यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.त्या अनुषंगाने निलेश वर्मा,अशोक कनोजिया,नरेंद्र सिंग,सुशीलकुमार गुप्ता,विमल तिवारी,रफिक साहील,पारसनाथ यादव, श्रीराम वर्मा, गिरीजाशंकर दुबे आणि संदीप कवळी यांच्या विरोधात ४२०, ४६७, ४६८, ४७१ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.तसेच या कवळी यांच्या एजन्सीचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे मुकणे यांनी सांगतिले.

तर सावधगिरीचा उपाय म्हणून आम्हीही दाखल्यांची सखोल तपासणी करीत असतो. संशयास्पद असलेले दाखले तहसिलदारांकडे खात्रीसाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन निरिक्षक अनिल पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!