वसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे – माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस

वसई (प्रतिनीधी) : समाजवादी विचारसरणीचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते व वसईचे माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस यांचा ९० वा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या दीर्घ काळच्या जनसेवेचा आढावा घेणारा ” “सहकारधुरीण” या गौरवग्रंथाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रेव्ह.फा.बर्नड भंडारी सभागृहात झालेल्या या गौरवसोहळ्याचे अध्यक्षस्थान रे.फा.कार्बोल मच्याडो यांनी भूषविले. जनता दलाचे प्रदेश युवक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी महापौर प्रवीण शेट्टी,साधना पतसंस्थेचे चेअरमन अशोक कोलासो आणि वयाची नव्वदी पार करणारे गौरवमुर्ती डॉमिनिक घोन्साल्विस हे मान्यवर या वेळी सजविण्यात आलेल्या व्यासपीठावर होते.

नाथाभाऊ शेवाळे यांनी आपल्या भाषणात आपण लहान वयातच घोन्साल्विस यांचा आशिर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले आहेत.त्यांच्या कार्यशैलीचा माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी लाभच झाला आहे. विशेषतः सहकार क्षेत्रात, पक्षसंघटनेत आपले काम अधिक प्रभावी कसे करावे हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आज ते वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. शतक पार करण्यासाठी परमेश्वराने त्यांना असेच उत्तम आरोग्य द्यावे ही आमची प्रार्थना, असे विचार मांडले.

राजीव पाटील यांनी डॉमिनिक घोन्साल्विस यांच्या परखडपणे आपले विचार व्यक्त करण्याच्या स्वभावाचे कौतुक केले. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर सर्वाधिक व टोकदार शब्दात टीका करणारे स्पष्टवक्ते जेव्हा जेव्हा आम्ही चांगले काम केले, लोकोपयोगी उपक्रम राबविले तेव्हा तेव्हा ते आमचे कौतुक व अभिनंदन करायला कधीच विसरले नाहीत. कृषी आणि सहकार हे त्यांचे आवडते क्षेत्र. आयुष्यभर त्यांनी समाजाला व सहकार चळवळीला बळ दिले. वसई तालुक्यात त्यांनी केलेल्या विकास कामांचे महत्त्व आपण जाणून आहोत.त्यांच्या मार्गदर्शनाची या तालुक्याला गरज आहे. असे मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मत न देणारेही मित्र असतात….. बबनशेठ नाईक.
डाॅमनिक घोन्साल्विस आणि आम्ही एकमेकांना मत न देणारे मित्र आहोत. पक्ष आणि विचारसरणी वेगळी असली तरी
वसईकर म्हणून आम्ही एक आहोत. स्व.स.गो.वर्टी, पंढरीनाथ चौधरी आणि डॉमिनिक घोन्साल्विस अशी थोर माणसं या तालुक्याला लाभली म्हणून इकडे राजकारणाचा दर्जा उंच राहिला आहे. अशा भावना ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केल्या.

रे.फा.कार्बोल मच्याडो यांनी आशिर्वाद आणि सदिच्छा देत प्रार्थना केली. आम.हितेंद्र ठाकूर यांच्या शुभेच्छा पत्राचे आणि डाॅमनिक घोन्साल्विस यांना प्रदान करण्यात आलेल्या “मानपत्राचे” वाचन स्टॅन्ली घोन्साल्विस यांनी केले. स्टॅन्ली आल्मेडा, नाजरेथ कुटिन्हो, जयश्री सामंत, युरी घोन्साल्विस, शेखर धुरी अशा विविध पक्षपदाधिकाऱ्यांची सुद्धा शुभेच्छा देणारी भाषणे झाली. गौरवमुर्ती डॉमिनिक घोन्साल्विस यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या कार्यकाळात साथ देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि एवढा मोठा सोहळा, गौरवग्रंथ, मानपत्र, आणि मान्यवरांना एकत्र आणणे हे सध्याच्या परिस्थितीत आव्हान असलेले काम ज्या गौरव समितीने नीट पार पाडले आहे. हे समाधान नव्वदी पार करताना मला देणाऱ्यांनी मला नवी उमेद सुद्धा दिली आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की अजून खूप काही करायचे आहे आपल्याला. प्रामुख्याने वसईचे एकूण वैभव आणि निसर्ग सौंदर्य याचे जतन करण्यासाठी आपण सारे असेच एकोप्याने काम या पुढेही करत राहू. स.गो.वर्टी सर,साथी पंढरीनाथ चौधरी यांच्या विचारांचा सार असा आहे की प्रत्येक वेळी संघर्ष नको असतो, मन मोकळा संवाद हवा असतो. संवादाने मार्ग निघतात. आपण तेच करु. मला कधीही बोलवा ,जनहिताचे
काम सांगा, समस्या सांगा मी पूर्वी सारखाच तयार आहे. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सभागृहात टाळ्यांचा आवाज घुमला.


या सोहळ्यात डाॅमनिक घोन्साल्विस यांचा मोठा परिवार सहभागी झाला होता. ज्येष्ठ नेते व माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी, नितीन राऊत, भरत गुप्ता, सभापती संजय म्हात्रे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, प्रा.द.वि.मणेरीकर, नारायण नाईक, फाद.मिरांडा लोपीस आदी मान्यवरही या विशेष गौरव सोहळ्यात उपस्थित होते.
अशोक कोलासो यांनी प्रास्ताविक केले. गाॅडफ्रे कोरिया आणि भारती अथाईत यांनी सूत्रसंचालन केले. रोहन घोन्साल्विस यांनी आभारप्रदर्शन केले. पसायदान गायनाने या सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!