वसईतील पुस्तक प्रदर्शन व सवलतीच्या पुस्तक विक्री उपक्रमाचे वीणा गवाणकरांच्या हस्ते उद्घाटन

वसई (वार्ताहर) : येथील ‘ध्यास’ सामाजिक संस्था, दादरचे आयडियल आणि अजब डिस्ट्रीब्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शन व त्यांच्या सवलतीत विक्री उपक्रमाचे उद्घाटन
ज्येष्ठ साहित्यिका सौ.वीणाताई गवाणकर यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी नरवीर चिमाजी मैदानासमोर झाले.
या प्रसंगी महापालिकेच्या आय विभागाच्या प्रभाग सभापती अ‍ॅड.प्राची कोलासो, माजी सभापती प्रविण शेट्टी, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, न्यु इंग्लिश स्कुलचे प्राचार्य माणिकराव दोतोंडे, नगरसेविका विद्या पाटील, चित्रकार सुभाष गोंधळे, माजी नगरसेवक अरुण चोरघे,  इ. मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वांनी पुन्हा पुस्तके आणि वाचनाकडे वळणे गरजेचे असून, ग्रंथांशी मैत्री केली पाहिजे. मोठे प्रकाशक मुंबई व अन्यत्र अश्या सवलत योजना राबवत असतात. या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाच्या माध्यमातून वसईकरांच्या दारात ही सवलतीच्या दरातील पुस्तकांची पर्वणी आलेली असून, तिचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन वीणाताई गवाणकर यांनी उदघाट्न प्रसंगी केले.
दि.१५ फेब्रुवारी पर्यंत चालणार असलेल्या या उपक्रमात रु. १०० पासून ६०० पर्यंत किंमतीचे कोणतेही पुस्तक सवलतीमध्ये केवळ रु. ७० मध्ये उपलब्ध करून दिलेले असून, तसेच दोन पुस्तके खरेदी करणारास एक अन्य पुस्तक भेट म्हणून मोफत देण्यात येत असल्याचेही ‘ध्यास’च्या अध्यक्षा सौ.किर्ती शेंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थेचे सचिव वासुदेव फलटणकर आणि अजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष देवदास साटम यांनी केले. यशवंत कुलकर्णी, आशिष जगताप, सुरेखा कुलकर्णी, सुषमा सरफळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!