वसईतील भव्य ‘मिसळ महोत्सवात’ वसईकरांची तुफान गर्दी

तीन दिवसात बावीस हजार खवय्यांनी मिसळ चाखली

वसई (प्रतिनिधी) : नवघर- माणिकपूर शहर व आराध्य फौंडेशनच्या माध्यमातून वसईमध्ये भव्य स्वरूपात मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर, उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर ,एड.साधना धुरी, वृत्तनिवेदक कल्पेश हडकर, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, माजी नगरसेवक छोटू आनंद , शहरप्रमुख राजाराम बाबर , उपशहरप्रमुख सुधाकर रेडकर उपस्थित होते.या महोत्सवाचे आयोजन शिवसेनेचे नवघर माणिकपूर उपशहरप्रमूख मिलिंद चव्हाण यांनी केले.

वसईत पहिल्यांदाच अशा भव्य स्वरूपात मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.पार्वती सिनेमा मैदान, अंबाडी रोड ,वसई पश्चिम येथे ११ जानेवारी ते १३ जानेवारी २०१९ पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत खव-य्यांना अस्सल मराठमोळ्या विविध प्रकारच्या मिसळ चाखायला मिळाले. शुक्रवारी पहिल्याच दिवशी पाच हजार तर शनिवारी आठ हजार वसईकरांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चवीची झणझणीत व चमचमीत मिसळ खायला गर्दी केली होती. रविवारी रात्री पर्यंत तीन दिवसात एकूण २२ हजार लोकांनी मिसळ चाखली.
 
मिसळ म्हणजे महाराष्ट्राची अस्सल चव. यात १२ मिसळ स्टाईल लावण्यात आले.बंबातली मिसळ, माठातली मिसळ, पुणे- कोल्हापूरची झकास मिसळ,पारनेरची झटकेदार मिसळ, नाशिकची मूग- मटकी मिसळ, ठाण्याची मामलेदार मिसळ, नांदेडची मिसळ, कणकवलीची मिसळ वडे, कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीबरोबर दांडगा पैलवान कट वडा आदि मिसळ एकाच ठिकाणी चाखायला मिळाले.
काळ्या रस्श्याची चमचमीत मिसळ व तांबड्या रस्श्याची झणझणीत मिसळ,हिरव्या रस्श्याची मिसळ,चुलीवरची गावरान मिसळ , पांढ-र्या रस्श्याची मिसळ, जैन मिसळ अशा अनेक स्वादात व  चवींमध्ये या मिसळ ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. मिसळ महोत्सवात महिलांच्या विविध साड्या, घरगुती मसाले, कटलरी, ज्वेलरी, व इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंचे स्टाॅल लावण्यात आले होते.
तिखट खाल्यानंतर कुछ मीठा हो जाए…..
 
झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर गोड खाण्यातील मौज अनुभवण्यासाठी गोड व थंड पदार्थ देखील या मिसळ महोत्सवात ठेवण्यात आले होते.
 
● गुरुचे मोकटेल्स 
● औरंगाबाद साबिर भाई पान 
● पनवेल खरवस  
● पुण्यातला बर्फाचा गोळा  
● फ्रूट सलाड    
 
आपल्या महाराष्ट्रात इतक्या प्रकारच्या मिसळ असतात ते या मिसळ महोत्सवातून समजले.प्रत्येक मिसळीची चव वेगवेगळी व अप्रतिम  आहे.रेसिपी मिळाली तर घरी बनवण्याचा प्रयत्न करणार.शिवसेनेकडून पुढील वर्षीही याचे आयोजन करण्यात यावे.– भक्ती म्हात्रे,मिसळ महोत्सवात सहभागी गृहिणी
 

वसईत एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ खवय्यांना उपलब्ध करून देण्याचा आमचा एक प्रयत्न होता.त्याला मोठा प्रतिसाद लाभतो आहे.दरवर्षी असा महोत्सव भरविणार. – मिलिंद चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमूख व महोत्सवाचे आयोजक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!