वसईतील विज समस्येसाठी सत्ताधारी रस्त्यावर

वसई (वार्ताहर) : दिवसेंदिवस उग्र होत चाललेल्या वसई तालु्यातील विज समस्येवर उपाय योजना करण्यासाठी अखेर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले.आज सकाळी महापौरांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नी धारेवर धरण्यात आले.

वारंवार विज पुरवठा खंडीत होणे,विज चोरीचा भार सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारणे,मुदतीनंतर बिले पाठवून दंडाची वसुली करणे,भरमासाठ बिले आकारणे, नोटीस न देता मिटर काढून नेणे,नेहमी ट्रान्सफार्मर जळणे, कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उध्दट वागणूक देणे अशा प्रकारामुळे वसई तालु्यातील नागरिक हैराण झाले आहे.महावितरणाच्या या बेताल वागणूकीमुळे कंपन्यांना कोटयावधी रुपयांचा फटका बसला आहे. विजेच्या लहरीमुळे त्यांच्या उत्पादनात घट होवून तोटा सहन करावा लागत आहे.वारंवार सुचना करूनही महावितरणाच्या कारभारामुळे सुधारणा होत नसल्यामुळे अखेर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला रस्त्यावर उतरावे लागले.

महापौर रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी 12 वाजता महावितरणाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.माजी महापौर नारायण मानकर,माजी उपमहापौर उमेश नाईक,स्थायी समितीचे सभापती सुदेश चौधरी, सभापती निलेश देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवक आणि सभापती या मोर्च्यात सहभागी झाले होते.अधिक्षक अभियंते अगरवाल यांना सुरवातीलाच घेराव घालून एकूण प्रकाराचा जाब विचारण्यात आला.महावितरणाची विज जाते आणि नागरिक महापालिकेला जबाबदार धरतात,लोकसभेत पराभव झाल्यामुळे मुद्दाम विज घालवण्यात येते अशी लोकांमध्ये चर्चा केली जात असल्याचे यावेळी नमुद करण्यात आले.त्यावर ताबडतोब तोडगा काढण्याचे आश्वासन आगरवाल यांनी दिले.तर महावितरणाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आघाडीकडून देण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!