वसईतील स्थानिक पण सध्या परदेशात राहणाऱ्या कुटुंबांना वसई किल्ल्याचे कुतूहल व ओढ कायम

दिनांक २५ डिसेंबर २०१८ मंगळवार रोजी वसईतील स्थानिक पण सध्या अमेरिकेतील शिकागो व लंडन येथे राहणाऱ्या वर्तक चौधरी कुटुंबातील इतिहास प्रेमींसाठी जंजिरे वसई किल्ला इतिहास सफर आयोजित करण्यात आलेली होती. या मोहिमेत एकूण ११ कुटुंबीयांनी सहभाग नोंदवला. वसई किल्ल्यातील वास्तू विशेषांची माहिती देण्यासाठी किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक श्री श्रीदत्त राऊत उपस्थित होते. सकाळी ठीक ८ वाजता सदर अभ्यास मोहिमेस किल्ल्यातून सुरुवात झाली. सकाळी ८ ते ११ यावेळेत सहभागी मान्यवरांनी चिमाजी आपा स्मारक, डॉमिनिकन चर्च, श्री वज्रेश्वरी मंदीर, सेनेट हाऊस, साखर कारखाना, बालेकिल्ला, दर्या दरवाजा इत्यादी वास्तू विशेषाची माहिती घेतली.

वसई किल्ल्यातील वास्तू वैभवाचा प्राचीन इतिहास, बांधणी, संवर्धन गरज, गतवैभव इत्यादी बाबत आजही अनेक कुटूंबाना कुतूहल व आकर्षण आहे. किल्ले वसई मोहीम अंतर्गत आयोजित या इतिहास मार्गदर्शन सफरीत दुर्गमित्रांच्या सक्रिय सहभागातून संवर्धनासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे सहभागी व्यक्तींनी कौतुक केले. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांची आज ५४१ वी इतिहास अभ्यास सफर होती. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात शालेय प्रतिनिधी सोबतच आता अनेक स्थानिक कुटुंबातील व्यक्ती केवळ मौजमजा म्हणून किल्ला फिरणे हा उद्देश मागे सारून इतिहास अभ्यास सफर होणे आवश्यक आहे याबाबत जागृत झालेले समाधानकारक चित्र दिसत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या समारोपात सौ. वंदना विकास वर्तक यांनी दुर्गमित्रांचे आभार मानले.

किल्ले वसई मोहिमेचे संवर्धन प्रमुख श्री आतिष पाटील यांच्या मते “जंजिरे वसई किल्ल्यातील स्थानिक जागृती व कुतूहल यात समाधानकारक बदल झालेला असून पुरातत्व विभागाने याबाबत अधिक सतर्कता दाखवून किल्ल्याचे पावित्र्य जपले पाहिजे.”
किल्ले वसई मोहिमेचे दुर्गमित्र श्री जयदीप चौधरी यांच्या मते “वसईतील स्थानिक पण सध्या नोकरी, व्यवसाय, अभ्यास इत्यादी निमित्ताने बाहेर गेलेल्या अनेक कुटुंबातील व्यक्तींना किल्ल्याविषयी असलेले कुतूहल कायम असून किल्ले वसई मोहीम अंतर्गत स्थानिक कुटुंबातील व्यक्तींसाठी सातत्याने इतिहास अभ्यास सफरी सुरू करण्यात येतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!