वसईत अनधिकृत शाळेच्या संस्थाचालकाकडून जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दमदाटी

वसई (वार्ताहर) : वसई पूर्वेच्या वागराळपाडा, राजावली परिसरात एका अनधिकृत शाळेच्या तपासणीसाठी गेलेल्या पालघर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी आणि वसईच्या महिला गटशिक्षण अधिकाऱ्यास तपासणी दरम्यान शाळेची कागदपत्रे न दाखवता, उलट उद्धटपणे बोलून अंगावर धावून येत दमदाटी केल्याची, तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची घटना घडली. या प्रकरणी शाळेच्या संस्थाचालका विरोधात वालीव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अद्याप चौकशी सुरु असल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
वसई तालुक्यातील अनधिकृत शाळेंची तपासणी सुरु असून, त्या अंतर्गत काही शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी वसई पूर्वेच्या वागराळपाडा, राजावली परिसरातील बी के यादव हायस्कुलची तपासणी करण्यासाठी पालघर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी माधव मते, कृष्णा जाधव आणि वसईच्या महिला गटशिक्षण अधिकारी सौ माधवी तांडेल गेले होते.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या या शिष्ठमंडळास याठिकाणी इ. १ली ते ५ वी पर्यंत हिंदी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा चालविण्यात येत असून, मात्र तीन वर्गांवर केवळ दहावी आणि बारावी शिकलेले आणि बी एड. , डी एड. अशी आवश्यक पात्रता नसलेल्या व्यक्ती विध्यार्थ्यांना शिकवत असल्याचे दिसून आले.
तसेच शाळेतील कॉम्पुटर लॅब जून महिन्यापासून बंद असल्याचे आणि विज्ञान विषयासाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळा येथे अस्थित्वात नसल्याचे या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यावेळी उपस्थित शाळेचे विश्वस्थ यादव यांना तपासणी दरम्यान शाळेची परवानगी विषयक कागदपत्रे मागितली असता त्यांनी कागदपत्रे न दाखवता, उलट उद्धटपणे बोलून अंगावर धावून येत, दमदाटी केल्याची, तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार या प्रकरणी शाळेच्या संस्थाचालका विरोधात वालीव पोलिसांत  दाखल करण्यात आली असल्याचे पालघर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी माधव मते यांनी सांगितले. या प्रकरणी अदखलपात्र तक्रार नोंदली असून, अद्याप चौकशी सुरु असल्याने गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती वालीव पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!