वसईत गास चर्च प्रांगणात घुमले प्राचीन सामवेदी लोकगीतांचे सूर !

वसई (प्रतिनिधी) : आधुनिकतेच्या वावटळीत सर्वत्र पारंपारिक लोकगीते नष्ट होत असताना सेंट गोन्सालो सणाच्या पार्श्वभूमीवर वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ व गास चर्च पॅरीश  यांनी गास चर्च मैदान येथे रविवारी ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या सामवेदी कुपारी गीतसरगम या कार्यक्रमात प्राचीन सामवेदी लोकगीतांचे सूर पुन्हा एकदा घुमले.यावेळी उपस्थित रसिकांनी ताल धरत मनमुराद दाद दिली.
यावेळी उपस्थित रसिकांनी ताल धरत मनमुराद दाद दिली. यावेळी ‘रमेदाये आये, आईक माजा गराना ।’ या भक्तीगीतासह असंख्य भावगीते, संस्कृती लग्नगीते यांच्या पारंपारिक साजाने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला आणि हजारो उपस्थित  पारंपारिक लोकगीतांत अक्षरशः न्हाऊन गेला होता.
वसई म्हणजे संमिश्र संस्कृती व बोलीभाषांचे संमेलनच जणू .पुरातन काळापासून यज्ञ वा मंगलसमयी ऋचा गायन करणाऱ्या सामवेदी समाजात परंपरेने चालत आलेला लोकगीतांचा खूप मोठा ठेवा असून तो जतन करुन ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य सामवेदी ख्रिस्ती महिलांनी आजवर केलेले आहे. मात्र सामवेदी बोलीभाषेतील आंतरिक गोडव्याने भरलेली ही लोकगीते आज नष्ट होण्याच्या मार्गावर असून ती वाचवण्यासाठी कुपारी संस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन या संचिताचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने वसईत सामवेदीकुपारी  लोकगीतांचा सोहळा घडवून आणला.
या संगीतमय हृद्यसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी फादर ज्यो आल्मेडा, प्रमुख अतिथी केथॉलिक बॅंकेचे उपाध्यक्ष मॅन्युअल लोपीस, विशेष निमंत्रित एलायस डायस यांचा मंचावर विशेष सन्मान करण्यात आला. वसईतील प्रसिद्ध गायिका मोनिका तुस्कानो,  जेनिफर लोबो, आदींनी सादर केलेली, ‘जाई-जुईसॉ माडॉ रे..।’  ‘आले ग राती बाय…’ , ‘दुये सासऱ्या जात्या वँळे..’ ‘झोपाळ्यावर बैसू आपण.., ‘ अश्या सुश्राव्य लोकगीतांनी व त्या गीतांना स्ट्रिंग मेलोडीज ने दिलेल्या अनुरूप पारंपारिक संगीताच्या ठेक्यावर  उपस्थित सर्वांनीच अक्षरशः ताल धरला व नाच केला.
यावेळी गास गावातील महिला संघाने सादर केल्या पारंपारिक लोकगीतांना तसेच तेजल परेरा गास गर्ल्स ग्रुपने सादर केलेल्या धमाकेदार कुपारी डान्सला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यामुळे हा कार्यक्रम रंगत गेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ अध्यक्ष जिम (फिलीप) रॉड्रीग्ज तसा संस्कृती मंडळ कार्यकर्त्यांनी व गास चर्च पॅरीश कौन्सिल सदस्यांनी मेहनत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!