वसईत पुर येणारच – आयुक्त बी.जी.पवार

वसई (वार्ताहर) : यंदा वसई बुडणार का ? या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात वसईत पुर येणारच असे वक्तव्य करून वसई-विरार महापालिकेचे आयुक्त बी.जी.पवार यांनी खळबळ उडवून दिली आहे.

शनिवारी रात्री वसईत झालेल्या चर्चासत्रात पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक हरित वसईचा लढा उभारणारे मार्कुस डाबरे,पालिका आयुक्त बी.जी.पवार, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड सहभागी झाले होते. वसईत येणाऱ्यांना राहण्याची सोय आहे,इतकाच वसईचा विकास झाला आहे. पुर येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पाणथळ जागा विकासकाला विकली जात आहे. काँक्रीटच्या जंगलासाठी पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.त्यामुळे यंदाही वसई बुडणारच अशी टिका यावेळी समीर वर्तक यांनी केली.नैर्सगिक नाले शोधून काढून त्यांची सफाई करा,नाल्यांच्या सभोवतालचा प्रदेश नो. डेव्हलपमेंट झोन जाहीर करा. तरच वसई बुडणार नाही.असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

तर जमीनीत पाणी मुरण्याची क्षमता संपली आहे. त्यातच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावण्यात आले आहेत.त्यामुळे वसई वाचवणे आता गरजेचे झाले आहे.याला नगरविकास खाते जबाबदार असल्याचे मार्कुस डाबरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या चर्चासत्रानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना महापालिकेद्वारे उत्तरे देण्यात आली. वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसाच्या एक तृतीयांश पाऊस गेल्या वर्षी ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत पडला. त्यामुळे वसईत पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा आम्ही त्यावर बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत.रेल्वे क्रॉसींगजवळ ४ कल्वर्ट, महामार्गावर ३ कल्वर्ट बांधण्यात येत आहेत. पुराचे पाणी समुद्राला जावून मिळण्यासाठी चिखलडोंगरे,नारिंगी येथील खारभुमीच्या उघाडया मोठया करण्यात येत आहेत.त्यामुळे यंदा वसई बुडणार नाही असा दावा अभियंते लाड यांनी यावेळी केला.

तर वसईत पुर येईल असे वक्तव्य करून पालिका आयुक्त बी.जी.पवार यांनी खळबळ उडवून दिली होती.मात्र,पुर येईल पण तो कोणाच्या घरात शिरणार नाही.तो आपल्या मार्गाने निघून जाईल.आम्ही तशी तयारी केली आहे.असे पुढे सांगून त्यांनी वसईकरांना दिलासा दिला.वसईत नालेसफाई,येणारे माणसांचे लोंढे आणि अनधिकृत बांधकामे या तीन प्रमुख समस्या आहेत.त्यातील नाले सफाई सुरु आहे.अनधिकृत बांधकामे टप्प्या टप्प्याने जमीनदोस्त केली जातील.असे त्यांनी स्पष्ट केले.सीआर झेड आणि नाल्यांमधील मोठी झाडे नालेसफाई करताना अडथळा ठरत होती.असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे गोंधळ झाला होता.त्यामुळे गोंधळ थांबवता का,की हे चर्चासत्र बंद करून आम्ही निघून जाऊ असे विधान उपमहापौर रॉड्रीग्ज यांनी केल्यामुळे नागरिक संतप्त झाले होते.रॉड्रीग्ज यांना चर्चासत्र थांबवण्याचा अधिकार काय,त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आल्यामुळे सत्रातील वातावरण तप्त झाले होते.मात्र,काहीवेळानंतर सत्र मार्गी लागले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!