वसईत ब्लॅक पोपच्या आगमनाची जय्यत तयारी

वसई (प्रतिनिधी): रोम येथील जेज्वीट पंथांचे सर्वोच्च प्रमुख ज्यांना ख्रिस्ती विश्वात ब्लॅक पोप म्हणून संबोधले जाते, त्या फादर अर्तुरो सोसा ह्यांचे रविवार ३ मार्च २०१९ रोजी सकाळी ८ वाजता माणिकपूर येथील संत मायकल चर्च येथे आगमन होत आहे. जगातले शक्तिशाली धर्मगुरू म्हणून ओळख असलेले फादर अर्तुरो सोसा हे मुळचे व्हेनेझुएला येथले असून १४ ऑक्टोंबर २०१६ रोजी त्यांची ह्या सर्वोच्च पदावर नियुक्ती झालेली होती.

राज्यशास्त्राचे अभ्यासक असलेले फादर सोसा यांनी विद्यापीठात ह्या विषयाचे अध्यापन केलेले असून स्पॅनीश भाषे बरोबरच इंग्रजी, फेंच,लॅटीन आदि भाषेवर त्यांचे प्रभूत्व आहे. माणिकपूर चर्चतर्फे फादर सोसा ह्याच्या स्वागताची जय्यत तयारी चालू असून वेगवेगळया समिती मागील महिन्याभरापासून कार्यरत आहेत. सकाळी ९:३० वा. माणिकपूर चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आले असून यावेळी उपस्थित भाविकांना ते संदेश देणार आहेत. त्यानंतर जेज्वीट पंथाच्या चारशे वर्षाच्या प्रवासाचं दर्शन पथनाटयाद्वारे घडवण्यात येणार आहे. माणिकपूर चर्चच्या परिसरात बॅण्डच्या साथीने फादरांची मिरवणूक काढण्यात येणार असून भारतीय पध्दतीने त्यांची यावेळी खास ओवाळणी करण्यात येणार आहे. प्रखर बुध्दीवादी आणि क्रांतीकारी विचारांचे फादर सोसा हे त्यांच्या स्पष्ट विचाराबद्दल ओळखले जातात. मानवतेच्या कल्याणासाठी अश्य ते श्य करा आणि शांतीसाठी समेट करण्यासाठी मनुष्य समाजाला मदत करा ही त्यांची भूमिका आहे. माणुस म्हणून आपण एकमेकांना समजून घेतलं नाही तर देवाचं राज्य आपल्यामध्ये अस्तित्वातच येणार नाही त्यासाठी आधी आपण एकमेकांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे अन्यथा जगात शांतीचं राज्य प्रस्थापीत होणार नाही.

पर्यावरण रक्षणासंबंधी ते अतीशय जागरुक असून आपल्या प्रबोधनाद्वारे ते सातत्याने पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडत असतात;आपल्या मनोगतात ते म्हणतात निर्मात्या सृष्टीशी आपण समेट केला पाहिजे कारण आधीच ही पृथ्वी जखमी झालेली असून वेदनेने विव्हळत आहे. युध्द, हिंसा, ड्रग्ज आणि मानवी तस्करी ह्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना ते म्हणतात ह्या समस्यांनी मानवी अस्तित्वालाच नख लागलेले असून एक संवेदनशील व देवावर भीस्त ठेवणारा माणूस म्हणून आपली जबाबदारी जशी स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करणे आहे तसेच ह्या समस्येविरोधात प्रबोधन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा तुमची भुमिका तेथील स्थानिक प्रश्नांना भीडण्याची असावी. वसई येथील माणिकपूर, अंबाडी रोड व गोखिवरे येथे तसेच संपूर्ण तलासरी तालुक्यात जेज्वीट धर्मगुरू कार्यरत असून साधी राहणी, अपरिग्रह आणि उच्च विचारांची कास धरून समाजातील तळागाळातील जनतेच्या उन्नतीसाठी ते कार्यरत असतात.

आपल्या लोकांना भेटावं, त्यांच्याशी संवाद साधावा हाच ब्लॅक पोप यांच्या वसई भेटीचा उद्देश असून ह्या सोहळयांसाठी वसईतील भाविकांनी मोठया संख्येने हजर रहावे असे आवाहन माणिकपूर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर निलम लोपीस व फादर ज्यो. मा. पिठेकर यांनी केले आहे.

2 comments to “वसईत ब्लॅक पोपच्या आगमनाची जय्यत तयारी”
  1. वसई धर्म ग्रामात संत मायकल चर्च माणिकपूर येथे ब्लॅक पोपचे आगमन होत आहे ह्याची जयंत तयारी म्हणून मांडलेली प्रस्तावना फार सुंदर आहे.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!