वसईत भव्य कामगार मेळावा संपन्न

वसई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रदिन आणि कामगार दिनानिमित्ताने १ मे रोजी वसई शहरातून भव्य मिरवणूक काढून सयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि कामगार चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. वसईतील एस.टी कामगार संघटनेतर्फे कामगार नेते भरत पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यासाठी शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. बँडच्या साथीने हाती झेंडे आणि घोषणा देत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर संपन्न झालेल्या मेळाव्यासाठी कवी सायमन मार्टिन, प्रकाश कीर्तने,डॉमणिका डाबरे, दर्शना नामदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना भरत पेंढारी म्हणाले, राज्याच्या विकासात एस.टीचे अमुल्य योगदान आहे. आजही खेडयापाडयातील गोरगरीबांसाठी एसटी ही जीवनदायीनी असताना अलीकडच्या काही वर्षात एस.टी महामंडळाची जी लूट चालू आहे त्यामुळे राज्याचं न भरून येणारे नुकसान होत आहे. कामगार व कष्टकरी विरोधी नेतृत्व असल्यामुळे हजारो कामगारांच जगणं कठीण झालेलं आहे. युनीयन फोडण्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबले जात आहेत, पण साथी जॉर्ज फर्नांडीस, एस.एम.जोशी व नानासाहेब गोरे व भाऊ फाटक यांच्या विचाराचं अधिष्ठान लाभलेली चळवळ कुणालाही मोडीत काढता येणार नाही. वारकऱ्यांना जशी आमंत्रणाची गरज असते तशीच चळवळीतल्या कामगारांनी कुठल्याही हाकेविना लढण्यासाठी एकत्र यावं.

कवी सायमन मार्टिन आपल्या भाषणात म्हणाले,  हाती झेंडा आणि ओठावर घोषणा असलेला जमाव शहराला मृत्यूपासून वाचवत असतो. शहरदेखील आपल्या आवाजाची वाट पहात असते. कष्टकरी आणि कामगारांचं शहराला जिवंत ठेवत असतात. आपण जिवंत आहोत हे सिध्द करण्यासाठीच घोषणा द्यायच्या असतात. आपण जेव्हा आवाज बुलंद करतो तेव्हाच आपण भीतीपासून मुक्त होतो. या देशात अशी असंख्य माणसं आहेत, जी कायम भेदरलेली असतात. ते जेव्हा हाती मुक्तीचा झेंडा घेऊन जाणारा जमाव पाहतात तेव्हा त्यांना नवीन उमेद,उर्जा आणि शक्ती मिळते. कामगारच काय पण माणूस नष्ट करण्याची प्रक्रिया कायम चालू असते. अशा वेळेला घामाचा वास असलेले शब्दंच माणसाला जिवंत ठेवतील.

प्रकाश किर्तने आपल्या भाषणात कामगार चळवळीचा इतिहास कथन करून म्हणाले, सर्वसामान्यांना जगण्याची उमेद या चळवळीने दिलेली आहे. कुठल्याही हक्कासाठी आंदोलन करावेच लागते. मात्र त्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असते.

डॉमणिका डाबरे आपल्या भाषणात म्हणाल्या, जागृत कामगार ही वसईची ओळख आहे. येथील कामगार केवळ स्वत:साठीच नव्हे तर येथील पर्यावरण व माणूस रक्षणासाठी कायम योगदान देत असतात. म्हणूनच त्यांचे जीवन समृध्द झाले आहे. यावेळी हर्षद चुनेवाला, दर्शना नमदे यांची भाषणं झाली.

एस.टी महामंडळात प्रदीर्घकाळ सेवा दिलेले सिझर बरबोज व दिलीप नामदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. एस.टी कामगार संघटनेच्या कलापथकांनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने गाणी सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!