वसई इंडस्ट्रिअल एक्स्पोमध्ये दहशतवाद मुक्त व्यापार अभियानाची सुरुवात

१५,००० उत्पादन युनिटसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वसईतील प्रमुख असोसिएशन्सनी पाकिस्तानशी व्यापार न करण्याच्या अभियानावर केली स्वाक्षरी

वसई (प्रतिनिधी) : वसई येथे आयोजित वसई इंडस्ट्रिअल एक्स्पोच्या उद्धाटनाच्या दिवशी एक्झिकॉनने पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दहशतवादमुक्त व्यापार अभियानाची सुरुवात केली. सुमारे १५,००० उत्पादन युनिटसचा समावेश असलेल्या गोवालिस इंडस्ट्रीज असोसिएशन, वसई ट्रेडर्स असोसिएशन, वसई तालुका इंडस्ट्रीज फेडरेशन, वसई इंडस्ट्रीज असोसिएशन आणि एक्झिकॉन ग्रुप या औद्योगिक संघटनातर्फे या अभियानाला पाठिंबा दर्शविण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया अधोरेखित करण्यात आल्या. पाकिस्तानशी आर्थिक व्यवहार थांबविण्याचा या अभियानाचा हेतू आहे.

”वसई इंडस्ट्रिअल एक्स्पोतर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांसाठी वसई तालुका इंडस्ट्रीज फेडरेशनतर्फे आम्ही प्रशंसा करतो. आम्ही एक फेडरेशन म्हणून त्यांना नेहमीच सहकार्य करतो. वसईचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. रास्ता-रोको, रेल-रोको करून सामान्यांना वेठीला धरणे हा उपाय नाही. पाकिस्तानसोबत असलेले सर्व आर्थिक व्यवहार थांबवून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविषयी जगाला सांगण्यासाठी दहशतवाद मुक्त व्यापार ही सकारात्मक उपाययोजना आहे.”, असे वसई तालुका इंडस्ट्रीज फेडरेशनचे श्री. अशोक ग्रोव्हर म्हणाले.

एक्झिकॉन ग्रुपचे संस्थापक श्री. एमक्यू सय्यद म्हणाले, ”आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि या प्रदर्शनात सर्व संघटनांच्या पाठिंब्याने १५,००० उत्पादन युनिटससह आम्ही एका याचिकेवर स्वाक्षऱ्या करणार आहोत. या याचिकेनुसार पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे आयात-निर्यात व्यवहार करणार नाही, जेणेकरून पाकिस्तानला प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल आणि या माध्यमातून आम्ही आमचा निषेध व्यक्त करणार आहोत.”

श्री. सी. ए. ऍंटो (अध्यक्ष – गोवालीस इंडस्ट्रीज असोसिएशन) म्हणाले, ”भारताचा जी.डी.पी २ ट्रिलिअन आहे आणि पाकिस्तानच्या जीडीपी भारताच्या १/६ म्हणजेच ३०० अब्ज आहे. पाकिस्तानशी होणारा व्यापार अगदीच नगण्य आहे पण आपण निश्चितच एक सुरुवात करू शकतो. पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या चीनच्या जीडीपीवरही आपण परिणाम करू शकतो, जेणेकरून चीनला झालेल्या आर्थिक नुकसानामुळे त्यांनाही जाणीव होईल.”

वसई ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बिपीन खोकानी पुढे म्हणाले, ”पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्यात येणार नाही. आमचे सर्व सदस्य या स्वाक्षरी अभियानासाठी एकत्र आले आहेत.”

वसई इंडस्ट्रीजचे सचिव रामनिक पांचाल म्हणाले, ”वसईच्या व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच परिणाम होणार आहे. दहशतवाद मुक्त व्यापाराची सुरुवात करण्यासाठी वसई हे ‘टॉर्च बेअरस’ ठरतील. वसई हे महाराष्ट्रातील वेगाने प्रगती करणारे शहर आहे आणि भारतातील एक सर्वात मोठा औद्योगिक भाग आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रिकल, पेपर, पॅकेजिंग, औषधे, प्लास्टिक, रबर, अभियांत्रिकी,  कापड, लाकूड, काच व अन्नपदार्थ, ल्युमिनरीज,  एलईडी, सोलार, इलेक्ट्रॉनिक्स- आयटी, सुरक्षा व स्मार्ट सिटी सोल्युशन्स इत्यादी क्षेत्रातील  १५,०००+ उत्पादन युनिटस आहेत.”

एक्झिकॉनतर्फे आयोजित करण्यात आलेला वसई इंडस्ट्रिअल एक्स्पो हा उपक्रम एक्झिकॉनतर्फे एखाद्या विशिष्ट भागाचे वैशिष्टय अधोरेखित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला अजून एक उपक्रम आहे. वसई इंडस्ट्रिअल एक्स्पोचे चौथे पर्व १७ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वसई (पू) येथील हितेंद्र ठाकूर आप्पा मैदानाच्या २०,००० चौ. मी. क्षेत्रफळात आयोजित करण्यात आले आहे. वसई व ठाणे औद्योगिक पट्टयातील १७५ कंपन्यांना जागतिक बाजारपेठेशी परिचय करून देण्यासाठी या एक्स्पोच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम गोवालिस इंडस्ट्रीज असोसिएशन, एमएसीसीआयए, उद्यमी महाराष्ट्र,  व्हीआयए, पीएमएएल, एसएमई चेंबर ऑॅफ इंडिया, इमामिया चेंबर ऑॅफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्री, टीएसएसएआय आणि सीओएसआयए यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूकीचा प्रचार व मार्गदर्शन करण्यासाठी या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये इराणमधील जागतिक पातळीवरील प्रख्यात ऑॅटोमोबाइल कंपनीचे १० सदस्यांचे हाय-प्रोफाइल शिष्टमंडळ भेट देणार आहे. या एक्स्पोमध्ये मार्केटमधील नवीन आणि सध्या बाजारात असलेली औद्योगिक उत्पादने पाहायला मिळणार आहेत आणि नजीकच्या भविष्यात बाजारपेठेत उपलब्ध होऊ घातलेल्या औद्योगिक उत्पादनांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!