वसई जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी शैलेश पाटील यांची निवड

वसई (प्रतिनिधी) : महाराष्टातील सुप्रसिध्द वसई जनता सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी सोमवार दि.९.डिसेंबर रोजी निवडणूक अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था तामतलाव, वसई योगेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत बँकेचे संचालक मंडळ यांच्या एकमताने निवड झाली.

श्री.शैलेश पाटील हे गेल्या नऊ  वर्षांपासून वसई जनता सहकारी बँकेच्या संचालक पदावर असून त्यांचा सहकारी चळवळीशी  घनिष्ठ संबंध आहे. श्री.शैलेश पाटील हे भाईंदर येथील सुप्रसिध्द अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ ह्या संस्थेचे विश्वस्त असून सदर संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या ज्युनिअर कॉलेजचे ते अध्यक्ष आहेत. शैलेश पाटील ह्यांना सामाजिक कार्याची गोडी असून ते मिरा-भाईंदर नगरपालिका कार्यक्षेत्रात एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून सुपरिचित आहेत.  मिरा-भाईंदर नगरपालिकेच्या आरोग्य समितीचे ते माजी सभापती असून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून लक्षणीय काम केलेले आहे.

शैलेश पाटील ह्यांच्या एकमते झालेल्या निवडीसाठी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आशिर्वाद त्यांना लाभलेले आहेत. शैलेश पाटील ह्यांच्या बँकेच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीने बँकेच्या सर्व सभासदांनी तसेच भाईंदर पासून ते डहाणूपर्यंतच्या आग्री समाजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर पंचांग व तिथीने परिपूर्ण असलेली वसई जनता सहकारी बँकेची दिनदर्शिका २०२० चे अनावरण मा.उपनिबंधक सहकारी संस्था,तामतलाव,वसई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष यशवंत पाटील व माजी उपाध्यक्ष रामचंद्र राऊत हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!