वसई तालुक्यातील पाणजू वासियांचा आयुष्यभर बोटीने प्रवास

वसई, दि. १४ (वार्ताहर) : भाईंदर व नायगांव रेल्वे स्थानका दरम्यान असलेले बेटावरील चारी बाजूने पाण्याने वेढलेले असे पाणजू हे निसर्गरम्य असे गाव आहे. बोटीने प्रवास करणे हे पर्यटनासाठी चांगले वाटते, पण पाणजूवासियांच्या नशिबी मात्र आयुष्यभर बोटीने प्रवास लिहिला आहे. या गावात जाण्यासाठी नायगांव पश्‍चिम येथून बोट पकडावी लागते. कारण बोटीशिवाय पर्याय नाही. वसई तालुक्यातील जवळ-जवळ तीन हजार वस्तीचे गाव आहे. हे गाव पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीत आहे. त्यापासून जवळच असलेले नायगांव (पश्‍चिम) हे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दित येते. या गावामध्ये प्रामुख्याने आगरी कोळी समाजाची वस्ती आहे. या गावात वीज आहे, शाळा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पाणी आहे, पण या गावातील लोकांना ७० वर्ष झाली तरी अजून रस्ता नाही. 
या गावामध्ये निवडणुका आल्या की राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी रस्ता देण्याचे गाजर देत असते. मात्र त्यांचा पक्ष जिंकून आल्यावर रस्त्याच्या प्रश्‍नाकडे सपशेल पाठ फिरवतात. खासदार आणि आमदारांसह सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी एखादी दुर्घटना घडल्यावर या बेटावरील गावाला भेट देतात. गेली ७ दशके पाणजूवासीय बोटीने प्रवास करुन आपले आयुष्य जगत आहेत.
रस्त्याबाबतच्या शासकीय योजना फक्त कागदोपत्रीच रंगवल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. रेल्वेचा जुना पुल असाच अनेक वर्षांपासून धुळखात पडलेला आहे. तो जरी दुरुस्त करुन पाणजू भागासाठी पायउतार केल्यास कमी खर्चामध्ये वापरु शकतात, परंतु रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे हा पुल देखील धुळखात पडला आहे. पावसाळ्यामध्ये पाणजु गावातील रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन जुन्या रेल्वे पुलावरुन प्रवास करतात, परंतु कधी-कधी वादळवारे व रेल्वेच्या स्लीपरमधील अंदाज ‘न’ आल्यामुळे अनेक जण मृत्यूमुखी पडतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी बोटीमध्ये लग्नाची वरात जात असताना बोट उलटून काही जण दगावल्याची घटना देखील घडली आहे. अशा घटना घडल्यावर राजकीय प्रतिनिधी घटनास्थळी पोहचतात व रस्ता देण्याचे आश्‍वासन देतात, अशी आश्‍वासने अनेक वेळा देऊन झाली आहे. नायगांव ते भाईंदर पर्यंत नवीन पुल मंजुर देखील झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी देखील या प्रश्‍नाबाबत अनेक वेळा आवाज देखील उठवला, मात्र त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. इंटरनेटने आज जग जवळ आले आहे. दुर्गम भागात तसेच जंगलपट्टीत देखील रस्ते तयार होत आहेत, मात्र नायगांव व भाईंदर दरम्यान असलेल्या या बेटावर राहणार्‍या रहिवाशांच्या नशिबी मात्र आयुष्यभर बोटीने प्रवास करण्याचे लिहिले आहे. हे पाणजू वासीयांचे दुर्दैव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!