“वसई दुर्ग दीपोत्सवात” २१००० दिव्यांनी उजळला वसई चा किल्ला !

वसई : धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१००० मराठे हुतात्मा झाले. आपल्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला.  दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई-विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला मात्र अंधारात असतो. पूर्वापार अनेक स्थानिक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थावर व श्री नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करतात.

मराठा सैन्यामुळे व भारतीय जवानांमूळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी टीम “आमची वसई” ने दर वर्षी प्रमाणे वसई किल्ल्यात दिपोत्सव साजरी करण्याचे ठरविले.  दिपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून व रंगबेरंगी रांगोळ्या काढून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात आले. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, तटबंदीवर, सागरी दरवाज्याजवळ व नागेश महातिर्थावरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात आली. भव्य आकाश कंदिल उजळवण्यात आला. मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात व जय वज्राई-जय चिमाजी च्या जयघोषात अवघे वातावरण दुमदुमले होते.  आमची वसईच्या एकविरा लेझीम पथकाने व सुपराहिरोज मशाल पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळेस युवा कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने आमची वसई तर्फे रांगोळी व कंदील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. संदेश नायक व राहुल भांडारकर यांच्या मित्रपरिवाराने बासरी वादन व शौर्यगाथा गायन केले.
धर्मसभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी मंत्रोच्चारात दिपप्रज्वलन केले व मोहिमेस आशिर्वाद दिले. “२०५ वर्षांच्या जुलमी फिरंगी सत्तेला खणून काढण्यासाठी तीन वर्षांच्या दुर्धर संग्रामात २१००० मराठा सैन्य हुतात्मा झाले. या वीरभूमीवर त्यांच्या देशभक्तीचे स्मरण सर्व करत आहेत. त्यानिमित्त ही  वीरभूमी दिवाळीला प्रकाशाने उजळवण्यासाठी आमची वसई या सामाजिक संस्थेने आवाहन केले. विविध संस्था, विविध पक्ष कार्यकर्ते, थेट डहाणू ते ठाणे-मुंबई च्या हजारो सर्वधर्मीय राष्ट्रभक्तांनी २१००० पणत्या लावून हा भव्य दीपोत्सव साजरा केला आहे.” असे उद्गार त्यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!