वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळ करणार बारा साहित्यिकांना सन्मानित !

वसई (वार्ताहर) : वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यात ख्रिस्ती साहित्य मंडळातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘गार्डवेल साहित्य पुरस्कार ‘ वसईच्या भूमिकन्या प्रख्यात कवयित्री-लेखक डाॅ. सिसिलिया कार्व्हालो यांस सुप्रसिध्द कवयित्री-कथाकार नीरजा यांच्या शुभहस्ते शनिवार दि.२७ एप्रिल २०१९ रोजी लोकसेवा मंडळ सभागृह, बंगली येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे .
  वसईतील नंदाखाल येथील नामवंत उद्योजक गार्डवेल इंडस्ट्रीजचे संस्थापक स्व.अँथोनी लाॅरेन्स तुस्कानो यांच्या परिवाराने दिवंगत पित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘गार्डवेल साहित्य पुरस्कार’ स्थापिला असून वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाद्वारे तो प्रदान केला जातो.
  डाॅ. सिसिलिया कार्व्हालो जून २०१८ मध्ये सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त झाल्या. कवी, लेखक, साहित्यिक, संपादक, संशोधक, समीक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, अशा अनेकविध भूमिकेंतून साहित्यप्रवास करताना त्यांच्या हातून पस्तीसहून अधिक पुस्तकांची लेखन-निर्मिती झाली असून त्यांना तीन राज्यपुरस्कारांसह अन्य तीस राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
  वसईतील बहुतांश ख्रिस्तीजनांची मातृभाषा मराठी असून येथे कवी-लेखक, पत्रकार व कलावंतांची संख्या मोठी आहे. सदर कार्यक्रमात मंडळाने बारा साहित्यिकांना शाॅल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्याचे योजिले आहे.
  अलीकडे मंडळाने त्यांचे साहित्यिक कार्यक्षेत्र पालघर जिल्ह्यातील डहाणू-तलासरी तालुक्यातील दुर्गम भागांतील विद्यालयांपर्यंत विस्तारित केले आहे, अशी माहिती व.म.ख्रि.सा. मंडळाचे अध्यक्ष रेमंड मच्याडो यांनी दिली.
  वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळ गेली दहा वर्षे परिसरातील अनेक विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, तसेच प्रौढांसाठी विचारवंतांची प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करीत आले आहे. दि. ९ मे २०१९ रोजी ख्रिस्तीजन रेव्ह. ना.वा. टिळक यांची शंभरावी पुण्यतिथी पाळत आहेत, त्या निमित्ताने फादर टोनी जाॅर्ज, ये.सं. त्यांच्या जीवनावर भाष्य करतील. तसेच वसई किल्यात एक वर्ष वास्तव्य असलेले प्रसिध्द ख्रिस्तपुराणकार फादर स्टीफन्स ह्यांची चौथी पुण्यतिथी पाळली जात आहे. त्या निमित्ताने फादर राॅबर्ट डिसोझा श्रोत्यांस प्रबोधन करतील, असेही मच्याडो म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!