वसई विजयदिनातील जंजिरे वसई किल्ला अभ्यास सफरीत अभ्यासक, संशोधक यांचा सक्रिय सहभाग

वसई : वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने व वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८१ वा वसई विजयोत्सव दिनास दिनांक १८ मे २०१९ शनिवार बुध्दपोर्णिमा रोजी सुरुवात झाली. दिनांक १८ मे २०१९ शनिवार रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी  ७ वाजता श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा स्मारक येथून जंजिरे वसई किल्ला अभ्यास सफरीस सुरुवात झाली. गेली अनेक वर्षे सुरू असणारी जंजिरे वसई किल्ला संशोधनपर अभ्यास सफर स्थानिकांच्या कुतूहलाचा व जिव्हाळयाचा विषय ठरलेली आहे.

इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यास मोहिमेत पालघर मुंबई वसई राई डोंबिवली दादर भागातील एकूण ८४ दुर्गमित्र, अभ्यासक, स्थानिक नागरिक सहभागी झालेले होते. सदर अभ्यास सफरीचे उदघाटन उपमहापौर श्री प्रकाश रोड्रिंक्स व श्री संदेश जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून करण्यात आले. वाढत्या उन्हाळयाचा प्रभाव लक्षात घेता दरवेळी होणारी तब्बल १० तासांची इतिहास मार्गदर्शन सफर ६ तासांची करण्यात आलेली होती. यावेळी किल्ले वसई मोहीम परिवार, वसई एडव्हेंचर समूह, राई गाव दुर्गमित्र यांच्या प्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवला. सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत वसई किल्ल्यातील प्रमुख वास्तू घटकांचा ऐतिहासिक संदर्भानुसार व जुन्या छायाचित्रांनी आढावा घेण्यात आला. श्रीदत्त राऊत यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण वाणीतून वसई मोहिमेची गौरवगाथा व वास्तुविशेष अभ्यास सफर दुर्गमित्रांच्या कौतुकास नेहमीच पात्र ठरत आलेली आहे. श्रीदत्त राऊत यांनी ही तब्बल ५४९ वी इतिहास अभ्यास सफर होती. कार्यक्रमाच्या समारोपास श्री मनिष वर्तक यांनी सहभागी दुर्गमित्र, स्थानिक नागरिक, अभ्यासक, विद्यार्थी मित्र यांचे आभार मानले. जंजिरे वसई किल्ल्याच्या प्राचीन इतिहासाची ओळख करून देणारा व दुर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणारा हा उपक्रम वसई विजयदिनातील आदर्श उपक्रम म्हणून गणला जातो यात शंका नाही. आयोजकांनी दुर्गमित्रांसाठी पिण्याच्या पाण्याची, नास्ता, टोपी, वैद्यकीय व्यवस्था चोख केल्याने मोलाचे सहकार्य झाले. जंजिरे वसई किल्ल्यातील भुयारी मार्गाची वाढती असुरक्षितता,धोकादायक परिस्थिती व गेल्या कित्येक वर्षात केंद्रीय पुरातत्व विभागाने भुयारी मार्गाची न केलेली डागडुजी यामुळे यंदाही किल्ले अभ्यास सफरीत भुयारी मार्ग सफर करण्यात आलेली नाही.

वसई विजयोत्सवातील दुर्ग बांधणी परंपरा व आकर्षण कायम

वसई विजयोत्सव दिनाचे औचित्य साधून यंदा उभारण्यात आलेल्या ६ किल्ल्यांची बांधणी वैशिष्टयपूर्ण ठरली. यात जंजिरे धारावी, कोरीगड, मल्हारगड, टकमकगड, मांडवी कोट, सेवगा दुर्ग या किल्ल्यांचा समावेश होता. किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी किल्ले बांधणीचे नियोजन पाहिले. यंदाच्या अत्यंत कमी वेळात बांधण्यात आलेल्या या सहा दुर्गांस स्थानिक अभ्यासकांची व स्थानिक दुर्गमित्रांची पसंती लाभली. या दुर्ग बांधणीची वैशिष्टये म्हणजे नैसर्गिक साधनांचा वापर, इतिहास संकलन, अभ्यासपूर्ण बांधणी, तसेच स्थानिक दुर्गमित्रांचा सहभाग हे होय. गेल्या काही विजयोत्सवात स्थानिक कलाकार, नवोदित दुर्गमित्रांच्या सहभागाने व प्रत्यक्ष सहभागामुळे किल्ले बांधणी परंपरा योग्य आकार घेऊ लागली आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून स्थानिक कलाकारांचे व दुर्गमित्रांचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे. किल्ले बांधणीच्या उपक्रमाचे औचित्य साधून सद्या विविध गडकोटांवर दुर्गमित्रांच्या सहभागाने सुरू असणाऱ्या प्रत्यक्ष श्रमदान मोहिमांची माहिती देण्यात आली. वसई विजयदिनाचे औचित्य साधून दरवर्षी महाराष्ट्रातील दुर्गांना देण्यात येणारी ही अनोखी मानवंदना एक महत्त्वाचा प्रवाहच मानण्यात येतो. सदर उपक्रमात किल्ले वसई मोहीम परिवार, दुर्गमित्र परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान, वसई विकासिनी कला महाविद्यालय, मालाडचे शिलेदार या संघटनेच्या प्रतिनिधीनी सहभाग नोंदवला. आयोजकांतर्फे सर्व सहभागी संघटनांना व्यासपीठावर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!