वसई-विरार पालिकेतील उपसंचालक जगताप निलंबीत

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महापालिकेत बेकायदेशिरपणे उपसंचालकपदी कारभार पाहणाऱ्या  संजय जगताप यांना नगरविकास मंत्रालयाने निलंबीत केले आहे.

संजय जगताप हे महापालिकेच्या नगररचना विभागात बेकायदेशिरपणे प्रभारी उपसंचालक म्हणून कारभार पाहत आहेत. तसेच नगर अभियंता म्हणूनही त्यांच्याकडे पदभार आहे. हे पद त्यांची पात्रता नसतानाही देण्यात आले आहे. महापालिका स्थापनेपुर्वी जगताप नवघर-माणिकपुर नगरपालिकेत अभियंता म्हणून कार्यरत होते. ही नगरपालिका महापालिकेत विलीन झाल्यानंतर त्यांची इतर नगरपालिकेत बदली होणे आवश्यक होते. जगताप यांची शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअर अशी असताना त्यांनी वशिला लावून नव्याने स्थापन झालेल्या वसई-विरार महापालिकेत आपली नियुक्ती करून घेतली. या पदावर एम.टेक इंजिनिअर (प्लानिंग) सदस्य भारतीय नगररचना प्राधिकरण दिल्ली आणि नगररचनाकार म्हणून १० वर्षांचा अनुभव असणाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते.तरिही पात्रता नसताना जगतापही ते गेली तीन वर्षे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.

जगताप यांचे भुमाफियांशी संबंध असल्यामुळे 1 सप्टेंबर २०१८ ला त्यांची मुदत संपली असतानाही या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांचा कारभार अत्यंत संशयास्पद आहे. त्यांच्या काळात राखीव जागांवर अनधिकृत बांधकामे ,सी.आर.झे.ड,वेटलँड, मिठागरे,बांधकाम घोटाळे,बेकायदेशिर इमारतींच्या फायली गहाळ होणे असे प्रकार झाले आहेत.त्यांच्या चुकीच्या आणि अनुभवहिन कामकाजामुळे गेल्या वर्षी वसई पाण्याखाली बुडाली होती.असे मुद्दे उपस्थित करून ऍड.नेहा दुबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. नगररचना विभागात कार्यरत असणारे त्यांचे ठेका सहकारी अमित राऊत, रुद्रेश यांच्याशी जगताप यांचे लागेबांधे जगजाहीर असून वसई वाचवण्यासाठी जगताप यांनी ताबडतोब नगर अभियंता पदावरून दुर करण्यात यावे आणि त्यांची सी.आय.डी मार्फत चौकशी करण्यात यावी.अशी मागणीही ऍड.दुबे यांनी केली होती.

त्यानंतर दुबे यांच्या या तक्रारीची दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या आदेशानुसार नगरविकास मंत्रालयाने ५ ऑगस्ट २०१९ ला जगताप यांची वसई-विरार महापालिकेतून पालघर नगरपरिषदेत उचलबांगडी केली होती. नगरपरिषदेचा कारभार ताबडतोब हाती घेण्यात यावा आणि ही बदली टाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे या आदेशात नमुद करण्यात आले होते. तरिही जगताप यांनी महापालिकेचा कारभार सोडला नव्हता अखेर कारवाई म्हणून नगरविकास मंत्रालयाने त्यांना निलंबीत केले आहे. या निलंबनाला जगताप यांनी दुजोरा दिला असून ही कारवाई करताना कुठलीही नोटीस बजावण्यात आली नाही अथवा म्हणणे मांडण्याची संधीही देण्यात आली नसल्याचे जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!