वसई-विरार मनपाला शहरस्तर संघाचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार

पुरस्कार स्वीकारताना अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे

वसई (वार्ताहर) : स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी वसई-विरार महानगर पालिकेच्या आकांक्षा शहरस्तर संघाने देशात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. तर राज्यातून याच महानगर पालिकेच्या सक्षम आणि युगंधरा वस्तीस्तर संघाने अनुक्रमे पहिला व दुसरा आणि मिराभाईंदर महानगर पालिकेच्या वसई-विरार मनपाला शहरस्तर संघाचा द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार संघाला तिसरा पुरस्कार मिळाला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय योजना-शहरी उपजीविका कार्यक्रमांतर्गत देशभरातील महानगरपालिका व नगरपरिषदांतर्गत कार्यरत शहरस्तर व वस्तीस्तर संघाना आज वर्ष २०१८-१९ करिता स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा आणि सह सचिव संजय कुमार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आकांक्षा शहरस्तर संघ ठरला देशात द्वितीय क्रमांकाचा मानकरी

वसई -विरार मनपाच्या आकांक्षा शहरस्तर संघाच्या स्वच्छता क्षेत्रातील कार्याची दखल घेत या संघास राष्ट्रीयस्तरावर द्वितीय क्रमांक प्रदान करण्यात आला. वसई विरार मनपाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह या संघाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आकांक्षा या शहरस्तर संघात १५ वस्तीस्तर संघांचा समावेश असून कचऱ्याचे कंपोस्ट खत बनविणे, ओला व सुखा कचरा यांचे वर्गीकरण करणे तसेच स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचे कार्य या संघाने केले. दोन लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वसई-विरारला वस्तीस्तर संघाचे पहिले दोन तर मिराभाईंदरला तिसरा पुरस्कार

या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातील सर्वोत्तम तीन वस्तीस्तर संघांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून वसई-विरार महानगर पालिकेच्या सक्षम वस्तीस्तर संघाला प्रथम तर याच महानगर पालिकेच्या युगंधरा वस्तीस्तर संघाला द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. वसई-विरार मनपाचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह या संघाच्या अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या संत मदर तेरेजा वस्तीस्तर संघाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक वस्तीस्तर संघात २० महिला बचत गटांचा समावेश असतो.

प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे. द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप दीड लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह तर तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!