“वस्त्रहरण” ने आयुष्य बदलले – गंगाराम गवाणकर 

वसई (प्रतिनिधी) : मी अनेक नाटके लिहिली पण “वस्त्रहरण ” या नाटकाने माझ्या आयुष्यामध्ये प्रगतीचा” यु टर्न ” घेतला असे प्रतिपादन “वस्त्रहरण ” या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांनी दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी यंग स्टार ट्रस्ट आयोजित विवा कट्टा (पुष्प ३९) अंतर्गत “दिवाळी विशेष कट्टा ” हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी येथील सभागृहात केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक मकरंद सावे यांनी केले. या प्रास्तविकमध्ये विवा कट्टा द्वारे चालवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची व पुढील महिन्यातील जी.प शाळेतील मुलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. सुप्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांनी आपले खडतर बालपण , लेखक  बाबुराव अर्नाळकर व वि.स खांडेकर यांच्या मुळे आपल्याला लागलेली वाचनाची गोडी , जे.जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये नाटककार दामू केंकरे यांचे लाभलेले अमूल्य मार्गदर्शन असा आपला जीवन पट त्यांनी उलगडून दाखवला. त्यांनी वात्रट मेले , वेडी माणसे अशी अनेक नाटके लिहिली . परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती “वस्त्रहरण” या नाटकामुळे असे त्यांनी सांगितले. त्यांनी नाट्य लेखनाबरोबर विविध वृत्त पत्रामध्ये “व्यक्ती चित्रण” स्तंभ देखील लिहिले.  कार्यक्रमांतर्गत त्यांनी “वस्त्रहरण “नाटकाची निर्मिती कशी झाली . त्या नाटकांमधील पात्रांच्या सुरस कथा सांगितल्या . या नाटकातील इरसाल व बेरकी सरपंच पांडू तात्या स्व. मच्छिन्द्र कांबळी यांनी प्रचंड गाजवला.
या नाटकाचे एकूण ५२२५ प्रयोग झाले असून बोली भाषेत सर्वाधिक प्रयोग करणारे एकमेव नाटक आहे. आजही या नाटकाची लोकप्रियता कायमच आहे या प्रयोगाचा शुभारंभ १५ फेब्रुवारी १९८४ मध्ये झाला . या नाटकास  लता मंगेशकर , बाळासाहेब ठाकरे, यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेते , राजकीय नेते यांनी हजेरी लावली. लंडन येथिल प्रयोगाच्या वेळी येणाऱ्या अडचणी व त्यासाठी अनेकांनी मदत कशी केली ते सांगितले. या नाटकास अंध प्रेक्षकांनी देखील कशी हजेरी लावली असे अनेक किस्से सांगून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आपले आयुष्य सकरात्मक दृष्टीने जगा असा सल्ला दिला. उपस्थित प्रेक्षकांनी मनमोकळे पणे या नाटकाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास डिंपल पब्लिकेशन चे अशोक मुळे ,जयंत देसले , पत्रकार आनंद गदगी आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मकरंद सावे ,स्वाती जोशी व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले. मकरंद सावे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!