वातावरण अनुकूल आहे म्हणून गाफील राहू नका – बबनशेठ नाईक यांचा ईशारा

नालासोपारा (प्रतिनिधी) : पालघर मतदार संघात आजचे एकूण वातावरण आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाला अनुकूल आहे. या वेळी कधी नव्हे एवढा मोठा पाठिंबा विविध पक्षांचा मिळाला आहे. आपण ही लढत जिंकणारच आहोत म्हणून तुम्ही गाफील व बेसावध राहू नका.आपल्या सभांना होणाऱ्या गर्दीवर जाऊ नका, सकाळी प्रचारात किती कार्यकर्ते उतरतायेत ते बघा, अशा शब्दांत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक यांनी ब.वि.आ.पक्ष कार्यकर्त्यांना येथे ईशारा दिला.

नालासोपारा पश्चिमेला शनिवारी बहुजन विकास आघाडी पक्षाने एक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते या मेळाव्यात बोलत होते.महापौर रुपेश जाधव, माजी उप महापौर सगीर डांगे, उमेश नाईक,  पक्ष प्रभारी हेमंत म्हात्रे, प्रभाग समिती सभापती किशोर पाटील, निलेश देशमुख, चिरायु चौधरी, सरिता दुबे, अनेक नगरसेवक, पश्चिम पट्टीतील अनेक सरपंच, जि.प. सभासद ,पक्ष पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

युतीचा समाचार आपण घेणारच आहोत पण ही वेळ व जागा योग्य नाही. प्रचारा दरम्यान आपले सर्व वक्ते तुफानी फटकेबाजी करणाच आहेत. तूर्तास आपल्या पध्दतीने प्रचार काम सुरू करावे असे आवाहन नेते बबनशेठ नाईक यांनी नगरसेवक व कार्यकर्ते यांना केले. महापौर रुपेश जाधव यांनी आपल्याला आपलेच खासदार हवे आहेत. तरच महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने वेगाने विकास होईल. अधिक निधी उपलब्ध करून घेतला आणि मोठया योजना मार्गी लागल्या असा आपल्या बळीराम जाधवांनी ते खासदार असताना दिलासा मिळाला होता.

महापालिका आर्थिक बाजूने सक्षम झाली होती. 30 हजार कोटी रुपयांची आपली महापालिका 1800 कोटीवर आली केवळ आपले खासदार नसल्याने. पालिका क्षेत्रातील विकास आपण खूप केला, करतो आहोत आणि करणार आहोत. आत्ता तुम्ही सारे दोन फुलांपासून सावध रहा. एक एप्रिल फूल दुसरे कमळ, असे विचार या मेळाव्यात मांडले.

 माजी उप महापौर सगीर डांगे, उमेश नाईक यांनी सुध्दा उपस्थित कार्यकर्ते व आजी-माजी नगरसेवकांना या वेळी मार्गदर्शन केले. कळंबचे सरपंच हरिश्चंद्र घरत,जि.प.सदस्य राजाराम तांडेल, भुईगावचे साहित्यिक फ्रांसिस डिसुझा, पश्चिम भागातील पक्ष पदाधिकारी व नगरसेवक मार्शल लोपीस, रेमंड कार्व्हालो, सालू आल्मेडा, रोमन फर्नांडिस या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक नरेश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी नगरसेवक व पक्षाचे शहर उपाध्यक्ष ऐड्. रमाकांत वाघचौडे यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले. पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश हाटकर यांच्या वतीने सभापती किशोर ग.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!