वारिस पठाणच्या तोंडात जीनाची विचारसरणी – जयंत करंजवकर

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर भाषणातील एका विधानाची प्रकर्षाने आठवण येते. ते त्यांच्या जाहीर भाषणात केंद्रातील काँग्रेस सरकारला सांगत असत की, ‘पाकिस्तानला अणुबॉम्ब बनविण्याची गरज नाही, त्याने भारतात अतिरेकी अणुबॉम्बच्या रूपाने पेरले आहेत’.  याची सत्यता एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार वारिस पठाण यांच्या ‘आपले १५ कोटी त्यांच्या १०० कोटींवर भारी पडतील’… यांच्या या जहरी विधानाने सिध्द केले आहे. असे विधान पाकिस्तानला स्फुरण देणारे आहे. भारतातील १५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना भारी पडतील हेच त्यांना सांगायचे आहे. विषारी फुत्कार करणाऱ्या वारिस पठाण यांना वेळीच आवरले पाहिजे. आज वारिस यांची हिंदू व मुस्लिम यांच्या फूट पाडणारे वक्तव्य आहे. वारिस यांचे जहरी विधान हे मुसलमानांचे माथी भडकविणारे आहे. देशात फुटीचे वातावरण निर्माण करणारे आहे. ‘ही हिरवी पिलावळ वेळीच ठेचली पाहिजे’, असा इशारा बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी दिला असता. वारिस पठाण यांच्यासारखे वक्तव्य एम.आय.एम चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील अनेकवेळा हिंदूंवर गरळ ओकली होती. वारिस पठाण यांच्या विधानासारखे वक्तव्य ओवैसी यांचे  बंधू अकबर ओवैसी यांनी देखील ‘देशातील पोलीस १५ मिनिटे बाजूला करा, पहा काय घडतंय ते…’ असे बोलून एकप्रकारे हिंदूंना आव्हान दिले होते. अशी अधूनमधून गरळ ओकण्याची दिवसेंदिवस विकृती वाढतच आहे. परंतु विकृती का वाढत आहे याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हा विषय एम.आय.एम पुरती मर्यादित नाही. या वक्तव्याचा इतर राजकीय पक्षही स्वत:चा पक्ष कसा वाढविता येईल याचा प्राधान्याने करीत आहेत.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी सत्तेत सामील व्हा, असे राज्यातील मुसलमानांनी आग्रह केल्याने काँग्रेस सत्तेत सामील झाली आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. राज्यातील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असे विधान करायला लागले तर आपण कोणाचे समर्थन करत आहोत याचे थोडेतरी भान ठेवायला पाहिजे होते. १५० वर्ष असलेल्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने ही भूमिका जाहीर करून त्यांच्या हिंदू मतदारांना काय वाटत असेल याचा विचार केलेला दिसत नाही. शेवटी राष्ट्रीय एकात्मता हा विषय बासनात ठेवून अशोक चव्हाण यांनी हिंदूने नव्हे तर मुसलमानांनी सांगितले म्हणून काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत सामील झाली हेच यातून त्यांना सुचवायचे आहे.

हे झाले काँग्रेस पक्षाचे, राजकीय रंगमंचावरील ‘शो मन’ राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टी.आर.पी वाढविण्यासाठी मुसलामानांना संबोधून ‘यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल’ असे विखारी विधान केले. त्यांनी मराठी मुद्यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्व कार्ड घेतले. शिवसेनेने आज राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी प्रखर हिंदुत्वाकडून सौम्य हिंदुत्व स्वीकारल्याने राज ठाकरे यांनी सेनेचा हिंदुत्व हायजॅक केला, याची जाणीव प्रत्येक मराठी माणसाला आहे. सरतेशेवटी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन स्वत:ची प्रतिमा उंचविण्याचाच प्रयत्न केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला खरा अर्थ प्राप्त झाला तो १९९३ च्या दंगलीच्या वेळी… देशद्रोही दाऊद इब्राहिम कासकर याने मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले आणि सेनेच्या हिंदुत्वाला तेज मिळाले. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तो काँग्रेस पक्षाच्या मुसलमानांचे तुष्टतीकरण हेच कारण होते. मुंबईत दाऊदने १२ बॉम्बस्फोट केले होते. तेही हिंदू बहुल भागात स्फोट केले होते. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी मुंबईत १३ ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे जाहीर करत असताना १३ वा बॉम्बस्फोट मशिदीजवळ झाल्याचे जाहीर केले होते. यातून  गर्भित संदेश हिंदूमध्ये जायाचा होता तो गेला.

हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद कायम ठेवून राजकीय लाभ उठविण्याचा लांच्छनास्पद प्रकार वेळोवेळी आढळून येत असतो. वारिस पठाण यांच्या विधानांचा फायदा घेत भाजपाचे गिरीश व्यास यांनी राज्यातील समस्त मुसलमानांना गुजरात जातीय दंग्याची आठवण करून दिली आहे. शेवटी हिंदू मुसलमान यांच्यात समेट न होता दुरावा कसा वाढेल याचीच गिरीश व्यास यांनी काळजी घेतलेली दिसते. देशाचा विकास हा गौण विषय तर सत्ता मिळविणे हेच ध्येय प्रत्येक राजकीय पक्षाचाअसतो.

देशातील मुसलमानांनीही त्यांचं हित कशात आहे याचा आजवर कधीच विचार केला नाही. पुढारी जे बोलतील, इमाम, मौलवी जे सांगतील त्याप्रमाणे जाणे हे त्यांच्या हिताचे नाही हे त्यांना केव्हा कळणार याबाबत अजूनही स्पष्ट होत नाही . सीएए, एनआरसी व एनपीआर या विरोधात एकत्र येऊन ते शक्ती प्रदर्शन करतात, त्याच प्रमाणे वारिस पठाण यांच्या विधानांचाही निषेध करण्यासाठी मुसलमानांनी रस्त्यावर उतरले पाहिजे होते. तसं घडत नाही म्हणून हिंदूंच्या मनात त्यांच्याविषयी संशय बळावतो. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बेंगळुरू येथे आयोजित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील जाहीर सभेत अमुल्या या विद्यार्थिने पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्या. ओवैसी यांनी त्याच ठिकाणी ताबोडतोब अमूल्या हिच्या वक्तव्याचा निषेध केला हे एकाअर्थी चांगलेच झाले. अशा प्रकारे त्वरित प्रतिक्रिया व्यक्त झाल्या तरच हिंदू मुस्लिम सलोखा राहील.

देशात हिंदू मुस्लिम सलोख्याने राहतात, परंतु असे वातावरण कायम राहणे हे राजकीय नेत्यांना पचणारे नाही. हे आम जनतेला ठाऊक आहे, म्हणून तर वारिस पठाण यांनी आमची १५ माणसं १०० माणसांना भारी पडतील असा पत्रकार परिषदेत शब्दच्छल करून स्वत:ची अडकलेली मान सोडवून घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला. मात्र अमूल्याच्या विधानाचा ओवैसी निषेध केला, पण वारिस पठाण यांनी मात्र पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी न मागता उलट प्रसार माध्यमावर खापर फोडून त्यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. यात समाधानाची बाब म्हणजे गीतकार जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांचा ‘बेवकुफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही १५ करोडच राहाल’ असे फटकारून त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. वारिस याचा निषेध करतांना जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांना पाकिस्तान निर्माण होऊन जीना यांची इच्छा पूर्ण झाली, पण जीना यांची विचारसरणी आजही देशात आहे अशी झणझणीत त्याच्यावर टीका केली. या टिकेतून जावेद भाईंनी भारत स्वतंत्र होऊन ७० वर्षे होऊनही महंमद जीना यांची अवलाद आजही डोके वर काढतात असल्याचा गर्भित इशारा दिला आहे, याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/)                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!