विकास कामे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आघाडीचे पारडे जड

वसई (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात केलेली कामे आणि सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी करीत असलेल्या प्रचारामुळे युतीच्या राजेंद्र गावित यांच्यापेक्षा आघाडीच्या बळीराम जाधव यांचे पारडे सरस ठरत आहे.

स्वतंत्र जिल्ह्याचे पहिले खासदार झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी केंद्राच्या, आमदार हितेंद्र ठाकुर, क्षितीज ठाकुर, विलास तरे यांनी राज्य सरकारच्या आणि आघाडीच्या १०५ नगरसेवकांनी महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे, दररोज जनसंपर्कात असलेले कार्यकर्ते आणि सर्वश्रुत असलेल्या रिक्षा या निशाणीमुळे बळीराम जाधव यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

डहाणू-चर्चगेट लोकल,नायगांव-डहाणू दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर पादचारी पुल,स्वयंचलित सरकते जिने,उदवाहने,स्वच्छतागृहे या सुविधांसाठी बळीराम जाधव यांनी २००९ ते २०१४ या आपल्या खासदारकीच्या काळात मंजुर करून घेतल्या.डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी ५८ कोटी, ठक्करबाप्पा योजनेतून १०२ कोटींचा विकास निधी,आदिवासी योजनेतून ३२.७६ कोटी, केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून १२ कोटी,सॅटेलाईट सिटीसाठी ६२३ कोटी,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १०४ कोटी रुपयांचा निधी,मनोर येथील ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता २०० बेड आणि मोखाडा येथील ३० बेडच्या रुग्णालयाची क्षमता ५० बेडपर्यंत वाढवण्याचे जाधव यांनी मंजुर करून घेतले.

कालोलीला ट्रोमा केअर सेंटर,मछिमारांसाठी १० लाखांपर्यत आकस्मीक अपघात विमा,डिझेलवर सबसिडी, मच्छिमारांसाठी अनुदान, जेठी, मच्छिमार्केट, मासळी सुकवण्यासाठी चौथरे, धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी २८ कोटी खर्च, झाई-बोरीगांव नळ पाणी योजना, घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे देण्यासाठी मंजुरी, आदिवासी बांधवांसाठी भुकबळी,कुपोषणाबाबत योजनांची प्रभावी अंमल बजावणी यासारखी अनेक कामे बळीराम जाधव यांनी केल्याची माहिती महाआघाडीच्या कार्यकर्त्यांद्वारे घराघरात पोहचवण्यात आली आहे.ही जाधव यांची जमेची बाजु आहे.

तर दुसरीकडे गेली पाच वर्षे चिंतामण वनगा आणि राजेंद्र गावित हे भाजपाचे खासदार पालघरला लाभले होते.या काळात जिल्ह्यात सर्वात जास्त बालक कुपोषणाला बळी पडले. तसे त्यांच्या मित्रपक्ष श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनीच उघडकिस आणले होते.गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्यावर सत्तेत असतानाही पालघरमध्ये भाजपाच्या खासदारांनी केलेली कामे दिसून आली नाही.याउलट काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आयात करणे आणि त्यानंतर यंदाच्या निवडणूकीत आपले लेबल लावून त्यांना शिवसेनेत निर्यात करणे,युती करण्यासाठी शिवसेनेवर कुरघोडी करणे,श्रीनिवास वनगा यांची गोची करणे,बहुजन विकास आघाडीवर टिका करण्यातच भाजपाने ५ वर्षे घालवली.

विश्वासार्हता नसलेला उमेदवार,अंतर्गत धुसफुस आणि कार्यकर्त्यांची दमछाक करणाऱ्या जाहीरसभा घेवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न युतीने केला.स्थानिक पक्षाला हरवण्यासाठी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय मंत्र्यांच्या ताकदीचा वापर करून युतीकडून दबाव आणला जात असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.बहुजन विकास आघाडीने मात्र,जाहीरसभेवर भर न देता चौकसभा,ग्रामसभा घेवून आणि दारोदार फिरुन केलेली कामे आणि प्रस्तावित कामे मतदारांना दाखवून दिली.त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.त्यामुळे आघाडीला वाढता प्रतिसाद मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!