विजय वैद्य : तरुणांना लाजवील असा जबरदस्त पत्रकार !! – योगेश वसंत त्रिवेदी

विजयकुमार दत्तात्रय वैद्य ! मूर्ति लहान पण किर्ती महान ही उक्ती आपण माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संदर्भात वापरतो, तशीच ही उक्ती विजय वैद्य यांच्या बाबतीतही लागू पडणारी आहे. इंग्रजी नवीन वर्ष घेऊन जन्माला आलेले विजय वैद्य हा खरे म्हणजे एक कादंबरीचा, ग्रंथाचा विषय होऊ शकतो. अनेक पैलू ज्याच्या अंगात पहावयास मिळतात असे हे सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व आहे. अनेक पैलू म्हटल्यामुळे त्यांना आपण अष्टपैलू कसे म्हणणार? खरे आहे.
विजय वैद्य यांनी टाईम्स ऑफ इंडियात जॉब डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. पण केवळ नोकरीत गुरफटून न राहता विजय वैद्यांनी वृत्तपत्र सृष्टी, साहित्य सृष्टी, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक आदि सर्वच क्षेत्रात स्वैर संचार केला, परदेश दौरे केले, पुस्तके लिहिली. वृत्तपत्रांतून बातमीदारी केली. दैनिकांतून वरच्या पदांच्या जबाबदार्‍याही भूषविल्या. शोधपत्रकारिता केली. नैसर्गिक आपत्तींचे ‘याचि देही याचि डोळा’ चक्षुर्वैसत्यम वृत्तांत दिले. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. या प्रत्येक बाबतीत त्यांच्यावर खंडशः ग्रंथ निघू शकतील. स्वतः साप्ताहिक चालविले, मित्रांची साप्ताहिके, दैनिके व्यवस्थित प्रकाशित व्हावीत म्हणून त्यांनी पदरमोड करून मदतीचा हात दिला.
स.दा. धमाले, ना.मा. निराळे, दत्तकुमार, सहसंवादि, उ.प. नगरवाला, आग्या वेताळ, शिस्त विजय, छोटू ठाणेकर, जगदीश जोगेश्‍वरीकर, निर्भय फटकळ आदि सुमारे 12 टोपण नावांनी विविध वृत्तपत्रांतून स्तंभ लिहिणार्‍या विजय वैद्य यांनी शासनाकडून कोणत्याही पुरस्काराची कधी अपेक्षा केली नाही. मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला.  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्यावर्षी ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
ठाणे जिल्हा पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक करणार्‍या विजय वैद्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातही पदे भूषविली आहेत. जव्हारसारख्या ठिकाणी काकी वैद्यांच्या पोटी जन्माला आलेल्या विजय वैद्यांचा ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर असा वास्तव्यासाठीचा संचार सुरु होताच. भाड्याचं घर, बोर्डिंगमध्ये राहणे अशा विविध अनुभवानंतर जेमतेम स्वतःचं घर ते मिळवू शकले. पत्नी वैशाली आणि पुत्र वैभव आणि विक्रांत यांना सांभाळून स्वतःचा प्रपंच चालवता चालवता मुलांनाही त्यांचे संसार उभे करण्याचे त्यांनी बळ मिळवून दिलं. आज दोन्ही मुले स्वतंत्ररीत्या स्वतःच्या पायावर उभी राहून आपलं नावलौकिक टिकवून आहेत.
वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांमध्ये राहणारे तीन ज्येष्ठ पत्रकार माझ्या पाहण्यात आहेत. तसे अनेक असतीलही पण दिनू रणदिवे, वि.वि. करमरकर आणि विजय वैद्य हे तीन जण तर असे आहेत की, वृत्तपत्रे त्यांच्या खोलीत नाहीत तर हे तिघेही वृत्तपत्रांच्या खोलीत, वृत्तपत्रांच्या ढिगार्‍यात राहतात असे म्हटले तर अतिशयोक्तीचं होणार नाही.
आजच्याच नव्हे तर सर्व पिढीतल्या पत्रकारांना शिस्तीने वृत्तपत्रांची कात्रणे काढून ती चिकटवून त्यांचा योग्य ठिकाणी ठेवून उपयोग करणे, संदर्भासाठी वापरणे हे खरंच वैद्यांकडून शिकण्यासारखे आहे. प्रत्येक विषयावरची कात्रणे काढून ती चिकटवून त्यांची बांधणी करुन ते खंड विधिमंडळ ग्रंथालय, मंत्रालय येथील पत्रकार कक्ष इतकेच नव्हे तर मुंबई पासून नागपूर पर्यंत अनेक ठिकाणी हे खंड पोहोचले आहेत. मागाठाणे मित्रमंडळ, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय/ग्रंथालय, मुंबई उपनगर साहित्य संमेलन, वसंत व्याख्यानमाला या आणि यासारख्या अनेक संस्था आणि संघटना त्यांनी उदयाला आणलेल्या आहेत. छोट्या छोट्या संस्था आणि संघटना तर त्यांना आपले सल्लागार मानतात. संस्थांची नोंदणी करणे हे तर त्यांचे आवडते काम झाले आहे. अनेक संस्था संघटना यांना ते सदैव मार्गदर्शन करीत असतात. जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड हा आदिवासी पट्टा तर त्यांच्या पायाखालचा झाला आहे. त्यांचा साठाव्या वर्षाचा वाढदिवस प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात झाला होता. अमृतमहोत्सवी वाढदिवस होण्याआधी येथील स्थानिक रिक्षाचालकांनी दोन तास रिक्षा बंद ठेवून वैद्यांचा वाढदिवस साजरा केला तेंव्हा त्याचे वर्णन उपेक्षितांकडून उपेक्षित पत्रकाराचा वाढदिवस असे केले होते. प्रा. नयना रेगे आणि सौ. रेखा बोऱ्हाडे या मानसकन्यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर थोर समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. सौ. मंदाकिनी आमटे यांच्या शुभहस्ते अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला. ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यावेळी खास डॉ. आमटे दांपत्याची प्रकट मुलाखत घेण्यासाठी उपस्थित होते. मुंबई मित्रचे अग्रलेख आणि आपला वार्ताहर मध्ये आठवड्यात एकदा स्तंभ यातून अनेक नवनवीन संदर्भ नव्या पिढीला विजय वैद्य हे उपलब्ध करून देत आहेत. जुने संदर्भ सांगतांना ते अजिबात थकत नाहीत, कंटाळत नाहीत. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो, शिवसेनेची आंदोलने असोत की सामाजिक चळवळ असो या प्रत्येक घटनेची माहिती इत्थंभूत देण्यासाठी विजय वैद्य हे अहमहमिकेने पुढे असतात. पत्रकार संघटनांच्या निवडणुका कशा लढवायच्या आणि त्या कशा जिंकायच्या याची रणनीती अजूनही नवनवे पत्रकार त्यांच्या कडून मार्गदर्शन रुपाने जाणून घेण्यासाठी येत असतात. आज वयाची अठ्ठ्यात्तर वर्षे गाठणाऱ्या पण तरुणांना सुद्धा लाजवतील अशा (मी म्हातारा  नव्हेच असं ठणकावून सांगणारे) हरहुन्नरी जबरदस्त ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ पत्रकार व समाजकार्य करणाऱ्या विजय वैद्य यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही शिवचरणी प्रार्थना !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!