विरार  व वसई रोड महिला प्रवाशांमध्ये महिला स्पेशल लोकलवरून वाद उफाळणार

  • १ नोव्हेंबर पासून विरारहून सुटणा-या महिला लोकलचा पश्चिम रेल्वेने केलेला सर्वे चुकीचा
  • महिला प्रवाशांच्या शिष्टमंडळाने घेतली पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट. 
वसई (मनिष म्हात्रे) : सकाळच्या वेळी वसई रोड रेल्वे स्थानकातून चर्चगेटला जाणारी महिला स्पेशल ट्रेन 1 नोव्हेंबर पासून विरारहून सुटण्यात येणार आहे.याबाबत विरारच्या प्रवाशांची मागणी होती असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.मात्र वसई-नायगांव येथील महिला प्रवाशांचा याला मोठा विरोध आहे.रेल्वेकडून याबाबत केलेला सर्वेही चूकीचा असल्याने महिला प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत महिलांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांची भेट घेत महिला लोकल ट्रेन रद्द करू नये म्हणून निवेदन सादर केले आहे. 
     गेली सहा वर्षे सकाळच्या वेळी वसई  रोड रेल्वे स्थानकातून सुटणारी 9.57 ची महिला विशेष ट्रेन मधून हजारो महिला प्रवासी प्रवास करित असतात.मात्र गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेकडून अचानक हि विशेष गाडी 1 नोव्हेंबर 2018 पासून विरारहून सोडण्यात येईल असे जाहिर करण्यात आले.विरारच्या प्रवाशांची तशी मागणी असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.या निर्णयामुळे वसई, नायगांव परिसरातील महिला प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.कारण या महिला स्पेशल लोकलच्या वेळेनुसार अनेक नोकरदार महिलांनी आपल्या ऑफीस व कामाच्या वेळा बदलून घेतल्या होत्या.तसेच विरारहून सुटणा-या इतर लोकलमधील महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वसई रोड व नायगांव स्थानकातील महिला प्रवाशांना डब्यात चढणे शक्य होत नाही.याबाबत महिला प्रवाशांच्या  शिष्टमंडळासह १६ ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांची भेट घेत वसई रोड रेल्वे स्थानकातून सुटणारी महिला स्पेशल विरारहून सोडण्याअगोदर एक सर्वे करून माहिती मागविण्याची विनंती केली होती.त्यानुसार रेल्वे प्राधिकरणाच्या १५ अधिका-यांनी २२ व २७ ऑक्टोबर २०१८ रोजी सर्वे करून तो अहवाल रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना सादर केला होता.या अहवालात या महिला स्पेशल ट्रेन मध्ये बोरिवली स्थानकापर्यंत २५३८ महिला  प्रवासी चढत असून दादर स्थानकापर्यंत १४३८ प्रवासी प्रवास करत असल्याचे नमूद केले.तसेच इतर सामान्य लोकलमध्ये खरेदीच्या वेळी हिच संख्या 6000 असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यामूळे हि महिला विशेष लोकल विरार स्थानकातून सोडणे योग्य असल्याचा निर्णय रेल्वे प्राधिकरणाने देत त्यावर शिक्कामोर्तब केला.
     वसई रोड स्थानकावरून सुटणारी महिला विशेष ट्रेन हि गेल्या सहा वर्षापासून नियमीत सुटणारी लोकल असून ती वसई रोड,नायगांव तसेच भाईंदर पुढील स्थानकावरून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक प्रकारे जिवनदायीनी आहे.मात्र अचानक १ नोव्हेंबर २०१८ पासून अचानक हि लोकल विरारहून करण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे महिला प्रवाशी प्रचंड नाराज झाल्या आहेत.हि महिला विशेष लोकल विरारहून सोडण्यात यावी कि नाही याबाबत २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान एक सर्वे केला गेला होता.त्यावेळी  लोकल ट्रेनमध्ये ६ ते ७ महिला टी सी चढून महिला प्रवासी किती प्रवास करीत आहेत ,तसेच बसलेल्या महिला व उभ्या असलेल्या महिलांच्या नोंदी तसेच प्रत्येक स्थानकावर चढ-उतार करणा-या प्रवाशांच्या नोंदी करीत होत्या.मात्र या नोंदीव्यतीरिक्त त्यांच्याकडून रेल्वेसंदर्भात समस्या किंवा महिला लोकल विरारहून सोडण्यात आल्यास काय त्रास सहन करावा लागेल याबाबत विचारणा करण्यात आली नाही.हा सर्वे करताना या बाबी रेल्वे प्राधिकरणाने लक्षात घेऊन सर्वे करायला हवा होता.त्यामूळे रेल्वेकडून केलेला हा सर्वे चुकीचा असल्याचे मत महिला प्रवासी मृदुला खेडकर यांनी व्यक्त केले.रेल्वेने महिला  विशेष लोकलची तुलना सामान्य लोकलशी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत हि ट्रेन रद्द करण्यात येऊ नये म्हणून गेल्या आठवड्यांपासून महिला प्रवाशांकडून सह्यांची मोहिम हाती घेण्यात आली होती.मंगळवारी या सह्यांचे निवेदन पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांना दिलंयानंतर त्यांनी याबाबत लवकरच रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून निर्णय सांगतो असे सांगितले आहे.
रेल्वेने महिला स्पेशल लोकलसाठी केलेला सर्वे चुकीचा आहे.संपूर्ण लोकलमध्ये 6 ते 7 महिला टीसींकडून हा सर्वे करण्यात आला.महिला प्रवाशांच्या काय समस्या आहेत याबाबत काहिच सर्वे करण्यात आला नाही.वसई रोड व पुढील स्थानकावरून प्रवास करणा-या महिलांना हि वसई  लोकल रद्द केली तर मोठा त्रासाला सामोरे जावे लागेल.
अँड.मृदुला खेडेकर,महिला स्पेशल लोकल प्रवासी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!