‘विलेक्शन’ ची विलक्षण डुटी – प्रा.पंकज चव्हाण

‘विलेक्शन’ च्या ‘डूटी’ ची ऑर्डर आली की प्रत्येकाच्या पोटात गोळा उठतो. विलेक्शन ची डूटी आल्यावर आनंदाने नाचणारा विरळाच ..( कदाचित तो तहसील मध्ये सापडेलही !! ). ऑर्डर type होतानाही काही वेळा नजरचुकीने एखादे कार्यालय ” राहून जाते ” तर एखाद्या शिक्षण संस्थेतला सगळाच staff डुटीवर जुंपला जातो. अधिका-यांचे व कर्मचा- यांचे पद व वेतन लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना duty देण्यात यावी हे Election commission चे निर्देश ही अनेक ठिकाणी धाब्यावर बसवले जातात.
मग ती ऑर्डर ह्या ना त्या कारणाने cancel करण्यासाठी कर्मचारी धडपडू लागतात. त्यासाठी,
जीभेवर कायम कडू गोळी चघळतच स्वत: च्या कार्यालयातील वरिष्ठांशी बोलण्याची शपथ घेतलेल्या काही कर्मचा-यांची शुगर ह्याचवेळेस प्रमाणापेक्षा वाढते तर नेहमीच कुठलेही काम मुंगीच्या गतीने करणा- यांचे रक्त ह्याच काळात उसळते . कुणाच्या भावनांचा विचारसुध्दा न करणा-यांच्या हृदयाचे ठोके नेमके विलेक्शनच्या ऑर्डर आल्या की वाढतात आणि आयुष्यातल्या प्रत्येक समस्येपासून पळण्याच्या कला ज्याना पारंगत असतात ते अगदी बेमालूमपणे ह्यातून सुटतात. (आणि ड्युटी cancel केल्याबद्दल कमालीची “शासकीय” गुप्तताही बाळगतात !! ) पण एखाद्याच्या घरी एखादी अघटित घटना घडली तरी Duty लावणारे ” दिवस ” मोजायलाही मागेपुढे पहात नाहीत आणि, “कार्य उरकतेय ना election च्या दिवसापर्यंत … मग डुटी करायला काय अडचण आहे ? ” असेही निर्लज्जपणे विचारायला कमी करत नाहीत. त्यामुळे सामान्य पापभीरू अधिकारी / कर्मचारी मात्र ही ड्युटी cancel करण्याच्या फंदात पडत नाही. कामाच्या भीतीने नव्हे तर ड्युटी cancel करायला गेलो तर चारचौघांसमोर विनाकारण अपमानित होण्याच्या शक्यतेने आणि “त्या ” दोन दिवसांच्या डूटीच्या ऑर्डर मध्ये शेवटी उल्लेखिलेल्या ” निवडणुकीच्या महत्त्वाच्या कामात कसूर केल्यास आपणाविरुध्द लोकप्रतिनिधित्त्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई करणेत येईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी ” ह्या गनिमी तळटीपे मुळे ! त्यामुळे वर नमूद केलेले आजार प्रत्यक्षात झालेला कर्मचारीही ऑर्डर cancel करण्याच्या प्रयत्नात पडत नाही .
मग सुरू होतो तो election class मधल्या training चा सिलसिला . हापूस आंब्याच्या चवीसारखा हा अनुभवायचा विषय आहे. क्लास सुरू झाल्यावर , सुरूवातीलाच ” जे पहिल्यांदाच ही duty करताहेत त्यानी हात वर करा ” असे आवाहन केले जाते . आपली डुटी कदाचित cancel होईल म्हणून मग भोळ्याभाबड्या आशेने नवोदित हात वर करतात पण , वर आलेले हात जास्त असतील तर “आपण सर्वानीच आता अधिक जबाबदारीने काम करायला हवे ” आणि कमी असतील तर ” आपणही आता ह्या कामाचा ‘आनंद'(?) घेणार आहात ” असे रावसाहेब म्हणतात. ऱावसाहेबानी हा ज्योक केला असे समजून सगळे उपस्थित बाळासाहेब फिदीफिदी हसतात . त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आम्हीही मागे नाही ह्याचा प्रत्यय देणारे एक पॉवरप्वाईंट प्रेझेंटेशन दिले जाते . Election duty कशी करावी .. वेगवेगळे forms भरून ते वेगवेगळ्या बावीस तेवीस लखोट्यांमध्ये कसे सील करावेत .. चुकले तर “खाकी वर्दी” तला माणूस आपल्या घरी कसा येईल आणि मग त्याचा तुम्हाला कसा त्रास होईल ह्याचे रसभरीत वर्णन केले जाते . डुटी कशी असते व ती कशी करावी ह्यावर तयार केलेली film दाखवली जाते . ती बघून पहिल्यांदाच Duty करणारे भारावून जातात आणि ह्या Duty चा अनुभव असलेले reel life आणि real life मधील फरक मनातच अधोरेखित करतात .त्यानंतर काही खेळीमेळीचे सवाल जबाब होतात . अशा दोन तीन housefull classes नंतर आता तुम्ही मतदान केंद्रावरचे ” राजे ” आहात असे तुम्हाला ठासून सांगितले जाते . Election च्या आदल्या दिवशी सकाळीच साहित्य नेण्यासाठी सगळ्याना बोलावले जाते . दिलेले साहित्य तपासून घेण्याच्या सूचनांचा भडिमार कर्ण कर्कश पणे सुरू असतो . त्या साहित्यात आयुष्यात कधीही न ऐकलेल्या कंपनीचे ब्लेडस , कंपनीचे नाव नसलेली पेन्सिल, जरा ताणली की तुटणारी रबर बॅंड्स, पाण्याइतकाच प्रवाही डिंक अशासारख्या अनेक जादुई वस्तू ! प्राणापलिकडे जपावयास हवीत अशी मतदान यंत्रे आणि ही जादूची पोतडी वळकटीला मारून हा ” राजा ” बसमध्ये चढतो . तास दीड तासाच्या अनोळखी रस्त्यावरून प्रवास करून एखाद्या जि. प. च्या शाळेतल्या आपल्या मतदान केंद्रावर पोचतो . राजाच्या सैन्यासह आगमनाने शाळेतले गुर्जी बाहेर येतात . पाठोपाठ पोरंही… परग्रहावरून कुणीतरी आलेय असे भाव डोळ्यात घेऊन टकटका बघत उभी रहातात ..
” या ” म्हणत गुर्जी मतदान केंद्राचा नंबर लिहिलेल्या एका वर्गाचे कुलूप उघडतात. आतमध्ये कडी नसलेल्या दोन तीन खिडक्या , दोन बाय दीड फुटाचे फळकूट मारून तयार केलेली लंगडणारी दोन चार टेबले , बसल्यावर तुटेल की काय असा आधीच वाकलेला बाक, दोन तीन प्लॅस्टिकच्या खुर्च्या आणि वायरच्या सहाय्याने छतापासून फासावर घेतल्यासारखा लोंबकळणारा शंभर वॅटचा दिवसा पण जळणारा दिवा !!
” ‘ह्याचे’ बटण कुठाय .. ? “केंद्राध्यक्षाची energy saved is energy generated ह्या दृष्टीकोनातून विचारपूस ..
“बटन नाय … direct हाये तो .. election च्या दिवसापुरता .. इतर दिवशी इथे दिवसा पॉवरच नसते आठ आठ तास .. ” गुर्जी माहिती पुरवतात ..
” आनि काय पायजेल का ? ”
” जरा एखादा झाडू आणि सतरंजी मिळतेय का बघा” सैन्यातला एक सैनिक धीर धरून म्हणतो .
” अरे जा रे .. ऑफिसमधून झाडू अन सतरंजी घिऊन या ” गुर्जी फर्मान सोडतात .. दोन पोरं पळत सुटतात .. एक जण झाडू आणि दुसरं शेंबडं पोरगं एक मनगट नाकावरनं ओढत आणि नंतर तेच सतरंजीवर घासत अर्ध्या मिनिटात हजर होतात .. ” चला रे .. घरी जावा आता .. ” मास्तरांच्या आज्ञेबरोबर सगळी पांगतात .
“समोर पटांगणाच्या पलीकडे टॉयलेट आहे .. त्याला कुलूप घातलेय .. तसा तो वापरला जात नाही कधीच .. त्यामुळे जरा आत घाण आहे पण दरवाजा आहे .. आतून कडी नाही पण बादली लावून ठेवा आतून दरवाज्याला अन पाणी इथून घिऊन जा .तशी टाकी भरलेली असते पण एका ठिकाणी लिक आहे त्यामुळे अर्धी बादलीच घ्या .. नाहीतर पुरायचे नाही सगळ्यास्नी . ही चावी कुलूपाची !.. बरं निघू का मी ? ” गुर्जी मोटार सायकलला किक मारत निरोप घेतात !
“राजा” आता शिपायासह स्वच्छता अभियानाच्या मोहिमेला सुरूवात करतो. धुळीनं माखलेली आणि चार ठिकाणी भोकं पडलेली सतरंजी झटकून अंथरली जाते. घरून आणलेले डबे उघडले जातात ..सैन्यातल्या सैनिकांचे एकमेकांशी संवाद होतात .. उद्याच्या रणभूमीचे आराखडे बांधले जातात . थोड्या वेळाने पांढ-याशुभ्र कपड्यातले तलाठी, ग्रामसेवकासह हजर !
” रातीच्या आन उद्याच्या जेवनाची व्येवस्था सांगितलीय बचत गटाला ! इथं भात शिजतोच पोरांसाठी .. तुमच्यासाठी आमटी न शिरा असा extra फक्कड बेत (?) सांगून ठेवलाय .. ”
संध्याकाळ होत जाते तसा काळोख साचत जातो . सगळीकडे अंधार …फक्त बूथवरचा शंभर वॅटचा दिवा जळत असतो . रात्री जेवताना तिखट आमटीचा ठसका लागल्यावर .. पाण्याचा ग्लास तोंडाला लावताना वाढणारा म्हणतो .. ” साहेब .. पानी जरा कमीच प्या .. बोअरचे हाये .. ” उरलेले सैनिक मग थोडासा शिरा खाऊन उठतात ..
खेड्यापासून पाच दहा किलोमीटर वर असलेल्या वस्तीवरच्या त्या शाळेतल्या गडद अंधारलेल्या पटांगणात “सैनिक” रेंज नसलेल्या मोबाईल वर घरच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतात ..
दिवसभराच्या थकव्याने फाटक्या सतरंजीवर पाठ टाकतात .. झोप लागणार नाही ह्याची खात्री असतेच . त्यातून दिव्याचा प्रकाश अधिक लख्ख होत जातो . कासव छाप लावूनही गुड नाईट न करणारे डास कानाभोवती अखंड गात असतात . शाळेमागच्या गोठ्यातून येणा-या माशांची त्यात भर.. शेणाच्या वासाने गुदमरतेय म्हणून कुणी नाकाला विक्स चोळतो तर कुणी अंगाला ओडोमॉस ! सोबत दरवाज्याला आतून कडी नसल्याने उघड्या दरवाजातून आत येणारी बेडके .. हंबरणा-या म्हशी , एक सूर लावून रडणारी वस्तीवरची अनेक कुत्री आणि उद्याची “फिल्डिंग” लावण्यात मग्न असलेल्या मोटार सायकलींचे आवाज झोपण्याच्या सगळ्या शक्यता धुळीस मिळवतात . त्यातून अपरात्री,दोन तीन वाजता डूटीवरच्या पोलीसाची वर्दी घ्यायला हॉर्न वाजवत जीप येते आणि मग झोपायचे उरलेले मनसुबेही उधळले जातात . आता ” अलारामा ” ची वाट पहात सगळे जागे रहातात. एकदाचा अलाराम वाजतो . रात्रभर राजासह जागे असलेले सैनिक पटापट उठतात .
“दरवाजा आहे ” इतकीच काय ती सोय आणि गाव ” हागणदारी मुक्त ” असल्याने बाहेर जायची सोय नसल्याने मिट्ट काळोखात मोबाईलच्या फ्लॅश लाईट मध्ये पायात साप बिप तर येणार नाही ना ह्याचा अंदाज घेत सैनिक सकाळची कामे उरकतात . आंघोळीचा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही . सात वाजेपर्यंत राजासह सगळे सैनिक मतदान यंत्रे सज्ज करून लढाईसाठी तयार होतात . मग उमेदवार हळद कुंकू ,नारळ, हार घेऊन यंत्राची पूजा करायचा हट्ट धरतात .. तशी परवानगी नसल्याचे सांगितले की ” तसा जी. आर . कुठाय दाखवा ” अशी शासकीय विचारणाही करतात .. दिवसभरात पुढे काय वाढून ठेवलेय ह्याची जाणीव सैनिकांना होते.
मान वर न करता दिवसभर सैनिक कामात गढून जातात . त्यातच साडेपाच कसे वाजले कळत नाही .. मतदान संपल्यावर सगळे लखोटे , यंत्रे सील करेतोवर तासभर जातो .. आता हे सगळे पुन्हा जमा करायचे असते ..न्यायला येणा-या बसची सगळेच आतुरतेने वाट पहात असतात. एका बसमध्ये सात आठ बूथचे तीस चाळीस सैनिक साहित्यासह दिवसभरातल्या गमती शेअर करीत असतात . बसमधून उतरताच जो तो आपले साहित्य पहिल्यांदा कसे जमा होईल म्हणून धावत सुटतो . मग त्याला पटांगणात बसलेले काही सैनिक सील केलेली पाकिटे फोडताना दिसतात तर काही सैनिक मेणबत्त्या पेटवून नवी पाकिटे सील करताना दिसतात आणि मग election च्या क्लासमध्ये आपण मन लावून training न घेतल्याची हुरहूर लागते . त्यातच ऱाजा सैनिकांसह साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी पोचतो . तिथे त्याच्या आधीच आणखी काही राजे आपापल्या सैनिकांसह साहित्य जमा करण्याच्या लढाईत हातघाईवर आलेले असतात . अखेरीस “कालचा गोंधळ बरा होता” अशी म्हणायची वेळ येते . एकदाचे साहित्य जमा होते तेव्हा रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली असते . “पोचवले एकदाचे ” म्हणून दमून भागून राजा आणि सैनिक घरी आल्यावर आंघोळ करतात.
दुस-या दिवशी कालच्या अनुभवांवर प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये तिखट मीठ लावून चर्चा रंगतात आणि हे राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाच्या दिवशी योगायोगाने तुमचा वाढदिवस असेल तर चर्चेला अधिकच गुलाबी रंग चढतात ..!!

प्रा. पंकज चव्हाण

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!