वेड घेऊन पेडगावला जाणारे…! – योगेश वसंत त्रिवेदी

लोकसभेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यांत आल्या आहेत. सर्वत्र प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडविला जातोय.  त्यातच नेत्यांची एक एक भाषणे याच धुरळ्याला वेगवेगळे रंग देत आहेत. जो तो आपापल्या पध्दतीने अर्थ काढून असलेली नसलेली पाजळण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि महायुतीचे तमाम नेते यांनी जो प्रचाराचा जबरदस्त झंझावात निर्माण केला आहे. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची प्रचंड दाणादाण उडाली आहे. भरीस भर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर, अकलुज, नाशिक, नंदुरबार येथे जी प्रचंड जाहीर सभा झाली आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सहकार सम्राट विजयसिंह मोहिते पाटील यांनी जो अभूतपुर्व प्रतिसाद दिला त्यामुळे विरोधकांची तर  दातखिळीच बसली आहे. अ अ च्या म्हणजेणजे अहमदनगर अकलूज महायुतीच्या  जाहीर सभांमुळे विरोधक त त प प करु लागले आहेत. त्यामुळे घटनात्मक पदे भूषविणारे विरोधकही स्वतः काय बोलतोय याचं भान त्यांना राहिलेलं नाही, असे सांगण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असुन ते विधानसभेचे सदस्य आहेत. पक्षांतरप्रतिबंधक कायद्याच्या अस्तित्वामुळे आणि विधानसभेची मुदत अजून सहा महिने असल्याने विखे पाटील हे सरळ भाजपाच्या  व्यासपीठावर जाऊ शकत नाहीत. पण ते व्यासपीठाच्या आसपास होते. सभेची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत होते. दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील हे ही माढाचे विद्यमान खासदार असल्याने तो थेट भाजपाचे सदस्यत्व स्वीकारु शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंहांची दादा म्हणून आदरार्थी उल्लेख करुन त्यांच्या ५० वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वपूर्ण मौलिक योगदानाबदल व्यासपिठावर सत्कार, सन्मान, बहुमान केला. भारताच्या लोकप्रिय पंतप्रधानांनी केलेल्या एका जेष्ठ संसदपटूचा सत्कार होता. पण डोळ्यावर पिवळ्या रंगाचा  चष्मा लावलेल्या विरोधकांनी, ज्यांनी घटनात्मक शपथ घेवून कधी काळी महत्त्वाची पदे भूषविली त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश का केला नाही ? असा सवाल करुन आपल्या बुध्दिमत्तेचे प्रदर्शन केले अशीच चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपात प्रवेश करुन ते अहमदनगरहून लोकसभा निवडणूक लढवताहेत तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन आगामी विधानसभेची तयारी करतानाच रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या माढाच्या उमेदवारीला भरभरुन समर्थन दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे काँग्रेस पक्षातील विरोधकांनी या निमित्ताने विखे पाटील यांच्यावर आरोप केले नाहीत तरच नवल. राजकारण, युध्द आणि प्रेम यात सारे काही क्षम्य आहे, सारे काही योग्य आहे हे एकदा मान्य केल्यानंतर आपल्या डोक्याला ताण देण्याची गरज नाही. पण काही लोकांना डोकं खाजवीत बसायची सवय पडलेली असते त्याला काय करणार! जाणत्या राजाकडून आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं अशी जर ऐंशीव्या वर्षात भूमिका घेतली असेल आणि दुसऱ्यां पोरं सांभाळायचा काही ठेका घेतला आहे काय? असा जर विचार केला असेल तर ठाकरे, मुंडे, तटकरे आणि अन्य घराण्यांच्या ज्या ज्या लोकांनी जाणत्या राजावर विश्वास टाकलाय त्या लोकांचं देव भले करो, एवढचं म्हणणे आपल्या हाती आहे. विरोधकांमधल्या बोलघेवड्या नेत्यांबद्दल काय बोलणार? आपण काय बोलतो? आपण सत्तेवर असताना काय केलं ? याचा अंतर्मनाशी विचार करण्याची सुबुध्दी परमेश्वर त्यांना देवो, हीच प्रार्थना करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे या नेत्यांनी `वेड घेऊन पेडगावला’ जाण्याची जी भूमिका घेतली आहे, त्याचा महाराष्ट्रातील जनता योग्य तो विचार केल्याशिवाय राहणार नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि कायदेपंडीत प्रकाश आंबेडकर यांनी अखिल भारतीय  मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन अर्थात ए आय एम आय एम या पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर आघाडी करुन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान तथागत गौतम बुध्द यांचा धर्म अंगिकारला आहे. हिंदु धर्मात बुध्द हाही भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे. आणि दशावताराच्या आरतीत बौध्द कलंकी कलियुगी अधर्म हा अवघा, सोडुनि दिधला धर्म म्हणुनि न दिसशी देवा’ असे स्पष्ट म्हटले आहे. पण एखादी गोष्ट मान्य करायचीच नाही असे पक्के मनाशी ठरविले असेल तर त्यास आपण काय करणार? असो ! तर मुद्दा हा आहे की असदुदीन ओवेसी हे औरंगाबाद येथे आले आणि त्यांनी बुध्द विहाराला जाण्याचे तसेच भगवान गौतम बुध्द यांना अभिवादन करण्याचे टाळले. तिथले उमेदवार धावत गेले आणि अभिवादन करुन येत सारवासारव करु लागले. ओवेसी यांची ही कृती प्रकाश आंबेडकर यांना मान्य आहे का ? त्यांनी यावर प्रतिक्रिया का दिली नाही ? की मुद्दाम टाळाटाळ केली? की केवळ सोयीचं तेवढेच पाहणार? इस्लाम मध्ये मुर्तिपुजा मान्य नाही म्हणून ओवेसी यांनी बुध्दांना अभिवादन केले नाही असे सांगण्यात येते मग सारवासारव करणारे इम्तियाज जलील का अभिवादन करुन आले ? ते इस्लाम मानत नाहीत का ? ते मुस्लीम नाहीत का? की केवळ मतांसाठी इम्तियाजभाईंनी बौध्दांनां समाधान मिळावे म्हणून ही धावळ केली ? या प्रश्नांची उत्तरे संबंधितांनी आपापल्या मनाशीच द्यावीत. १९४७ साली आपण स्वतंत्र झालो. पण भारताच्या स्वातंत्र्य लढयात वंदे मातरम हा मंत्र महत्त्वाचा होता आाणि तो मंत्र स्वातंत्र्य सैनिकांनी अंगिकारुन हौतात्म्य पत्करले. अनेक स्वातंत्र्य सैनिक आज शंभरीच्या घरात आहेत. त्यात मुस्लीम ही आहेत पण त्यांनीही वंदे मातरम अंगिकारले होते. परभणीच्या एका मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकाचा तर वंदे मातरमला सन्मान देणारी मुलाखत दैनिक `सामना ने प्रसिध्दही केली होती. पण केवळ मतांचं राजकारण करणाऱ्या अशा नेत्यांना कोण बोलणार ?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर काँग्रेस आघाडी सरकारने घाईघाईत अंधश्रध्दा निर्मुलन विधेयक मंजूर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आज महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे पण परवा बारामतीत भाषण करतांना अजित पवार काय बोलून गेले ? बारामतीला दृष्ट लागू नये म्हणून बाहुली उलटी टांगून ठेवा ! आता हे वाक्य बोलण्याच्या ओघात अजितदादा बोलून गेले पण हे वाक्य अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याचा भंग करणारे नाही का ? मग अजित पवार यांच्यावर कोण आणि कशी कारवाई करणार? बरं, माफी मागितली की प्रश्न मिटला. शरद पवारांनी मागे दोनवेळा मतदान करण्याचा सल्ला जाहीर भाषणांतून दिला होता. त्याचे काय ? निवडणुक आयोगाकडे माफीनामा सादर केला की पुन्हा मोकळे. आमचे एक मित्र अंबरनाथचे जुने शिवसैनिक प्रकाश सुळे यांच्याशी चर्चा करीत असतांना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणतात, अहो त्रिवेदी! काँग्रेसच्या राहुल गांधींपासून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत भाजपवर खोटेनाटे आरोप करताहेत. या खोट्या नाट्या आरोपांना भाजपावाले प्रतिउत्तर का देत नाहीत ? खरं आहे, ज्या प्रमाणात खोट्या नाट्या आरोपांना उत्तरे देण्याची गरज आहे त्या प्रमाणात होत नाही. ३० हजार कोटी जर अनिल अंबानींना मिळाले असते तर मुकेश अंबानीना ४५८ कोटी रुपयांची मदत अनिल अंबानीना करण्याची आवश्यकता भासली असती का ? असा सर्वसामान्यांमधून प्रश्न करण्यात येतो. खोटे बोल पण रेटून बोल अशा विरोधकांचा कांगावा आहे. त्यांना मुंहतोड जबाब भाजपाकडून देण्याची गरज आहे. राहुल गांधी राफेल राफेल असे बेंबीच्या देठापासून ओरडताहेत मग त्यात जर तथ्य नाही तर त्यांना प्रतिबंध कोण करणार? राफेल म्हणजे राहुल फेल असे म्हटलं जातं पण जर चुकीचे आरोप करुन जर असे नेते मोठे होण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे. आणि देशातली जनता अशा नेत्यांना ताळयावर आणल्याशिवाय राहणार नाही. वेड घेऊन पेडगावला जाणाऱ्यांबद्दल काय बोलणार ? मतपेटीतून उत्तर देऊ या ! सर्वांनी १०० टक्के मतदान करु या !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!