व्यसनांच्या विळख्यातून पालघर जिल्ह्याला मुक्त करणार – खा.राजेंद्र गावीत

नालासोपारा (वार्ताहर) : जिल्ह्यातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी खा राजेंद्र गावित नालासोपारा येथील श्री नवीन दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले असता कु पूजा अरुण कट्टी (युवती सेना समन्वयक विधानसभा नालासोपारा-विरार) यांनी पालघर जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची पायमल्ली होत असल्याची तक्रार केली.

सदर कायदान्वये शाळेच्या गेट पासुन १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्याची तरतूद तसेच २००/- दंड आकरण्याची सोय असताना देखील स्थानिक प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अधिकृत संकेतस्थळावर दि २४ नोव्हेंबर २०१९ रोजी कू पूजा कट्टी यांनी पुराव्यांसहीत निवेदन सादर केले व त्याचा पाठपुरावा देखील केला; परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे तसेच सामान्य नागरिकांच्या तक्रारीला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे अशी तक्रार उपस्थित करण्यात आली. प्रशासन नेहमी सांगते सामान्य नागरिकांचा सहभाग हवा परंतु येथे चित्र उलटे दिसत असल्याचे स्पष्ट मत कु पूजा अरुण कट्टी यांनी खा राजेंद्र गावित यांच्याकडे मांडले. पालघर जिल्हा कुपोषणाने ग्रस्त असताना देशाची भावी पिढी व्यसनांच्या आहारी जात असताना प्रशासनाने सदर कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरतेने करणे आवश्यक असून आकारला जाणारा दंड २००/- रू वरून ५०००/- करावा जेणेकरुन अश्या अनैतिक प्रकाराला आळा बसवता येईल.

व्यसनमुक्ती पालघर! सक्षम पालघर! करण्यासाठी व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढायची मोठी जबाबदारी प्रशासनावर तसेच जागृत नागरिकांवर आहे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे आश्वासन खा राजेंद्र गावित यांनी उपस्थित नागरिकांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!