शरद पवारांची ही शेवटची लढाई…! – जयंत करंजवकर    

राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार माढा मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढविणार ही बातमी  वा-यासारखी पसरली आणि त्यावर सर्वच पक्षात चर्चा सुरू झाली. शरद पवार हे राजकारणातले मोठे जादुगार आहेत. त्यांच्या पोतडीत काय काय असेल हे कोणालाच सांगता येणार नाही.  एकदा त्यांनी यापुढे मी खासदारकीची निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली होती आणि अनेकांना हायसे वाटले विशेषतः विरोधकांना… परंतु त्याचवेळी राजकारणातले पाणी कोळून प्यालेले नेते मंडळींना ठाऊक आहे की, पवारांच्या नकारात होकार आणि होकारात नकार असतो. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विश्वासातील  दिवंगत ज्येष्ठ नेते व  केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांच्या कारकिर्दीत हवाला प्रकरण गाजले होते, जसे आज राफेल विमान खरेदी प्रकरण गाजत आहे तसे. अनेक राजकीय नेत्यांची नावे बाहेर पडत होती.  शरद पवारांचे हवाला प्रकरणात नाव नसल्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांना आश्चर्य वाटले. एका काँग्रेसच्या नेत्याने विठ्ठलराव गाडगीळ यांना विचारले की, अनेकांची नावे हवाला रॅकेटमध्ये आहेत, मग शरद पवारांचे नाव कसे नाही? त्यावेळी पवारांचे भूखंड, दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध जोडले जात होते, त्यामुळे त्या नेत्याने गाडगीळांना हा प्रश्न विचारला असावा. परंतु विठ्ठलराव गाडगीळ यांनी मात्र त्या नेत्याला समर्पक उत्तर दिले की, ‘हवाला’ हा विश्वासावर चालतो ! हे मार्मिक उत्तर ऐकून त्या नेत्याने डोक्याला हात लावला आणि विठ्ठलरावांचे आभार मानून बाहेर पडला. थोडक्यात ‘विश्वास’ या शब्दाशी पवारांचा काडीमात्र संबंध नाही.  साधारण ४० वर्षांपूर्वी सांगितलेला हा किस्सा आजही पवारांना लागू पडतो. चार वर्षांपूर्वीचे उदाहरण घेऊ या, चार वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्प मतात असतांना फडणवीस यांनी पाठींबा मागितला नसताना पवारांच्या राष्ट्रवादीने बाहेरून पाठींबा दिला होता. याबाबत राज्यभर देवेंद्र फडणवीस यांची छितू झालीच पण शरद पवारांचा खरा चेहरा समोर त्यावेळी जनतेसमोर आला. स्वतःला  सेक्युलर समजणारे पवार यांनी  सांप्रतवादी भाजपला पाठींबा दिला आणि त्यांच्या पक्षातच उलटसुलट चर्चा सुरु झाली. त्यावेळी अजितदादा पवार यांचे ७१ हजार कोटी रुपये   भ्रष्ट्राचार प्रकरण गाजत होते.. त्यासाठी पवारांचा ही खेळी असावी अशी चर्चा होती. अर्थात पवारांची ही खेळी यशस्वी होऊ नये म्हणून  भाजपाची ऑफर आल्यानंतर शिवसेना फडणवीस सरकारमध्ये सामील झाली. 
        आता शरद पवार यांनी माढा मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पवारांसाठी जागा सोडण्याची तयारी केली आहे. म्हणजे माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार लढणार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने ते निवडून येणार याबद्दल दुमत नाही. वयाच्या ८० वर्षाकडे वाटचाल करणारे शरद पवार यांची या वयातही पंतप्रधान होण्याची दांडगी इच्छा लपून राहिली नाही. दांडगी इच्छा असली तरी त्यांच्यातला स्वतःच्या प्रतिमेभोवती पिंगा घालणे या स्वभावाला ते मुरड घालू शकत नाहीत.  परंतु हा त्यांचा स्वभाव असा असला तरी आताच्या मोदी विरोधी वातावरणाने त्यांना अधिक ऊर्जा मिळाली आहे,  ती महागठबंधनामुळे. लोकसभा निवडणूक केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास महागठबंधन सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेईल. त्यावेळी राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांना विरोध करण्यासाठी पडद्याआड शरद पवार महागठबंधनमधील मित्र स्वतःच्या बाजूला वळविण्यासाठी  खेळी करतील किंवा स्वतःचे नाव पुढे करण्यासाठी ते  मित्र पक्षांना अर्थपूर्ण मदत करतील. या करामतीमध्ये शरद पवार किती यशस्वी होतील अशी शंका निर्माण होत आहे. नरसिंह राव पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना शरद पवार यांनी पंतप्रधान होण्यासाठी काँग्रेसमध्ये समर्थकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तत्कालीन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार राजदीप सरदेसाई आणि महाराष्ट्र टाइम्सचे प्रकाश अकोलकर या दोन पत्रकारांना बोलावून त्यांना शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी खासदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपये वाटत असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली. राजदीप सरदेसाई आणि प्रकाश अकोलकर यांनी दुस-या दिवशी दैनिकात बातमी छापली आणि पवारांची पंतप्रधानपदाची विकेट पडली आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले. पवारांनी ही चाल पुन्हा केली व हा फार्मूला काँग्रेस पक्षाने वापरला तर पवारांच्या पंतप्रधान पदावर वरवंटा फिरविला जाईल. तो ही विलासराव देशमुख यांचे मित्र व गांधी घराण्याशी एकनिष्ठ  सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्फत ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
         दुसरं राजकीय गणित म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पप्पू राहिले नाहीत. गुजरात विधान सभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आरमाराचा चांगलाच घामटा काढला होता. त्याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातून भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचले. आता तर राफेल विमान खरेदी प्रकरणात ते सातत्याने सरकारवर आरोप करत ‘चौकीदार चोर है” असे सुरू करत आले. काँग्रेसचे नशीब एवढं बलवत्तर की        ‘द हिंदू’ या प्रतिष्ठित दैनिकाने पंतप्रधान कार्यालयातून प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल खरेदी व्यवहारात कसा हात होता याचे कागदपुरावे प्रसिद्ध केल्याने नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेले उत्तर म्हणजे मोदींचे उत्तर देशवासीयांची दिशाभूल करणारी होते हे सिद्ध झाले आहे.काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांना ही संधी निवडणूक प्रचारात सुवर्ण संधी आहे.
        आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ७० ते ८० जागा गमवाव्या लागतील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी या दोघांना मिळून ४० जागा, कोलकत्ताच्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला अंदाजे ३० किंवा ४२ जागा मिळतील. प्रियांका गांधी यांना कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदावर विराजनाहीतम केल्यामुळे उत्तर भारतीयांची नेहरू – गांधी परिवाराबाबत असलेला स्नेह लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १० जागा मिळू शकतात याचा अर्थ काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांना ५० जागा तर भाजपाला २५ ते ३० जागांवर समाधान मानावे लागेल. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच ईशान्य भारतात भाजपाला पूर्वी इतके मतदान होणार नाही, दक्षिणेतील राज्यातही भाजपाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळणार नाही. या सर्व परिस्थितीचा शरद पवारांनी अंदाज घेतला असेल आणि महागठबंधनाला सोनियाचे दिवस येतील असा विचार करून त्यांनी माढातून उभे राहण्याचा निर्णय घेतला असेल. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याचा सर्वांना अभिमान आहे. परंतु शरद पवारांची विश्वासार्हता प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ शकतो त्याशिवाय त्यांचे क्षिरसागर सारखे नेते भाजपाच्या वाटेवर का ?  हा गंभीर विषय त्यांना पंतप्रधान होण्यास मोठा अडथळा निर्माण करणार आहे. माढा तून निवडून येतील पण आढात काय ? याचाही पवार आणि सरदारांना विचार करावा लागेल. शरद पवारांचे  कॉंग्रेसवासी झालेले तारिक अन्वर  यांचा वापर  काँग्रेसचे नेते करतील. इथेच पवारांचे पानिपत होऊ शकते. पानिपत युद्धात ‘विश्वास’राव मारला गेला. लोकसभा निवडणुकीतही  ‘विश्वासघातकी’ मारला जाईल आणि इतिहासात त्याची वेगळ्या रुपात दखल घेतली जाईल.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!