शरद पवार आणि अर्धी चड्डी – जयंत करंजवकर

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करून शरद पवारांना धक्का देऊन त्यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व मनसुबे धुळीस मिळविले. आपल्या शब्दापलिकडे कोणीही जाऊ शकत नाही, या घमेंडीत असलेल्या पवारांना आयुष्यात हा मोठा झटका मिळाला आहे. छगन भुजबळांना शिवसेनेतून आणताना मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात ते त्यावेळी वावरत होते.      दुस-या पक्षातील ‘मिळकत’ स्वतःच्या पक्षात  आणून पक्षाची श्रीमंती वाढल्याचा आभास निर्माण होतो, पण पक्ष त्या क्षणापूरता सुजलेला असतो ही वस्तुस्थिती  पवारांना माहीत असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आज नियती त्याचा सूड घेताना दिसत आहे.
        खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी सामाजिक कार्यात ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अकलूज येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायपुढे सत्कार केला. कदाचित शरदरावांना हा प्रकार खटकला असेल.  खरं पाहता राष्ट्रवादीने वर्षांपूर्वीच विजयसिंह यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची तयारी करायला पाहिजे होती. पण आपल्यापेक्षा मोठा कोणीही होता कामा नये, ही मानसिकता शरदरावांनी कायम ठेवल्याने ही सुवर्णसंधी कायमची गमवावी लागली. पवारांनी ६१ वी मोठया दणक्यात महालक्ष्मीच्या भव्य मैदानात केली. मात्र त्यांचा अमृतमहोत्सव पाहिजे तसा साजरा करता आला नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते  नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात  भर पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना ७५ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी राज्यात भाजपाचे सरकार होते.  राष्ट्रवादीचे नेते हेमराज शहा यांच्यावर पक्षाने वह्या छापण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती.  दुर्दैव असे की, हेमराज शहा यांनी अनेक माजी मंत्री व आमदार यांच्याकडे वह्यांसाठी रक्कम मागितली, पण जाणता राजासाठी कोणीही पैसा देत नव्हता. शेवटी राष्ट्रवादीला कंटाळून हेमराज शहा शिवसेनेत गेले. सत्ता असेल तरच पुढारीपणाची आब असते. नंतर पक्षाच्या अध्यक्षाला कसे वाटण्याचे अक्षता दाखविले जातात हे शरद पवारांना कळू नये ?
तर खरा मुद्दा हा की, विजयसिंह आज राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पवारांनी स्वाभिमानाने त्यांना पक्षातून काढायला पाहिजे, पण तसे करण्याचे त्यांनी धाडस केले नाही आणि करणार नाहीत. तसं करता येत नाही म्हणून शरद पवारांनी विजयसिंह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अर्धी चड्डी घालून भाजपाच्या नेत्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसण्यास सांगितले. त्यांचे हे विधान म्हणजे त्यांच्या संयमतेचा कडेलोट झाल्याचे लक्षात येते.
        शरद पवारांनी सन १९७८ मध्ये काँग्रेस पक्षाला धोका देऊन पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यावेळी जनसंघालाही सरकारात सामील करून घेतले. जनसंघाचे उत्तमराव पाटील हे तर महसूल मंत्री, हाशू अडवाणी नगरविकास मंत्री तर श्रीमती प्रमिला टोपले ह्या आरोग्यमंत्री होत्या. त्यावेळी गांधीवादी विचारांचे पवारांना आपल्याला अर्धी चड्डीवाल्यासोबत बसण्याची नामुष्की येणार आहे हा विचार मनात आला नाही. केंद्रात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना ते राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापना समितीचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे वाजपेयींनी त्यांना मंत्री दर्जा दिला होता. त्यामुळे लोकसभेत मागच्या आसनावर बसलेले शरद पवार यांना वाजपेयींनी पुढे बसण्याची संधी देऊन त्यांचा सन्मान केला. आता विजयसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार हे काही लपून राहिले नाही. परंतु आपल्यापुढे कोणीही जाऊ नये आणि गेला तर त्याची बेइज्जत करणे एवढेच त्यांच्या हातात उरले आहे. आपण करतो ते बरोबर आणि पक्षातील अन्य कोणी केले तर टीकास्त्र सोडायचे. आज पवारांचा राष्ट्रवादीचे जहाज कसे बसे तरले आहे. लोकसभा निवडणुकीचा २३ मे नंतर निकाल लागल्यावर त्यांच्या जहाजातून किती निष्ठावंत उंदरांसारखे उड्या मारतात हे पवारांना पाहावे लागेल.  जीवनात पडता काळ येतो, परंतु शरद पवार सारख्या जाणता राजाच्या हातून असे घडेल असे वाटत नव्हते.  वयोमानानुसार त्यांनी छगन भुजबळ किंवा अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी सोपवली असती आणि स्वतः मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली असती, तर राष्ट्रावादीची शान राहिली असती. भाकरी वेळीच परतवली नाही तर ती करपते… राष्ट्रवादीची ही अवस्था का झाली? हे जाणता राजाला सांगणे म्हणजे धाडसाचेच होईल.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!