शाळेत शिक्षण व कुटुंबात संस्कार देणाऱ्या शिक्षिका लुजान डाबरे यांचे कार्य कौतुकास्पद – आम.हितेंद्र ठाकूर

नालासोपारा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत अमराठी मुलांना शिक्षण देणे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुसंस्कार देणे ही दोन्ही अवघड मात्र आवश्यक कामं भुईगावच्या सेवानिवृत्त शिक्षिका लुजान आल्फान्सो डाबरे यांनी केली आहेत.आणि प्रामाणिक शिक्षकच असे समाज घडविण्यात पुढे असतात. अशा शिक्षकांचा गौरव झालाच पाहिजे. म्हणूनच आज सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लुजान डाबरे या गौरवास पात्र ठरतात. अशा शब्दात आम.हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या ३९ वर्षांच्या सेवेचा गौरव केला.

भुईगाव चर्च मैदानात काल झालेल्या गौरव सोहळयाचे ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक हे अध्यक्षस्थानी होते. भुईगाव चर्चचे धर्मगुरू फा.बाप्टिस्ट लोपीस, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज,  नारायण (दादा) नाईक, डॉ. हेमंत पाटील,ज्येष्ठ नगरसेवक फ्रँक डिसूझा आपटे, वसई विकास बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, ऍंटोन डिसुझा आणि गौरवमुर्ती लुजान डाबरे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात आम.हितेंद्र ठाकूर यांनी गैरसोयीची शाळा मिळूनही या डाबरे बाई, नंदखालच्या श्रीमती रुमाव बाई यांनी कधीच बदलीची मागणी केली नाही हे इथे मला उल्लेखनीय वाटते. सेवानिवृत्ती म्हणजे सामाजिक कार्य करण्यास मोकळीक असे माझे मत आहे. ओपीस माझा जुना कार्यकर्ता तो सतत बोलतो.प्रश्न मांडतो. त्याचा हा स्वभाव बघता लुजान बाईंनी शाळेत बडबडी मुलं आणि घरी बडबडा पती असा संसार सुखाचा केला याचेही मला आश्चर्य वाटते, (उपस्थितात प्रचंड हशा) असेही मत व्यक्त केले.

 ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक यांनीही लुजान डाबरे यांच्या दीर्घ शिक्षणसेवेचा गौरवपूर्ण उल्लेख करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  फा.लोपीस यांनी डाबरे कुटुंबियांना आशिर्वाद दिला. ओपीस तथा आल्फान्सो डाबरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत सर्वांचे स्वागत केले. आभार प्रदर्शनही त्यांनीच केले. लुजान बाईंच्या सूनबाई सिंथिया प्रियाल डाबरे यांनी या सोहळयाचे सूत्रसंचलन केले.  डाबरे परिवारातील अनेक सदस्य, भुईगावचे नागरिक, अनेक शिक्षिका व विद्यार्थी या ह्रद्य सोहळयात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: