शिवचरित्र अभ्यास राष्ट्र निर्मितीचे प्रमुख साधन “महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे”

वसई : दिनांक ११ जानेवारी २०२० शनिवार रोजी पालघर जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणाऱ्या स्पर्श फाउंडेशन व युवा शक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय श्री शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता.

स्थानिक अभ्यासक, इतिहासप्रेमी, दुर्गमित्र, संशोधक, निसर्गमित्र, राजकीय मान्यवर अधिकारी इत्यादींच्या उपस्थित संपन्न झालेल्या या समारंभात सत्कारास उत्तर देताना शिवशाहीरांनी छत्रपती शिवाजी महाराज व भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवन चरित्राचे अभ्यास किती महत्वाचे आहे यावर भाष्य सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुप्रसिद्ध गायिका वैदेही मुळीक आणि संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या वाद्यवृंदाने शिवकल्यानं राजा हा संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृंद कार्यक्रमाचे बाबासाहेबांनी विशेष कौतुक केले. बाबासाहेबांनी केलेल्या मार्गदर्शनपर सत्रात शिवछत्रपतींचे अकाली निधन, रायगडावरील महत्वाचा मोडी लिपीतील अमूल्य पत्रव्यवहार, शिवराजमुद्रा महत्व, शिवछत्रपतींच्या व्यापक दृष्टीकोन, गडकोटांबाबत भूमिका, जुन्या आठवणी, शिवचरित्र आणि राष्ट्रनिर्मिती, परकीय राजवटींच्या नजरेतून शिवाजी महाराज इत्यादी अनेक विषयांवर ज्ञानाचा खजिना उपस्थित मान्यवरांना उपलब्ध झाला.

या कार्यक्रमात डॉ श्रीदत्त राऊत, प्रशांत सातवी, सौ संगीता धोंडे या तीन मान्यवरांनी पालघर जिल्ह्यातील त्यांच्या कामावर उपस्थित लोकांना माहिती दिली. स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.संगीता धोंडे यांनी स्पर्श फाऊंडेशनचे कार्य व त्यामागील भूमिका यावर सविस्तर माहिती दिली, तसेच कार्यक्रमाची आयोजनाबाबतची भूमिका यावर मार्गदर्शन केले. युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रशांत सातवी यांनी युवा शक्ती माध्यमातून केलेले उपक्रम, युवकांचा सहभाग, कोल्हापूर पूरग्रस्त भागातील मदत कार्य, गडकोट संवर्धन जागृती, शालेय विद्यार्थ्यांना प्रदर्शन माध्यमातून मार्गदर्शन, ग्रामीण भागातील कार्य, आगामी उपक्रम यावर संवाद साधला. उत्तर कोकणचे इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत यांनी गडकोटांवरील प्रतिकूल परिस्थिती, पालघर जिल्ह्यातील गडकोटांचे न झालेले नोंदणीकरण व अनधिकृत बांधकाम, किल्ल्यावरील दारूबंदी, गडकोटांवर वाढणारी अश्लील प्री वेडिंग छायाचित्रण समस्या, इतिहास संकलनाची आवश्यकता, आगामी इतिहास संशोधनातील अडचणी व आव्हाने इत्यादी विषयावर थेट संवाद साधला.

राई गावचे दुर्गमित्र हेमेन्द्र भोईर यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची “ज्ञानयोगी” शीर्षक दिलेली भव्य रांगोळी कार्यक्रमात विशेष दाद मिळवून गेली. कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा शक्ती प्रतिष्ठानच्या प्रतिनिधीनी शिवशाहिरांच्या हस्ते गडकोट व सामाजिक उपक्रमांबाबत माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली. सायंकाळी ठीक ७.३० वाजता पसायदान स्मरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात सुप्रसिध्द वास्तुविशारद निशांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रशांत पाटील यांनी केले. सुप्रसिध्द वास्तुविशारद निशांत पाटील यांच्या मते “शिवचरित्र अभ्यासाचे महत्व व शिवकालीन आठवणींना मानवंदना देणारा सदर उपक्रम उपस्थितांच्या चिरंतर स्मरणात राहील यात शंका नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: