शिवस्मारक हा जुमला नी विनायक मेटे स्टंटबाज – दामोदर तांडेल

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीचा बुधवारी शुभारंभ होता, मात्र एका स्पीड बोटीला अपघात झाला आणि हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, शिवस्मारकाची जागाच चुकीची असून हे स्मारक कधीही होणार नाही हा सगळा निवडणुकीचा जुमला आहे आणि विनायक मेटेंनी स्टंट केला आहे असा आरोप मच्छिमार मेते दामोदर तांडेल यांनी केला आहे.
या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही असं सांगताना तांडेल यांनी या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तांडेल यांनी याठिकाणी शिवस्मारक होणे शक्य नसून हा सगळा निवडणुकीसाठीचा जुमला असल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला देताना सांगितलं की मोदीही जलपूजनाच्यावेळी ज्या जागी प्रस्तावित शिवस्मारकाची जागा आहे तिथं गेलेच नव्हते व दुसरीकडेच जलपूजन केले होते. ज्याठिकाणी शिवस्मारकाची जागा निश्चित करण्यात आली आहे तिथं स्पीड बोटी जाऊ शकत नाहीत, आम्हीही त्या भागात जात नाही असं सांगताना तांडेल यांनी या भागाची कसलीही कल्पना नसताना असे प्रकार केले जातात असे म्हटले आहे.
बुधवारी शिवस्मारकाच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात येणार होता. त्यासाठी गेलेल्या स्पीडबोटीचा एका खडकावर आपटून अपघात झाला आणि 25 जण जखमी झाले. नरीमन पॉइंटपासून समुद्रात 2.6 किलोमीटरवर हा अपघात झाला. ही बोट महाराष्ट्र सरकारच्या मालकिची होती आणि हा अपघात घडला त्यावेळी मुख्य सचिवांसह अनेक सरकारी अधिकारी बोटीवर होते. बोटीवरील प्रवाशांना वाचवण्यासाठी दोन बोटी व दोन हेलीकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. बोटीवरील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या अपघाताच्या निमित्तानं शिवस्मारक पुन्हा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत. आजचा शुभारंभाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!