शेतकऱ्यांनी मनापासून कृषी विज्ञान व तंत्र स्वीकारण्याची गरज – श्री.के.बी.पाटील

वसई : सोमवार दि.1 नोव्हेंबर रोजी लोकसेवा सभागृह,बंगली येथील बॅसीन कॅथॉलिक को-ऑप.बँक लि. आयोजित कृषी संवर्धन व्याख्यानप्रसंगी जागतिक कीर्तीचे कृषी डॉक्टर व मे.जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीचे उपाध्यक्ष श्री.के.बी.पाटील ह्यांनी वसई एकेकाळी केळीच्या प्रचंड उत्पादनासाठी प्रसिध्द होती.  मात्र केळीच्या पिकावरील रोग व शहरीकरण ह्यामुळे ते वैभव लयाला गेलेले आहे.  मात्र, त्यामुळे निराश न होता जर वसईचे लहान-मोठे शेतकरी मनापासून कृषी विज्ञान व तंत्र स्वीकारण्यास तयार असतील, तर बॅसीन कॅथॉलिक बँकेचे आर्थिक साहाय्य व मे.जैन इरिगेशन कंपनीचे तंत्र साहाय्य ह्या आधारे वसईचे गतवैभव आपण नक्कीच प्राप्त करु शकू अशी ग्वाही त्यांनी दिली.  वसईचे हवामान केळी लागवडीसाठी उत्तम आहे.  जमीन 5 वा 10 गुंठे असो तरीही आधुनिक तंत्र वापरुन जळगाव प्रमाणेच वसईच्या शेतकरी वर्गानेदेखील यशस्वी होण्याचे ठरवावे.  बँकेच्या माध्यमातून वसईतील शेतकऱ्यांचे दोन गट जळगाव येथील मे.जैन इरिगेशन कंपनीच्या कृषी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन आल्या आहेत. त्यांना प्रत्यक्ष शेती, बागायत, तंत्र व उत्पादन, प्रयोग ह्यांची माहिती दिली गेली आहे.  येथील शेतकऱ्यांनी बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या प्रशिक्षण मोहीमेत सामील व्हावे व जळगाव येथे येऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व जागतिक दर्जाची केळी,मोसंबीसारखी फळे व उच्च बाजार किंमत असलेल्या भाज्या ह्यांचे उत्पादन करावे तसेच मुंबईसारखी बाजारपेठ व निर्यातीसाठी असलेल्या मागणीचा लाभ घ्यावा असे आवाहनदेखील त्यांनी केले.  केळी लागवड, वाफा पध्दत,येणारे रोग, त्यावरील उपाय, पाणी व कीटकनाशकांची फवारणी वेळापत्रक ह्यांची माहिती त्यांनी संगणकामार्फत सादर केली.

त्यानंतर बँकेचे अध्यक्ष श्री.ओनिल आल्मेडा हयांनी संचालक मंडळ वसईतील शेतकऱ्यांना सर्व मार्गाने मदत करण्यास कटिबध्द आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.  शेती लागवड, उत्पादन, विक्री ह्या सर्व बाबींचा बँकेने विचार केलेला आहे व मे.जैन इरिगेशन सिस्टीम कंपनी तसेच इतर सुख संपत्ती संवर्धक सहकारी संस्थांसारख्या शेतकी संस्थांमार्फत व उत्पादक व प्रोसेसिंग कंपन्यांच्या माध्यमातून शेती केवळ पोट भरण्यासाठी न करता ती नफासंपती कमावून देणारा उद्योग म्हणून विकसित करण्याचे ध्येय बँकेचे आहे. तसेच मे.जैन इरिगेशन कंपनी, जळगांव येथे वसईतील प्रत्येक पॅरीशमधून व आसपासच्या उत्तन, तलासरी व बहारे विभागातून 50 व्यक्तींचा गट प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे त्यासाठी योग्य सहभाग सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या आरंभी बँकेचे उपमहाव्यवस्थापक श्री.विनोदचंद्र व्यास ह्यांनी रिझर्व्ह बँकेने अग्रक्रम क्षेत्रात शेती व शेतीपूरक उद्योगविषयक कर्ज देण्यास सहकारी बँकांनादेखील पुढाकार घेता येईल असे बदल केले असल्याची माहिती दिली व बँकेचे संचालक मंडळ त्याबाबत योग्य धोरण आखून शेती क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा, तांत्रिक कंपन्याद्वारा तंत्रज्ञान, विविध शेतकी संस्थांमार्फत शेतीविषयक प्रशिक्षण, विपणनसाहाय्य ह्याद्वारे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने योजना आखीत आहे असे सांगितले.

श्री.तानाजी पाणसकर जिल्हा विकास सहकार अधिकारी ठाणे ह्यांनी सहकार व शेती ह्यांची सांगड घालून वसई पुन्हा सुजलाम् सुफलाम् करावी.  वसईतील शेतीमालाला हमीचा उत्तम भाव मिळाला म्हणून सहकारी संस्थांमधील अधिकारी,सेवक, तरुण ह्यांनी विपणन संस्था पुणे ह्यांच्याकडे प्रशिक्षण घ्यावे व योग्य प्रतवारी, वर्गीकरण, साठवणी, योग्य स्वरुपात वितरण करण्यास हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.

सदर समारंभास पालघर जिल्हा कृषी अधिकारी श्री.पी.के.पाटील, बँकेचे उपाध्यक्ष श्री.युरी घोन्सालविस,संचालक श्री.पायस मच्याडो, श्री.फ्रान्सिस मस्तान, श्री.सुनिल डिमेलो व बँकिंग तज्ज्ञ श्री.फ्रान्सिस डिकोष्टा उपस्थित होते. सूत्र संचालन बँकेचे विभागीय शाखाधिकारी श्री.जोसेफ डाबरे व आभारप्रदर्शन बँकेचे विभागीय शाखधिकारी श्री.लिओ मच्याडो ह्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!