शॉर्ट सर्कीटमुळे आदिवासींच्या पाच झोपडया खाक

संसार पडला उघडयावर

वसई (वार्ताहर) : विजवाहक तारा एकमेकांवर आदळून झालेल्या शार्टसर्कीटमुळे आदिवासींच्या पाच झोपडया जळून खाक झाल्याची घटना उत्तरवसईतील भुईगांवात घडली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी पालघरच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव नोव्हेंबर ते मे दरम्यान सहकुटुंब वसईत येवून उघडयावर आपला संसार थाटत असतात.सरकारी जागेवर तात्पुरत्या झोपडया बांधून ते रोजगाराच्या शोधात जात असतात.त्यानंतर पावसाळा सुरु झाल्यावर पुन्हा ते आपल्या मुळ गावी जातात.पालघर जिल्ह्यातील कोडगांवातील शेकडो कुटुंबे भुईगांवातील सरकारी जमिनीवर आपला भोगा (झोपडया) बाधून रहात होती.बुधवारी सायंकाळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे या झोपडयालगत असलेल्या खांबावरील विजवाहक तारा एकमेकांना घासून गेल्या.त्यामुळे विजेची ठिणगी उडून ती झोपडयांवर पडली.क्षणातच झोपडयांनी पेट घेतला.जीव वाचवण्यासाठी आदिवासी बांधव अंधारातच मोकळया जागेत आली.

प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी बोरींगचे पाणी टाकून आग विझवली.मात्र,तोपर्यंत पाच झोपडया आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या.दत्तु बसवत,मधु झाटे,लक्ष्मण झाटे,मंगली भोये,प्रकाश मलावकर यांचे संसार जळून खाक झाले होते.त्यांचे कपडे,अंथरून,धान्याची राख झाली होती.ग्रामस्थांनी त्यांना तादुळ,कपडे आणि इतर साहित्य देवून त्यांना मदत केली.ही घटना कळल्यावर आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे आणि सचिन प्रकाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले.त्यांनी वसई पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामे केले.

पाच कुटुंबांच्या झोपडया जळून खाक होत असताना,आणि त्यांचे संसार उध्वस्त झाले असताना यावेळी उमेदवार मात्र,आपल्या प्रचारात दंग झाले होते.सरकारी जमिनींवर असलेल्या झोपडया जळाल्यामुळे भरपाई मिळण्याची श्यता नसल्यामुळे आदिवासी बांधव चिंतातुर झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!