श्रीराम मंडाले “पिता-पुत्रीचे” उत्कीर्णन ; जुन्या मुंबापुरीचे काष्ठशिल्पाकृतीतून दर्शन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काष्ठशिल्पकला ही एक  हस्तकला आहे.जपान,चीन,काश्मीर,राजस्थान या ठिकाणी काष्ठकलेला अगदी राजमान्यता मिळालेली दिसते. राजस्थानातील चितोडगढ जिल्ह्यातील बस्ती येथील प्रभात जी सुधार यांनी ३५५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम गणगौर अर्थात पार्वतीरूप काष्ठमूर्ती साकारली होती. उदयपूरच्या महाराजा जगतसिंह यांनी मारवाड वरून काही कारागिरांना उदयपूरला बोलावून खराद नावाच्या कला प्रकारात म्हणजे एकाच लाकडी ठोकळ्यात कोरीव काम करीत राजप्रासाद सुशोभित करून घेतले. चीन मधील चुनहुई येथे एका काष्ठकोरीव काम करणाऱ्या कारागिराने ४० फूट लां लाकडावर सुंदर नक्षीकाम करून चीन संस्कृती आणि चीन दैनंदिनी कोरली की, जी कलाकृती गिनीज बुक मध्ये नोंदली गेली…!!
ही सारी लाकूड कलाकुसर आणि काष्ठशिल्पाकृतींची चर्चा करण्याचा उद्देशही जुळून आला आहे. मुंबापुरीतील जाहिरात संस्थेत आर्ट डायरेक्टर म्हणून कल्पना निर्माण करणारे चित्रकार श्री श्रीराम मंडाले यांनी अगदीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कलाकृती साधल्या आहेत. टिकवूड म्हणजे सागाच्या लाकडावर विशिष्ट स्तर तयार करून लेसर कटिंग आणि हस्तकौशल्य यांच्या साहाय्याने कलाकृती साकारल्या आहेत.
हे एक असं प्रदर्शन की, ज्या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती ह्या मुंबई शहराशी निगडित लहान-लहान आकृतिबंधाना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फ्रेमच्या चौकटीत बनविण्याचा आणि त्याच बरोबर आधुनिक कला प्रवाहातली पेंटिंग्ज सादर करण्याचा यशस्वी प्रयत्न श्रीराम मंडाले यांनी केला आहे. श्रीराम यांचं काम म्हणजे बर्मा टिक वुड वर कोरलेल मुंबापुरीत पुरातन किंवा अगदी जूने रुपडं ….जणू सृजनच….पारंपारिक शास्त्रीय कलेचं….
चीनच्या ४० फुटी काष्ठ कारागिरीचं गिनीज बुकात नोंद घेण्यात आली, परंतु श्रीराम मंडालेच्या सुमारे तीसेक काष्ठ शिल्पाकृती म्हणण्यापेक्षा काष्ठ-पेंटिंग्ज ज्या ५ फुटी कलाकृती आहेत ….अर्थात ४० फुटांहून अधिक स्वरूपात काम आहे….त्याचीही गिनीज बुकात नोंद व्हावयास हवी …!!
लाकडावरील कोरीव कलेचं आणि शिल्पकलेचे उत्तम ज्ञान असलेल्या श्रीराम यांनी त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीतून आणि तांत्रिक ज्ञानातून कापड,धातू आणि  काँक्रीटला त्यांच्या मनाप्रमाणे वळवून वागायला लावतात. त्यांनी निवडलेले काष्ठ पेंटिंग्जचे विषय म्हणजे चित्रकाराच्या ठायी असलेली सर्जनशीलता आणि सधनता कायम ठेवतात.
लाकूड,हस्तदंत,दगड इत्यादी पृष्ठभागावर अर्ध उठावात केलेल्या नक्षीकामास अथवा कोरीव कामास ‘उत्कीर्णन’ असे म्हणतात. श्रीराम मंडाले यांनी नेमकं हेच केले आहे. ९”बाय १३” आकारातील “ओपन कॅनव्हास” शीर्षकाची कलाकृती म्हणजे १८८० च्या दशकातील सर ज जी उपयोजित कला महाविद्यालय ही हेरिटेज इमारत. सुमारे १६० वर्षाचा इतिहास असलेली इमारत केवळ ९”बाय १३” आकारात व्यक्त करण्याचा अगदीच अशक्य वाटणारा प्रयोग सहजयोगाने पूर्ण यशस्वी करून श्रीराम मंडाले यांनी जादुई किमया केलीय. २७” बाय ३८” आकारातील लव्ह अफेअर वुईथ कलर त्याच आकारातील लॉस्ट ट्रेझर, द प्रीनिज बाऊंटी, ईस्ट मिट्स वेस्ट अशा एकाहून एक थक्क करणाऱ्या कलाकृती पाहताना रसिक मंत्रमुग्ध न होईल तर नवलच.
आश्चर्याचे सुखद धक्के देत देत रसिक मुंबापुरीच्या जुन्या इतिहासाला जागृत करीत असतानाच त्यांची कन्या कु. श्रद्धा मंडाले हिने चितारलेल्या तशाच काहीशा विषयावरील कलाकृती पाहायला मिळतात.मुंबईत सर्वच दृश्य पाहायला मिळतात. कानातला मळ काढणारा, मालिश करणारा, बूट पोलिश करणारा, रस्त्यावर कटिंग-दाढी करणारा, मच्छी विक्रेती आणि बरेच काही…
एकूणच “बाप-बेटी” ची मुंबापुरी वरील माया-प्रेम व्यक्त करण्याची अन कलारसिकांना अनोखी भेट देण्याची पुनर्निमाणाची कलाकुपी फारच स्मृतिप्रवण ठरणारी आहे. हे प्रदर्शन दि ३ ते ९ जून या सप्ताहात होत आहे. जहांगीर कलादालनाच्या हिरजी कलादालनात ह्या जागतिक दर्जा ठरू पाहणाऱ्या कलाकृती रसिकांना पाहता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!