
वसई : दिनांक ९ जानेवारी २०२१ शनिवार मार्गशीर्ष कृ ११ रोजी किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत “श्री वज्रेश्वरी देवी पालखी उत्सवाचे जंजिरे वसई किल्ला ते कुडे गाव (पालघर) आयोजन करण्यात आलेले होते. कुडे गावातील स्थानिक प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा, समाजाचा सक्रिय सहभाग योगदान, गाव पाड्यातील आकर्षक रांगोळी व गुढीची सजावट, प्रत्येक घरातील अंगणात पालखीचे आगमन हे पालखी सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता जंजिरे वसई किल्ल्यात समस्त किल्ले वसई मोहीम प्रतिनिधी व कुडे ग्रामस्थ यांच्या हस्ते जंजिरे वसई किल्ल्यात पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. कुडे गावातील वंगणपाडा, पाटीलपाडा, सातवीपाडा, मोरीपाडा व गावातील सर्व मुख्य मंदिरे इत्यादी सर्व भागात दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. भजन मंडळींची कीर्तने, भगवे ध्वज, अबदागिरी, सजवलेले टेम्पो, फुलांची आरास, मानाची तलवार, भगवे पताके, मोठमोठ्या आकारातील रांगोळ्या, विविध वेशभूषा, घरोघरी उभारण्यात आलेल्या गुढी इत्यादी माध्यमातून स्थानिकांनी श्री वज्रेश्वरी देवीस एक अनोखी मानवंदना दिली.

कुडे गावातील भक्तिमय वातावरणातील मंदिरे, गाव पाडे स्थानिक, भाविक व दुर्गमित्र मंडळीनी गच्च गजबजून गेलेले होते. प्रत्येक पाड्यात घराघरांतून डोकावणारे भगवे ध्वज, पताके, फुलांच्या माळी, जल्लोष गाणी, अभंग पालखी सोहळ्याची भव्यता लक्षात आणून देत होते. ऐतिहासिक देवीच्या पालखी सोहळ्यासाठी सर्वच स्थानिक परिवाराचे अत्यंत जल्लोषात एकत्रितपणे सक्रिय सामील होणे हा कुडे गावातील एक अमूल्य क्षण ठरला. कुडे गावातील मंदिरात देवीचे पूजन, आरती, जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व नरवीर चिमाजी आपांच्या घोषणा मानवंदना, नरवीर चिमाजी आपांच्या स्मृतींना उजाळा इत्यादी बाबीमुळे पालखी उत्सवाने एक वेगळीच उंची गाठली.

२८२ व्या श्री वज्रेश्वरी देवी पालखी उत्सवासाठी स्थानिक ग्रामस्थांनी गेली सात दिवस अहोरात्र परिश्रम घेतले. रात्री कुडे गावातील श्री राम मंदिर देऊळ पटांगणातील मशाल मानवंदना सर्वांच्याच आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. यावेळी १५ हुन अधिक मशाली, भगवे ध्वज, अब्दागिरी यांच्या प्रकाशात श्री वज्रेश्वरी देवी पालखी उजळून निघाली. रात्री ११ वाजता श्री राम मंदिरात इतिहास अभ्यासक डॉ श्रीदत्त राऊत यांचे “श्री आदिशक्ती वज्रेश्वरी देवी व प्राचीन इतिहास” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

यावेळी गावातील लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्तींनी किल्ले वसई मोहिमेचे डॉ.श्रीदत्त राऊत, सौ.दीपाली पावसकर, सौ.दिव्या राऊत, भरत पाटील राई, भजनी मंडळाचे मोहन सातवी, प्रीतम पाटील नावझे, तुषार पाटील शिरगाव, दिपेश पावडे अध्यक्ष सू. क्ष. युवक मंडळ या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. रात्री ठीक ११ वाजता श्री राम मंदिरात पालखी उत्सवाच्या पहिल्या टप्प्याची महाआरतीने सांगता करण्यात आली. यंदाच्या उत्सवात कुडे गावातील सर्वच व्यक्तींनी विक्रमी सहभाग नोंदवून “आपल्या गौरवशाली इतिहास परंपरा रक्षणाचा” एक मोठा संदेश संकल्प दाखवून दिला. या पालखी उत्सवात किल्ले वसई मोहीम परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, समस्त कुडे ग्रामस्थ, हिंदवी स्वराज्य समुह शिरगाव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आजवर झालेल्या सर्व पालखी उत्सवात सदर पालखी सोहळ्यात प्रथमच प्रत्येक घरातील अंगणात श्री वज्रेश्वरी देवी पालखी पोहोचली.
युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सातवी यांच्या मते “समस्त दुर्गमित्र कुडे गावातील स्थानिकांनी दिलेल्या प्रतिसादामूळे भारावून गेलेले असून श्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी उत्सवाची ही अनोखी मानवंदना येत्या काळात सर्वानाच इतिहास संकलनासाठी भरीव प्रेरणा देईल यात शंका नाही. ऐतिहासिक केळवे माहीम विजयदिनात समस्त दुर्गमित्रांचा सक्रिय सहभाग कायम राहील.”
संवर्धन मोहीम केळवेचे प्रमुख योगेश पालेकर यांच्या मते “केळवे माहीम विजयदिन हे अत्यंत महत्वाचे पर्व असून त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. ऐतिहासिक गडकोट व विजयदिनाच्या महत्वाच्या पर्वात सर्वांचा वाढता सहभाग दुर्गसंवर्धनासाठी प्रेरक ठरेल.”