संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.सोमनाथ विभुते

वसई : विद्यापीठ अनुदान आयोग व मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. सोमनाथ विभुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संस्थेचे चेअरमन व वसई धर्म प्रांताचे महागुरु स्वामी आर्चबिशप डॉ.फेलिक्स मच्याडो यांनी डॉ.विभुते यांची रीतसर पदस्थापना केली तसेच त्यांचे अभिनंदनही केले.यावेळी कॉलेज व्यवस्थापनाचे पदाधिकारी व्यवस्थापक फादर डॉ.जोएल डिकुन्हा,प्रशासक फादर राजेश लोपिस,फादर डॉ.सोलोमन रोड्रिग्ज, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी श्री.रिचर्ड वाझ आणि प्रबंधक विमला रिबेलो यांची उपस्थिती होती.
डॉ.सोमनाथ विभुते हे अर्थशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक असून तब्बल 21 वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहेत.मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर त्यांची निवड झालेली आहे.विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात (डिएलएलई)क्षेत्र समन्वयक म्हणून गेली दहा वर्षे कार्यरत आहेत. अर्थशास्त्राच्या 20 पेक्षा अधिक पुस्तकांचे सहलेखन त्यांनी केले आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे.लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे ते सन 2016- 17 मध्ये अध्यक्ष होते आणि सध्या लायन्स क्लबचे विभागीय समन्वयक म्हणून काम पहात आहेत .लायन्स क्लबच्या माध्यमातून वसई, पालघर, जव्हार इत्यादी ठिकाणच्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. एक उत्तम वक्ते म्हणून वसई व परिसरात त्यांची ख्याती आहे.
संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापन,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!