संभाजी ब्रिगेडचे ९ वे राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांची उपस्थितीत पार पडणार

मंबई (वार्ताहर) : येत्या शनिवार आणि रविवारी पार पडणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला पाटीदार आंदोलनाचे नेते मा. हार्दीक पटेल हजेरी लावणार आहेत. ‘हम सब एक है, हम सब भारतीय है ’ असा नारा देत अलिबाग येथील पी.एन.पी. सभागृहात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी हे अधिवेशन पार पडणार असून राजकीय आणि सामाजिक सद्यस्थितीवर चर्चा घडवून आणणाऱ्या अनेक परिसंवादाचे आयोजन या अधिवेशनादरम्यान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनादरम्यान मराठा समाजासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मा. श्रीमंत कोकाटे, मा. प्रदीप साळुंखे, ॲड. समीर घाटगे आणि मा. जयश्री शेळके आदी मान्यवरांना ‘मराठा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडच्या अलिबाग येथे होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी हार्दीक पटेल यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला शेकापचे सरचिटणीस मा. आ. भाई जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. सुनिल तटकरे,आ. जितेंद्र आव्हाड, आ.हसन मुश्रीफ आणि डाॅ. सुरेश माने आदी मान्यवरही उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात हार्दीक पटेल यांच्यासह सर्व मान्यवरांची भाषणे होणार आहेत. दोन दिवसीय अधिवेशनाच्या या कार्यक्रमाबद्दल बोलतानामराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांनी सांगितले की, उद्घाटन पार पडल्यानंतर पहिल्या सत्रात ‘अार्थिक सक्षमीकरण – कृषी उद्योग व्यवसायातील संधी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादादरम्यान कृषी आणि उद्योग व्यावसायातील संधींबाबत विस्ताराने ऊहापोह करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या सत्रात ‘दहशतवादाचे बदलते स्वरूप’ या परिसंवादादरम्यान भीमा कोरेगाव प्रकरण आणि विचारवंतांच्या हत्या प्रकरणात असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात ‘मोर्चे पे चर्चा’ या विषयावर चर्चासत्र पार पडणार असून आरक्षणाच्या अनुषंगाने यात चर्चा केली जाणार आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम सामाजाचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक २८ ऑक्टोबरला ‘राजकारण आणि समाजकारण – वर्तमान स्थिती’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण,आर्थिक मुद्द्यांच्या आडून होणारे राजकारण, युवा वर्गाचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या मुद्द्यांच्या आधारे चर्चा घडवली जाणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात‘प्रचारमाध्यमे आणि सोशल माध्यमांचा वापर आणि गैरवापर’ या विषयावर चर्चा केली जाणार आहे. तर शेवटच्या सत्रात संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप केला जाणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी दुपारी २ वाजता मा. खा. युवराज संभाजीराजे छत्रपती, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. राधाकृष्ण विखे पाटील, बारामती अग्रोचे मा. रोहित पवार आणि मा. रणजीतसिंह मोहिते पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!