संस्कृतीच्या विविधतेतही देशाप्रती सद्भावना महत्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वसई (वार्ताहर) : भारत विविधतेने संपन्न देश आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे, परंतु देश म्हणून सर्वजण एक होतात. देशाप्रती ही सद्भावना महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले.
श्री बद्रीनाथ मंदिर परिसर, वसई पश्चिम येथे आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल श्री कोश्यारी बोलत होते. वसई येथील उत्तरांचल मित्र मंडळाच्यावतीने या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वसई-विरारचे महापौर प्रवीण शेट्टी, खासदार राजेंंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष गोपालसिंग मेहरा, विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, मंडळाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, भागवत कथेनुसार श्रीकृष्ण मथुरेसह द्वारकेलाही जाऊन राहिले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र असो वा उत्तरांचल व्यक्ती कोठेही राहिला तरी देश महत्वाचा आहे. भारतीय संस्कृती मध्ये देवतांच्या आराधनेला महत्व आहे, त्याचबरोबर भारतमातेलाही मानाचे स्थान आहे. मानवाने कोठेही गेले तरी मातृभूमीला विसरू नये असे आवाहन त्यांनी केले.  चारधाम मधील पवित्र बद्रीनाथ मंदिराचे वसई मध्ये निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मी समाजासाठी सर्व ते प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.
इस्कॉन संस्थेच्या श्री रघुवीर दास (प्रभुजी) यांच्यामार्फत ही कथा सादर केली जात आहे. उत्तरांचल मित्र मंडळामार्फत दरवर्षी या कथेचे आयोजन करण्यात येत असून हे नववे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. येथे मानव कल्याण केंद्राची निर्मिती केली जात असून या माध्यमातूनही विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!