सदानंद महाराजांचा ‘आश्रम वाचवा’ ; लाखो भक्तांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

वसई (प्रतिनिधी) :  तुंगारेश्वर पर्वताच्या सर्वोच्च शिखरावरील श्रीक्षेत्र परशुरामकुंड येथील सुप्रसिध्द संत बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम दोन महिन्यात जमीनदोस्त करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिल्याने सदानंद महाराजांच्या लाखो भक्तांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदाचार आणि सत्संगाची शिकवण देणारा, मांगल्याचे प्रतीक असलेला बाबांचा आश्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळीच पावले उचलून वाचवावा अशी मागणी भक्तजनांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अन्य अभयारण्यात अतिक्रमणे करून शेकडो अनधिकृत बांधकामे झालेली असताना फक्त बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमाला मुंबईस्थित पर्यावरणवादी संघटनेकडून लक्ष करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत असून यामागे मोठे कटकारस्थान असल्याचा संशय भक्तजनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बालयोगी सदानंद महाराजांचे लाखो भक्त ठाणे, पालघर जिल्हा,मुंबई नवी, मुंबई परिसर तसेच पंढरपूर, नाशिक, त्रंबकेश्वर सारख्या तीर्थक्षेत्री असल्याने आश्रमावर हातोडा पडला तर प्रचंड प्रक्षुब्ध आंदोलन उभारले जाऊन कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सदानंद महाराजांच्या आश्रमावर नव्हे तर सदाचार- सत्संगावर सुप्रीम कोर्टाने हातोडा उगारला आहे,अशी भावना न्यायालयाचा आदर राखून सर्वत्र व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, माजी खासदार बळीराम जाधव,लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आदी मातब्बर नेते तसेच भारताच्या विविध धार्मिक क्षेत्रातील शंकराचार्य साधू-संत, महंत,आदींनी बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमाला आणि कार्यक्रमांना उपस्थित राहून बाबांच्या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांची प्रशंसा केली आहे.

विसाव्या शतकातील चमत्कार समजला जाणाऱ्या बालयोगी सदानंद महाराजांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी नेसत्या वस्त्रानिशी मौजे राई तालुका ठाणे येथील आपल्या घरादाराचा स्थावर जंगम मालमत्तेचा त्याग करून माता-पित्यांसह १ मे१९७१ रोजी तुंगारेश्वर पर्वतावरील भयाण अरण्यात असलेल्या परशुरामकुंड येथे पर्णकुटी बांधून तपसाधना सुरू केली. आज या घटनेला ४८ वर्षे होऊन गेली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सदानंद महाराज यांच्या आश्रमाला ६९ गुंठे जागा राज्य शासनातर्फे दिली आहे. या जागेचा नकाशा सर्वे करून आश्रम संस्थेला दिला आहे. आश्रमाचे कोणतेही बांधकाम अनधिकृत नाही. पारोळ ग्रामपंचायतीची घरपट्टी ही लावण्यात आलेली आहे. बाबांच्या आश्रमामुळेच तुंगारेश्वर डोंगराची अनधिकृत चोरटी वृक्षतोड थांबलेली आहे. विशेष म्हणजे बालयोगी सदानंद महाराज १९७१साली तपसाधनेसाठी परशुराम कुंडावर आले त्यावेळी बाबांचा आश्रम अभयारण्यात समाविष्ट नव्हता. २००३ साली तब्बल ३३वर्षांनी तुंगारेश्वर अभयारण्य घोषित करण्यात आले. आणि त्यामध्ये बाबांना शासनाने दिलेली ६९ गुंठे जागा अभयारण्यात समाविष्ट करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सदानंद महाराजांनी अभयारण्यात अतिक्रमण केले या आरोपात तथ्य नाही. बालयोगी सदानंद महाराज यांनी केवळ देवभक्तीमध्ये-कर्मकांडात न रमता जनकल्याणासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. बाबांनी स्वत: विविध वनस्पतींचा शोध घेऊन आयुर्वेदिक औषधी केंद्र सुरू करून हजारो लोकांना रोग-व्याधीमुक्त केले आहे. बाबांचे आयुर्वेदिक क्षेत्रातील कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने २००५ साली महाराष्ट्र राज्य वन औषधी संशोधन समितीवर सल्लागार म्हणून सदानंद बाबांची नियुक्ती केली आहे. सदानंद महाराज सिध्द वनस्पती उपचार केंद्राद्वारे अनेक औषधांची निर्मिती करण्यात आली असून मधुमेह,संधिवात, कुष्ठरोग, स्त्रियांचे आजार, अल्सर, मणक्यांचे आजार,अशा विविध आजारांवर उपचार केले जातात. राज्यात मोफत औषध उपचार शिबीर, बालसंस्कार शिबीर, व्यसनमुक्ती शिबीरे बाबांच्या आश्रमात द्वारे भरवली जातात. विशेष म्हणजे सदानंद महाराजांच्या आश्रमाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसात किंवा अन्य शासकीय संस्थांकडे करण्यात आलेली नाही. आश्रमात नीतिमत्ता, सदाचार,सत्संगाचे धडे भाविकांना दिले जातात. जातिभेद, धर्मभेद,पंथभेद,यांना आश्रमात थारा नाही.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे बालयोगी सदानंद महाराज स्वत:ला वारकरी समजतात. ज्ञानेश्वरीच्या प्रसार आणि प्रचार कार्याला बाबांनी वाहून घेतले आहे. श्रीक्षेत्र गणेशपुरी, पंढरपूर, नेवासा सारख्या महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रीच नव्हे तर सदानंद महाराजांनी भारतातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र काशी, हरिद्वार, वृंदावन, मथुरा, द्वारका,श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी सारख्या तीर्थक्षेत्री हिंदी भाषेतील ज्ञानेश्वरीचे हजारो भक्तांच्या उपस्थित सामुदायिक पारायणे करून एक नवा इतिहास निर्माण केला आहे.तसेच मॉरिशस, कॅनडा, श्रीलंका आधी विदेशातही ज्ञानेश्वरीची सामुदायिक पारायणे करून सदानंद महाराजांनी ज्ञानेश्वरी सातासमुद्रापार नेऊन संतपरंपरेचा नवा विश्वविक्रम निर्माण केला आहे. अमेरिका, इंग्लंड आदी पाश्?चात्त्य राष्ट्रांत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण करण्याचा बालयोगी सदानंद महाराज यांचा मानस आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सदानंद महाराजांचा आश्रम संकटात सापडला आहे. तेथील जगद्गुरु नित्यानंद स्वामींचे मंदिर तसेच सदानंद महाराज यांचे पिताश्री वैजनाथ महाराज आणि मातोश्री पार्वती आईच्या समाधी स्थानाचे भवितव्य काय ? असा प्रश्न लाखो भक्तांच्या समोर उभा ठाकला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी काहीही करा पण सदानंद महाराजांचा आश्रम वाचवा असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना घातले आहे. आश्रम पडला तर काय होईल हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरच आश्रमाचे भवितव्य अवलंबून आहे. ठाणे, पालघर, मुंबई परिसरातील खासदार ,आमदार,लोकप्रतिनिधी, कायदेपंडितांनी बाबांच्या आश्रम वाचवण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आश्रम संस्थेतर्फे पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बालयोगी आश्रम संस्थेचे अध्यक्ष विजय शेठ पाटील आणि विश्वस्त मंडळाने दिली.

महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाच्या २०१७-१८ सालच्या अहवालात ठाणे वनविभागाच्या तब्बल ९९१ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. हजारो झोपडपट्टया तसेच धनदांडगे आणि भूमाफियांनी टोलेजंग इमारती उभारल्याचे नमूद करण्यात आले आहे. २१७-१८ या एकाच वर्षात तब्बल ३२ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. असे असताना केवळ एका पर्यावरणवाद्यांच्या हट्टापायी बालयोगी सदानंद महाराज यांच्या४८ वर्षांपूर्वी बांधलेल्या आश्रमावरच हातोडा का असा भाविक भक्तांचा सवाल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!