समाजसेवा करणार्‍या संस्थांना मदत केली पाहिजे – डॉ. प्रकाश आमटे

पिंपरी, ता. ११ :  सगळ्यांनाच समाजासाठी काम करता येत नसेल तर सामाजिक काम करणार्‍या संस्थांना मानसिक आणि आर्थिक सहाय्य केले पाहिजे, असे मत समाजसेवक प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे दाम्पत्याच्या सामाजिक कार्याबद्दल डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीच्या वतीने डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, कुलगुरु प्रा. प्रभात रंजन, संचालक कर्नल डॉ. एस. के. जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. आमटे म्हणाले, ‘आदीवासींना खायला अन्न नसेल, अंगावर कपडे नसतील तरी स्वाभिमान असतो. त्यांची एक संस्कृती आहे. त्यामुळे बलात्कारासार‘या घटना घडत नाहीत. समाजाने त्यांची संस्कृती शिकली पाहिजे. आदिवासी व्यवहार्य जीवन जगतात. अनेक महत्वाचे निर्णय ते पंचायतीत घेतात आणि त्यांचे पालनही करतात.’ डॉ. आमटे पुढे म्हणाले, ‘नुसता पैसा मिळवला तर सर्व गोष्टी मिळते, समाधान मिळते असे नाही. सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी लागते. एका व्यक्तिचा उध्दार केला तरी समाधान मिळते.’
महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वैविध्य, भाषा, प्रवास, नवीन गोष्टी शिकण्याची आवड हे गुण विकसित केले पाहिजेत. जीवनात पैसा दुय्यम आहे. असे मत श्री. पदमनाभन यांनी व्यक्त केले.
नावीन्य, सोशल मीडियाच्या काळात समाजसेवेची भावना गरजेची आहे. निस्वार्थ, निरपेक्षपणे काम कसे करायचे, प्रलोभनातून बाहेर कसे राहायचे याची शिकवण डॉ. आमटे दाम्पत्याच्या समाजकार्यातून घडते. आजच्या युवा पीढीसाठी त्यांचे कार्य महत्वाचे आहे. असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. शलाका पारकर यांनी सूत्रसंचालन, आमदार सतेज पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. नीरज व्यवहारे यांनी आभार मानले. सदाशिव खाडे यांचे ही भाषण झाले.
आमटे दाम्पत्य १९७३ पासून गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे ‘लोकबिरादारी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आदीवासींच्या विकासासाठी कार्यरत आहे. या ठिकाणी रुग्णालय उभारण्यात आले असून, दरवर्षी ४० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. जखमी वन्य प्राण्यांसाठी अनाथालय, निवासी आश्रम शाळा आदी उपक‘म राबविले जातात. आमटे दाम्पत्याच्या समाजसेवेबद्दल ‘मॅगसेसे’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!