सर्वपक्षीय राजकारण्यांचा ‘उदय’ घडविणारा एकच `पै’ !  – योगेश वसंत त्रिवेदी

    आपण देवळात/मंदिरात जातो, देवळात/मंदिरात मनोभावे पूजा करतो, प्रार्थना करतो, गाऱ्हाणे घालतो, मागणं मागतो. पण यासाठी आपण आपली – आपापली पादत्राणे देवळाच्या/मंदिराच्या बाहेरच काढून ठेवतो. असंच एक `कला मंदिर’ बोरीवलीला आहे. हे कला मंदिर समस्त सर्वपक्षीय राजकारण्यांचे अत्यंत श्रध्देचं ठिकाण आहे.
    या कला मंदिराचा/मंदिरातला देव /पुजारी आहे उदय पै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर अशोक चव्हाण, गणेश नाईक, गोपाळ शेट्टी, संजय निरुपम, विनोद घोसाळकर, गजानन कीर्तीकर, प्रविण दरेकर, प्रकाश सुर्वे पर्यंत साऱ्या राजकारण्यांची श्रध्दा या कलामंदिराच्या देवतेवर, कलेच्या पुजाऱ्यावर आहे. “ज्या बाळासाहेब ठाकरे यांना लोकांना भेटण्यासाठी वाट पहावी लागत होती. (बाळासाहेबांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात) ते बाळासाहेब चक्क दोन दोन तास माझ्याशी गप्पा मारतात ? अगदी मन मोकळ्या ? यावर माझाच विश्वास बसत  नाही”. उदय पै भरभरुन बोलत होते. मुळातच बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कलाकार, आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार. कलाकाराची जाण ठेवणारा एक  जबरदस्त कलंदर माणूस. मग मला, माझ्यासारख्या कलावंताला बाळासाहेबांबरोबर गप्पा मारायला मिळणं ही माझ्या दृष्टीने एक पर्वणीच, उदय पै याचं ऊर बोलताना भरुन आले.
    कोण हे उदय पै ? आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला जन्म देणारा, मराठी माणसावर जीव ओवाळून टाकून मराठी माणसासाठी वाट्टेल ते सहन करण्यासाठी आपल्या आयुष्याची आहुति देणारा बाळासाहेब ठाकरे उदय पै यांच्याशी तासनतास बोलणे म्हणजे तो तेवढ्याच ताकदीचा माणूस असावा.
    ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्यामुळे मला मुंबईत उभे राहायला, मुंबईत व्यासपीठ मिळालं. बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली आणि सामना च्या माध्यमातून मुंबईच्या वृत्तपत्रसृष्टीत मानाचं स्थान मिळालं. त्यायोगे अनेक दिग्गजांचा सहवास मिळाला. तद्वतच उदय पै या कलंदर चित्रकार कलाकाराची भेटही विजय वैद्यांमुळेच होऊ शकली.
    आज मुंबई शहर, उपनगर चा कुलाबा, मलबार हिल ते दहिसर मुलुंड पर्यंतचा भाग असो की गणेश नाईक ज्या ठिकाणचे अनाभिषिक्त सम्राट समजले जातात तो नव्या मुंबईचा परिसर असो, या सर्व भागात एकाच वळणाची सुंदर अशी आणि वैशिष्ट्यपूर्ण वाक्यरचना असलेला मोठ मोठाली होडिंग्ज, फ्लेक्स असोत या वैशिष्ट्यपूर्ण आणि त्या नेत्रदिपक, नेत्रसुखद, नयनरम्य अशा वळणदार होर्डिंग्ज/वाक्यरचनेचा निर्माता आहे उदय पै. बोरीवली पश्चिमेच्या बाभई येथील अॅड आर्ट्स नावाची संस्था उदय पै यांनी स्वकष्टाने उभी केली आहे. या अॅड आर्ट्सच्या कलामंदिरात सर्वपक्षीय राजकारणी नेते आपापली राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून येतात आणि दोन धृवांवर आलेले डावे उजवे यासह सर्व विचारसरणीचे नेते मांडीला मांडी लावून बसतात. हंसी मजाक, विनोद, शेरोशायरी सुरु असते. हे चित्र जर लोकांनी पाहिलं तर म्हणतील की हेच का ते नेते ? जे एकमेकांचे `राजकीय वस्त्रहरण’ करण्यासाठी अहमहमिकेने पुढे सरसावलेले असतात? होय, अगदी खरे आहे. उदय पै यांच्या या कलामंदिरातल्या चहाच्या कपात साऱ्या राजकीय पक्षांचे नेत्यांचे मतभेद विरघळलेले असतात.
    उदय पै हे सर्व अगदी शिवसेना भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा सर्व पक्षाच्या नेत्यांची होर्डींग्ज/फ्लेक्स अत्यंत कल्पकतेने / कलात्मक पध्दतीने बनवतात. या होर्डींग/फ्लेक्समध्ये सोनिया गांधींचे विचार काय आहेत ? शरद पवारांची भूमिका काय आहे ? शिवसेनेची ज्वालाग्राही धोरणे कोणती ? भारतीय जनता पार्टीचे विकासाचे धोरण कोणते ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खळ्ळ खट्याक कसे ? या सर्व बाबींचा `उदयस्पर्श’ विविध राजकीय होर्डिंग/फ्लेक्सवर झालेला दिसून येतो. बरं! एखाद्या शाकाहार मांसाहार खाणावळीत गेलेल्या शकाहारी भटजीला जेवताना कोकणी माशाच्या कालवणाचा रस्सा, मटणाचा रस्सा स्पर्श होऊ शकणार नाही. त्याच पध्दतीने एका राजकीय पक्षाच्या होर्डिंग/फ्लेक्सवर दुसऱ्या पक्षाची भूमिका चुकूनही सापडणार नाही. यालाच म्हणतात ‘उदय (पै) स्पर्श’
    उदय पै हे मुंबईच्या सर जमशेठजी जीजीभॉय (जेजे) कला महाविद्यालयातून कलेची पदवी घेऊन ‘काही तरीच’ करण्यापेक्षा ‘काही तरी’ करुन दाखवण्यासाठी बाहेर पडले. सुरुवातीला प्रख्यात जाहिरात कंपनीत नोकरी करणारे उदय पै स्वतःला नोकरीच्या जोखडात बांधून ठेवायला तयार नव्हते. एक अनुभव गाठीशी घेऊन उदय पै यांनी 1995 साली स्वतंत्र `अॅडआर्ट्स’ सुरु केली. स्वतःच्या  घामाच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या जागेत कला मंदिर उभारले. `मातृपितृ देवो भल” मानून त्यांचे आशीर्वाद घेऊन कलेच्या प्रांतात भरारी घेण्यासाठी हा कलेचा कलंदर पुजारी भरारी घेता झाला. जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी घेऊन हसतमुख, मितभाषी स्वभावाने आणि सौभाग्यवती स्मीता यांच्या साथीने उदय पै यांनी आपला पाय भरभक्कमपणे कलेच्या प्रांतात रोवला. ठराविक वेळेत काम करतांना आपल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याचा हातखंडा आणि कल्पकतेने प्रचार, प्रसार, साहित्य बनवण्याची हातोटी यामुळे उदय पै हा खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय राजकारण्यांचा ‘उदय’ घडवणारा एकच ‘पै’ ! असं आवर्जुन म्हणावे लागेल. गेल्या वीस पंचवीस वर्षात मुंबई, ठाणे, रायगड या संपूर्ण परिसरातल्या सामाजिक साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, राजकारण या सर्व क्षेत्रात उदय पै यांचा वावर अत्यंत लीलया सहज असा सुरु आहे. त्यांची वाक्ये, त्यांची होर्डींग/फ्लेक्स आपल्या नयनांना सुख देऊन जातात. अशी नयनरम्य, नेत्रदिपक, मितभाषी कलेच्या कलंदराला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो आणि त्यांची कला शतकाहून शतके पहायला मिळो, ही उदय पै यांच्या कुलदेवतेला विनम्र प्रार्थना !
    ‘नरेंद्रां’च्या मतदारसंघात ‘देवेंद्रां’चा फेरफटका !          भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे नाते गेल्या 2014 पासूनचे जरी असले तरी ते जन्मोजन्मीचे असावे असेच वाटते. यंदाचे वर्ष ‘भाई’ म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे, लाडके कवी ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके उर्फ बाबुजी या तीन मान्यवर मराठी दिग्गज त्रिमुर्तीचे जन्मशताब्दी वर्ष. महेश वामन मांजरेकर यांनी पु.ल. वर `भाई ‘ ! व्यक्ती की वल्ली ‘ हा चित्रपट प्रदर्शित करुन भाईंना मानाचा मुजरा केलाय. अशाच ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या स्मृतीही सर्वत्र जपण्यात येताहेत. उत्तर मुंबईचे माजी खासदार, माजी रेल्वेमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम दामोदर नाईक म्हणजेच रामभाऊ नाईक हे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यावर त्यांनी लखनौच्या राजभवनाला मराठी संस्कृतीला चांगली जागा मिळवून दिली. ग.दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाराणसी येथे गीत रामायणाचा कार्यक्रम घडवून आणण्यात आला. वाराणसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे ठिकाण. मोदींचा हा मतदार संघ आणि रामाच्या नावाला आताशा चांगलीच मागणी. अयोध्येत राममंदिर उभारण्याची मागणी.  सुधीर फडके यांचं गीतरामायण आणि राज्यपाल रामभाऊ नाईक, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मंचावर उपस्थिती लक्षणीय ठरणार आणि दोघांची वक्तव्याची फलंदाजी ही सर्व विक्रम मोडणार हे ओघानेच आले. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतीचे साधर्म्य सांगायला देवेंद्र फडणवीस कसे बरे विसरणार ?
    वाराणसीत अनोखा सोहळा रंगला आणि देवेंद्र फडणवीस यांनी गीत रामायणातून मानवी जीवनाचे सारे भाव अभिव्यक्त होत असल्याचे सांगून दोन्ही राज्यांचे बंध अधिक घट्ट होतील, अशी ग्वाही दिली, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन्ही सरकारांतर्फे या अनोख्या सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आणि श्रीधर सुधीर फडके व आनंद माडगुळकर दोन्ही सुपुत्र त्याचे साक्षीदार झाले. ‘न भुतो !’ असा सोहळा झाला. जो दिलासा देणारा म्हणावा लागेल. शत शत नमन माडगुळकर बाबूजींना आणि दंडवत प्रभू रामचंद्राला !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!