सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली आमच्या बाजूने निकाल दिला असतांना ही त्याची अंमलबजावणी का होत नाही ? समाजसेविका श्रीगौरी सावंत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तृतीयपंथीयांना उपकार म्हणून केवळ दया दाखवू नका तर माणूस म्हणून स्वाभिमानाने जगू द्या, सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली आमच्या बाजूने निकाल दिला असतांनाही अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी का होत नाही ? असा परखड शब्दांत समाजसेविका श्रीगौरी सावंत यांनी बोरीवलीतील वसंत व्याख्यानमाले दरम्यान सरकारला सवाल केला आणि आम्हाला बरोबरीने वागवा, असे समाजाला साकडे घातले.

बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत’आम्ही तृतीय पंथीय आणि समाज’ या विषयावर समाजसेविका श्रीगौरी सावंत यांनी पहिले पुष्प गुंफतांना आपले मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केले. सरकारदरबारी आत्तापर्यंत स्त्री किंवा पुरुष अशीच नोंद केली जात असे. परंतु आता तृतीयपंथीय अशी वेगळी नोंद होते. मतदानाचा हक्कही आम्हाला मिळाला आहे.

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली दिला, परंतु महाराष्ट्र सरकारने आजतागायत याची अंमलबजावणी केलेली नाही. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ एकदाही तृतीय पंथीयाला मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त करीत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या सदनिकेत तृतीय पंथीयांना आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे.

तृतीय पंथीयांना केवळ भीक मागून आपली उपजिविका करावी लागते परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून श्रीगौरी सावंत म्हणाल्या,वारांगनांच्या मुलामुलींसाठी कर्जत जवळ ‘नानी का घर’ म्हणून एक आश्रम मी सुरु केला आहे,  त्यासाठी सर्वांनी मदत करावी.

 ‘ऍड आर्टस् चे संचालक उदय पै हे अजातशत्रू’   तर ‘जय महाराष्ट्रनगरच्या जडणघडणीत सुभाष देसाईंचा मोलाचा वाटा’ अशा शब्दांत ख्यातनाम माध्यमकर्मी उदय पै आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसाई यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

‘ऍड आर्टस् संचालक उदय पै हे अजातशत्रू तर आहेतच आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांनाच आपले वाटतात,’ या शब्दात दैनिक मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समुह संपादक, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी सुप्रसिध्द कलावंत उदय पै यांचा गौरव केला. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्यावतीने उदय पै यांना ‘शारदा पुरस्कारा’ने तर जय महाराष्ट्रनगरमधील सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कारा’ ने गौरवण्यात आले. पाच हजार रुपये रोख,सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह असा हा पुरस्कार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या हस्ते उदय पै यांना तर अभिजीत राणे यांच्या हस्ते सुभाष देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘उदय पै यांचे सर्व राजकीय नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत. मैत्रीला जागणारा मोठा कलावंत…’ असा उदय पै यांचा विनोद घोसाळकर यांनी गौरव केला.

सुभाष देसाई यांचा जय महाराष्ट्रनगरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असल्याचे सांगून त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच असल्याचे घोसाळकर यावेळी म्हणाले. वसंत व्याख्यानमालेदरम्यान विजय केळुस्कर यांच्या हस्ते विनोद घोसाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन साहित्यिक विजय मडव यांनी केले. उदय पै आणि सुभाष देसाई यांनी पुरस्काराची रक्कम वसंत व्याख्यानमालेस देणगी म्हणून परत दिली. या कार्यक्रमाचे वैशिष्टयपूर्ण सुत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!