सहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव ! – योगेश त्रिवेदी

महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि ‘पत्रकार’ मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना २७ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी एक वाजतां तीन पानी स्व हस्ताक्षरात लेखी पत्र दिले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना आयुष्याच्या संध्याकाळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सन्मानाने द्या, अशी मागणी केली. या पत्रानंतर त्या संदर्भातील एक विस्तृत लेख ‘आयुष्याच्या संध्याकाळी सन्मान योजना सन्मानाने द्या’ या शीर्षकाखाली मी लिहिला. हा लेख महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केला आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या व्यथेला वाचा फोडण्याचे भगीरथ कार्य सर्वच मराठी वर्तमानपत्रांनी, ऑनलाइन न्यूज एजन्सी यांनी केले. हा लेख संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गाजला. महाराष्ट्रातील असंख्य ज्येष्ठ पत्रकारांनी दूरध्वनी/भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधून मला यशस्वी भव, असे आशीर्वाद दिले. अनेकांनी आपापल्या व्यथा टपालाने, भ्रमणध्वनीवर कळविल्या. आपली बाजू कुणीतरी सरकार दरबारी मांडतोय, ही भावना व्यक्त करुन मला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आले. निवेदने पाठविली.

या सन्मान योजनेच्या माध्यमातून महिनाकाठी अकरा हजार रुपये ज्येष्ठ पत्रकारांना एक ऑगस्ट २०१९ पासून सुरु झाले. पण केवळ शंभर लोकांच्या यादीनंतर अन्य ज्येष्ठ पत्रकार मात्र या लाभापासून वंचित राहिले. त्याला कारणीभूत काही नतद्रष्ट पत्रकार आणि अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मंत्रालयातील पत्रकार कक्षात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ पत्रकार यांचा एक मेळावा घेण्यात आला होता. यावेळी माहिती खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिस्वीकृती पत्रिका, आधार कार्ड, स्वयंघोषणा पत्र घेऊन सन्मान योजना सन्मानाने देण्याची सूचना मी भर बैठकीत केली. त्याची चित्रफीत मित्रवर्य खंडुराज गायकवाड यांनी प्रसारित केली. समाजमाध्यमात ती सर्वत्र फिरली. आत्ताही ती उपलब्ध आहे. माहिती अधिकाऱ्यांनी ती सूचना योग्य असल्याचे मान्य केले. पण माहितीच्या अधिकारात कात्रणे मागविण्याचा पवित्रा काहींनी  घेताच ती बाब  अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडली. आम्ही कुणाचाही प्रस्ताव नामंजूर करणार नाही, सर्वांकडून पूर्तता करवून घेऊ आणि सन्मान योजनेचा लाभ देऊ, असे सांगणाऱ्यांचे शब्द हवेत विरले. जे आपल्या कार्यालयात जुनी कागदपत्रे सांभाळू शकत नाहीत, ते आमच्या कडून ४०/५० वर्षापूर्वी ची कात्रणे मागणार ? आमची पत्रकारिता फुकट गेली ? वाया गेली ? अशी भावना माझ्या कडे असंख्य पत्रकारांनी व्यक्त केली.

कल्याणचे वयाच्या ९७ व्या वर्षातही कार्यरत असलेले दामुभाई ठक्कर याही परिस्थितीत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवताहेत. सुभाष पाटील (जळगांव) या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या अपंग आणि ज्येष्ठ पत्रकारांनी तर सन्मान योजना देण्यात आली नाही तर आपल्याला मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी लोकायुक्तांना एक पत्रही पाठविले आहे. रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नवीनचंद्र सोष्टे, अमर करंदीकर, जळगांव चे अरुण मोरे, नांदेड चे विष्णुपुरीकर, डोंबिवली येथील अभय जोशी, अजय निकते, अशा असंख्य लोकांनी माझ्या कडे कैफियत मांडली आहे. जळगांव येथील एस.पी. कुलकर्णी, नरेंद्र नेहेते यांनीही अनेकांच्या व्यथा माझ्या कडे पाठविल्या आहेत. उद्धव ठाकरे हे आपले मुख्यमंत्री या सर्वांना वाटतात, कारण ते पत्रकारितेतील दोन दिग्गज दीपस्तंभ केशव सीताराम (प्रबोधनकार) ठाकरे यांचे पौत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र असून त्यांनी मार्मिक, सामना आणि दोपहर का सामना चे संपादक पद भूषविले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते सन्माननीय सदस्य आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वर सर्वांचे डोळे आशाळभूत नजरेने लागले आहेत. तेच आपले तारणहार आहेत, ही भावना सर्वच ज्येष्ठ पत्रकारांनी बोलून दाखविली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या द्रुष्टीने या सर्वांचा सहानुभूतीने विचार करावा. १ ऑगस्ट २०१९ पासून डिसेंबर २०२० पर्यंत ची संपूर्ण रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच ज्येष्ठ पत्रकारांना मिळवून द्यावी. आपणही वयोवृद्ध होणार आहोत, आपलीही मुलंबाळं, नातवंडं आपल्याला विचारतील. आपल्याला कुणाचीही हाय लागू नये, आपल्याला सुद्धा महिन्याकाठी दोन पाच हजार रुपये औषधासाठी लागणार आहेत. आपण कुणापुढे हात पसरु नये, सन्मानाने आपणही आपले जीवन व्यतीत करावे, हा विचार मनात ठेवावा. प्रभाकर राणे या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या आचार्य अत्रे यांच्या मराठा, निळूभाऊ खाडिलकर यांच्या नवाकाळ मध्ये काम केलेल्या, पत्रकारितेतील सुवर्णकाळ पाहिलेल्या आणि अशा असंख्य पत्रकारांना एक ते दीड लाख रुपयांपासून वंचित रहावे लागावे, ही निश्चितच भूषणावह बाब नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. नको ती खुसपटे काढण्याऐवजी सन्मान योजनेचा लाभ सन्मान पूर्वक देऊन तमाम ज्येष्ठ पत्रकारांची आयुष्याची संध्याकाळ समाधानाने व्यतीत करु द्या.

मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेल्या निवेदनाची पुन्हा एकदा माहिती येथे देत आहे. : माननीय नामदार श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महोदय, सस्नेह जय महाराष्ट्र ! आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी काही महत्त्वाच्या सूचना वजा विनंती मी आपणांस करीत आहे, कृपया त्याचा आपण सहानुभूतीने विचार करावा.

१. आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी सन्मान योजना सन्मानाने मिळावी.

२. राज्य अधिस्वीकृती समितीने जे ठराव मंजूर केले आहेत, त्यांचे शासन निर्णय (जी आर) विनाविलंब काढण्यात यावेत.

३. ६० वर्षे वय आणि ३० वर्षे अनुभव या ऐवजी ५८ वर्षे वय आणि २५ वर्षे अनुभव ही पात्रतेतील महत्त्वाची बाब असून त्याचाही शासन निर्णय (जी आर) तातडीने काढण्यात यावा.

४. कर्मचारी ५८ व्या वर्षीच सेवानिवृत्त होतो आणि मग त्याला निवृत्तीवेतन देण्यात येते, हाच मुद्दा आहे.

५. ३०/३५/४० वर्षांपूर्वीची कात्रणे सापडू शकत नाहीत. अनेकांची कागदपत्रे नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाली आहेत. वाहून गेली आहेत. त्यामुळे अधिस्वीकृती पत्रिका, स्वयंघोषणा पत्र (शपथपत्र), आधार कार्ड यावर पत्रकारांना या योजनेचा लाभ देण्यात यावा.

६. मुंबईतील पत्रकारांसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या कडून ज्येष्ठ पत्रकारांना (ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत परंतु अधिस्वीकृती पत्रिका आहे अशांसाठी) शिफारशी घेण्यात याव्यात. जिल्हा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जिल्हा पत्रकार संघांकडून शिफारशी घ्याव्यात.

या बरोबरच राज्य अधिस्वीकृती समितीची आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची तातडीने पुनर्रचना करण्यात यावी. आज राज्यात अनेक ज्येष्ठ पत्रकार आपल्या मार्गदर्शन आणि निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण अशा सर्वच ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी दिलासा द्यावा, ही नम्र विनंती.

कात्रणे सादर करण्यासाठी सगळेच पत्रकार काही दिनू रणदिवे आणि विजय वैद्य यांच्या सारखे कात्रणे आणि वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यांत रहात नाहीत अथवा राहू शकत नाहीत, हे पंढरीनाथ सावंत या मातोश्रीवर सतत वावरलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकाराच्या मताशी आपण सहमत व्हाल, अशी खात्री आहे. आपण स्वतः मार्मिक, दैनिक सामना आणि दोपहर का सामनाचे मुख्य संपादक बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून कार्यरत होतात, यासाठी आपणच सन्मान योजना ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाने मिळवून द्याल, हा विश्वास आहे.  आई तुळजाभवानी, आई एकवीरा देवी आपल्याला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य देवो, हीच प्रार्थना ! ज्येष्ठ पत्रकारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, हीच कळकळीची विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!