साधना सहकारी पतपेढीतर्फे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

वसई : वसई तालुक्यातील ख्यातनाम सहकारी संस्था म्हणून लौकिक असलेल्या साधना सहकारी पतपेढीने माध्यमिक शालान्त, उच्च माध्यमिक आणि पदवी परीक्षेत विशेष नैपुण्य संपादन करणाऱ्या ५३ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार दि.३० नोव्हेंबर २०१९ रोजी बंगली येथील लोकसेवा मंडळाचे ‘स्व.फ्रान्सिस डिसोजा सभागृह’ येथे गुगल व सेल्स लीडर चिन्मय गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे सुवार्ता मासिकाचे सहसंपादक व साहित्यिक मॉन्सि. फ्रान्सिस कोरीया यांच्या उपस्थितीत पार पडला.

पतपेढीचे चेअरमन अशोक कोलासो यांनी आपल्या प्रास्ताविकात साधना सहकारी पतपेढीच्या मागील ९ वर्षांतील उत्कर्षमय प्रगतीचा आढावा घेतला व पतपेढीने आपल्या व्यवसायात केलेल्या घोडदौडीबद्दल पतपेढीचे सभासद, ठेवीदार, खातेदार व सर्व सेवकवर्गाचे आभार मानले. आज साधना पतपेढी आपल्या खातेदारांना सर्व अत्याधुनिक संगणकीय सेवा पुरवीत असून पतपेढीने आपल्या व्यवसायावर स्वत:हून नियंत्रण ठेवले असून उत्तम व चोख व्यवहार करण्याकडे कटाक्ष ठेवल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुणे मॉन्सि. फ्रान्सिस कोरीया यांनी पतपेढीच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल अध्यक्ष अशोक कोलासो व सर्व संचालकांचे अभिनंदन केले व गुणी विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात उत्तम यश मिळवून आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की आपल्या जीवनात विद्यार्थ्यांनी मूल्ये जपणे महत्त्वाचे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधतानाच समाजासाठीही योगदान द्यावे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो लिखित ‘नाही मी एकला’ या पुस्तकात प्राथमिक शाळेत असताना ज्या शिक्षिकेने त्यांना घडविले आहे त्यांची प्रशंसा केली आहे. आपणही ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडविले आहे, त्यांची सदैव आठवण आपल्या अंतर्यामी जपून ठेवली पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चिन्मय गवाणकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करताना निवडलेले क्षेत्र त्यांच्या आवडीचे असले पाहिजे. त्यामुळे त्यांना पुढील आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होत असतो. समाजातील आत्मसन्मान सांभाळून आपली प्रगती साधायची असल्यास आपली नैतिक मूल्ये सांभाळली पाहिजेत. जीवनात एक निश्चित ध्येय बाळगून त्या दिशेने वाटचाल करा. आयुष्यात निर्भय यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने उच्च शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगले पाहिजे. तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे, परंतु पाच वर्षांनी ते असेल किंवा नाही हे सांगता येत नाही. व्यवसाय करताना पैसा व माणसे सांभाळावी लागतात. त्यामुळे मानसिक ताण येतो. परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका. प्रत्येक अनुभव हा महत्त्वाकांक्षी आहे. विद्यार्थ्यांतर्फे मनोगत कु.ऍबीरोझ बार या विद्यार्थिनीने केले.

पाहुण्यांची ओळख पतपेढीचे संचालक विन्सेंट आल्मेडा व नील कुटिनो यांनी करून दिली. तसेच जोजेफ मच्याडो व थॉमस परेरा यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नॅप डिसोजा, महाव्यवस्थापक आर्थर कुटिनो यांनी पारितोषिक वाचन केले. तसेच पारितोषिक वाटप अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, संचालक आल्बर्ट अथाईत, विन्सेंट आल्मेडा व संचालिका सौ. इस्प्रान्स नॅप डायस यांनी केले. आभार प्रदर्शन पतपेढीचे व्हा. चेअरमन लेस्ली डिसिल्वा यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन संचालक फ्रान्सिस मिस्किटा व सौ.सिल्वी परेरा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: