सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळाचा आठवा महोत्सव गुरूवारी नंदाखाल येथे

संस्कृती जतनासाठी वीस हजारांहून अधिक समाजबांधव एकत्र येणार

वसई (मनीष म्हात्रे) : वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळातर्फे आठवा कुपारी संस्कृती महोत्सव गुरूवारी २६ डिसेंबर रोजी नंदाखाल येथील स्व.फा.बर्नड भंडारी संकूलात संपन्न होणार आहे. या महोत्सवानिमीत्त भव्य संस्कृती दिंडी काढण्यात येणार असून,विस हजार सामवेदी ख्रिस्ती कुपारी समाजबांधव हजेरी लावणार आहेत.

 या कुपारी महोत्सवाची संस्कृती दिंडी संध्याकाळी ४:३० वाजता विरार पश्चिम येथील अब्राहम नाका येथून सुरू होणार असून हि दिंडी नंदाखाल येथील स्व.फा.बर्नड भंडारी संकूलापर्यंत निघणार आहे. या महोत्सवाचे अध्यक्ष रेव्ह.फा.जॉन्सन मिनेझिस हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सिस्टर मीना डायस तसेच विशेष मान्यवर रेव्ह. फा.रॉबर्ट डिसोझा, फा.थॉमस डिसोझा, कॅथॉलिक बॅकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस, जिम रॉड्रीक्ज आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी समाजाच्या पाशीहार अंकाचे प्रकाशन,कुपारी दिनदर्शिका प्रकाशन,गुणवंतांचा सत्कार तसेच धम्माल कुपारी डान्स, कुपारी गीत-संगीत, कुपारी बँड, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम व लहान मुलांसाठी बालजत्रा, कुपारी फूड फेस्टिव्हल व लकी-ड्रॉ लॉटरी बक्षिसांची लयलूट असणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

 कुपारी संस्कृती महोत्सवासाठी हायटेक तरूणाई गेल्या महिनाभर आधीपासून वेगवेगळया समित्याद्वारे मेहनत घेत आहेत. सामवेदी बोलीभाषा आणि संस्कृती टिकून रहावी म्हणून आठ वर्षापूर्वी समाजातील उच्च शिक्षित तरूणांनी एकत्र येऊन याची सुरूवात केली. मुळात शेती, बागायती आणि दुभदुभत्याचा व्यवसाय करणारा हा शेतकरी समाज. सामवेदामुळे संगीत हा या समाजाचा स्थायी भाव.पूर्वी रहाटाच्या पाण्याने शेती बागायतीचं  शिंपण व्हायचं, दांडातून पाणी जायचं त्यावर, किंवा नवरदेवाला सजविण्याची वेळ असू द्या. सर्वत्र सामवेदी संस्कृती आणि त्याच कृषी संस्कृतीतून आलेली प्रतिकं दृष्टिस पडायची. धोतर, सदरा, काळं जॅकेट आणि त्यावर लाल टोपी हा पुरूषांचा पेहराव तर लाल लुगडं आणि पोवळयांचा दाागिना हा स्त्रियांचा साजश्रृंगार. कोकणीच्या जवळ जाणारी मराठी भाषेची बोलीभाषा असलेली सामवेदी बोली अशी हया समाजाची ओळख होती. तोच समाज मागील पन्नास वर्षात प्रचंड नागरीकरण व आधुनिकीकरणामुळे आमूलाग्र बदलून गेला.आपल्या जन्मजात भाषेची आता लाज वाटू लागली. मात्र, त्याविरोधात काही वर्षांपासून जनजागरण होत असून पुन्हा मुळाकडे जाण्याचा प्रयत्न हा समाज करीत आहे.

आमच्या बोलीभाषेचा आम्हाला अभिमान आहे. आमची संस्कृती मोलाची आहे म्हणूनच संस्कृतीचा गौरव करण्यासाठी तरूण पुन्हा एकत्र आले आणि त्या निमित्ताने जो महोत्सव साजरा होत असतो त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असतो. संस्कृती दिंडीने कुपारी महोत्सवाची सुरूवात होते. पारंपारिक वेषात संपूर्ण समाज एकत्र येतो. दिंडीच्या मध्यभागी बैलगाडी असते. हा एका अर्थाने तो कृतज्ञता सोहळाच असतो. कारण बैलाच्या श्रमावरच समाजाचं भरणपोषण झालेलं आहे. महोत्सवात सांस्कृतिक चित्रे व वस्तूंची प्रदर्शनं आयोजित केली जातात.सामवेदी ख्रिस्ती संस्कृतीचे मनोहारी चित्र या महोत्सवात आपल्याला पहायला मिळते. जिवंत रहाट, जुनी भांडी, जाते, शेतीची हत्यारे , ग्रामीण संस्कृती या निमीत्ताने पहायला मिळणार आहे. खाद्यजत्रा हे तर महोत्सवाचं विशेष आकर्षण असते. सामवेदी समाजाचे अनेक वैशिष्टयपूर्ण खादयपदार्थ येथे पाहायला मिळतात. सोहळयाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे प्रत्येक वर्षी समाजातील गुणवतांचा येथे सन्मान करण्यात येतो. नाताळानंतरची दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ संपूर्ण समाज एकत्र येतो आणि आपली भाषा व संस्कृतीचा गौरव करतो हि अपूर्व घटना असते. हा जरी एका समाजाचा उत्सव असला तरीही पाहुण्यांना येथे मुक्तद्वार असते. या, पहा, अनुभव घ्या आणि येथून प्रेरणा घ्या हीच आयोजकांची भूमिका असते. संपूर्ण तरूणाई महिनाभर आधीपासून वेगवेगळया समित्यांद्वारे कामाला लागलेली असते. कुपारी संस्कृती महोत्सव म्हणजे एक आनंदसोहळा असतो.

हा महोत्सव सुरू होऊन संपेपर्यंत प्रत्येकजण एक दुसऱ्यांनी आपल्या मूळ बोलीभाषेतूनच संवाद साधत असतो. बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृती प्रदर्शन दालन, कृपारी फूड फेस्टीवल,पाशीहार या महोत्सव अंकाचे प्रकाशन आदि कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!