‘साहित्य जल्लोष’ सोहळयात सौ. सुमेधा वाळींजकर यांच्या ‘हसरी वेदना’ या कथा संग्रहाचे प्रकाशन संपन्न

विरार (वार्ताहर) : विवा कॉलेज विरार येथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य जल्लोष या साहित्यिकांच्या सोहळयात वसई तालुक्यातील सुप्रसिध्द लेखिका सौ. सुमेधा शांताराम वाळींजकर यांच्या ‘हसरी वेदना ‘ या कथा संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक आणि आगामी अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गंजवी यांच्या हस्ते पार पडली. यावेळी बोलतांना जेष्ठ साहित्यिक प्रेमानंद गंजवी यांनी असे सांगितले की, ”व्यापक प्रबोधन वा लोकशिक्षण आणि भाषा वैभव संवर्धन असा व्यापक विचार साहित्य निर्मितीच्या मुळाशी असतो, असा व्यापक किंवा वैश्विक हेतू असणारे साहीत्य टिकते. शिवाय हा हेतू लेखकांची प्रतिभा सतत जागी ठेवते यातूनच प्रतिभावंत साहित्यिक घडतात. भाषेचे सौष्ठव कायम राहते.”

यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिका महापौर प्रवीण शेट्टी, ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो, विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव अपर्णा पंकज ठाकूर, साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍंड्रयू कोलासो, फा.मायकल, अजीव पाटील, संजय पिंगुळकर, डॉ.भारती देशमुख, संगीतकार राहुल रानडे, दत्तात्रय देशमुख, प्रकाश वनमाळी, जेष्ठ प्रकाशक अशोक मुळये, वि.वा.कॉलेजच्या प्राचार्य प्राजक्ता परांजपे, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते शांताराम वाळींजकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनने प्रकाशित केला आहे.

साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई-विरार महानगरपालिका, ग्रंथालय विभाग आणि विवा कॉलेज यांच्यातर्फे साहीत्य जल्लोष-२०१९ या साहित्य आणि सांस्कृतिक सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!