सीमोल्लंघन, मेळावा, साई समाधी शताब्दी आणि ओसंडून वाहणारा उत्साह ! – योगेश वसंत त्रिवेदी

विजया दशमी !  
    दसरा !! साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त. आपल्या भारतात वर्षानुवर्षे अत्यंत उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो. नवरात्रीचे नऊ दिवस आदिशक्तीची पूजा बांधून मग विजया दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यात येते. सोने लुटण्यात येते. वर्षानुवर्षाची ही परंपरा आहे. या दिवशी रावणाचे दहन पण करण्यात येते. धम्मचक्र प्रवर्तन दिन पण साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजया दशमीला होणारे पथ संचालन, शस्त्र पूजन आणि सरसंघचालका़चे मार्गदर्शन नागपूरला होते तर याच दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्या पासून तर आता मोहन भागवतांपर्यंतचे सरसंघचालकांचे विजयादशमीच्या मेळाव्यात मार्गदर्शनाची जशी परंपरा आहे. तद्वतच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जन्माला आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची शिवसेना उत्साहात दसरा मेळाव्यात तमाम शिवसैनिकांना विचारांचे सोने लुटण्यासासठी प्रवृत्त करते. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली, तरी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थावर संपन्न झाला होता. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी `शिवसेना’ हे नामकरण करुन `आज मी हा बाळ या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे’ असं 30 ऑक्टोबरच्या पहिल्या दसरा मेळाव्यात जनसागरासमोर सांगितलं. विजय वैद्य यांनी आजवरच्या सर्व दसरा मेळाव्यांचा परामर्श घेतला आहेच. विजय वैद्य यांनी सर्वप्रथम 1966 साली शिवसेना स्थापन होणार ही बातमी निळूभाऊंकडे दिली होती आणि त्यांनी ती `नवाकाळ’ च्या पहिल्या पानावर प्रसिध्द केली होती. तेंव्हा बाळासाहेबांनी सुध्दा आश्चर्य व्यक्त करुन विजय वैद्य यांचे कौतुक केले होते. 1966 पासून एखाद दोन अपवाद वगळता सातत्याने दसरा मेळावा उत्साहात पार पडत आला आणि दिवसेंदिवस उत्साह वाढतच आहे. बॅ. रामराव आदिक, शरद पवार, जॉर्ज फर्नांडीस, शरद जोशी आदींनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचे साक्षीदार होणे पसंत केले आहे. या नेत्यांनी दसरा मेळाव्यातून हजारो लोकांना संबोधित केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे लाखो शिवसैनिक या महाराष्ट्रात असल्यामुळे शिवसेनेला ही एक प्रकारे संजीवनीच म्हणावी लागेल. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाल्यानंतर गेल्या 6 वर्षात उध्दव ठाकरे यांनी ही दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. 2014 चा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी बोरीवलीच्या कोरा केंद्र मैदानात झाला होता आणि त्याला विधानसभा निवडणूक प्रचाराचे /प्रचारसभेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
    18 ऑक्टोबरचा दसरा मेळावा महाराष्ट्रात आगळा वेगळा ठरला. हा एक नव्हे तर 4 दसरा मेळावे महाराष्ट्राने या दिवशी पाहिले.
    सर्वात पहिला दसरा मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संपन्न झाला तो नागपूर पासून पनवेल पर्यंत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापासून तर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनापर्यंत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक मुशीतून भारतीय जनसंघ भारताच्या राजकीय क्षीतिजावर आला आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आणि इंदिरा गांधी यांच्या आणिबाणीमुळे स्थापन झालेल्या 4 पक्षांच्या जनता पार्टीत भारतीय जनसंघ विलीन झाला. पण कपाळकरंट्या काही नतदृष्टांनी दुहेरी निष्ठेचा मुद्दा उपस्थित करुन या दुहेरी निष्ठेच्या खडकावर जनता पार्टीची बोट फुटली आणि अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदींनी 1980 साली 6 एप्रिल ला मुंबईत भव्य मेळावा भरवून भारतीय जनता पार्टीचे पुनरुज्जीवन केले. 2 खासदारांच्या एकेकाळी म्हणवला जाणारा भाजपा आज 282 खासदार घेऊन लोकसभेत सर्वाधिक मोठा पक्ष ठरत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ताशकट घेता झाला. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगण्यावरुन चालतो, मोदी सरकार हे संघाच्या आदेशावरुन कार्यरत आहे, अशा आरोपांची राळ विरोधी पक्ष उडवीत असला तरी मोहन भागवत यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी हे दोघे स्वतंत्र अस्तित्व असलेले आहेत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
    सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुस्थानातील तमाम हिंदुंच्या भावना या दसरा मेळाव्यातून व्यक्त करतांना मोदी सरकारने अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या निर्माणासासठी कायदा बनविण्याचे आणि हा कायदा बनवून मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या जागेवर रामाचा जन्म झाला होता हे सिध्द झाले असल्यामुळे आणि लोकसभा राज्यसभा ही कायदेमंडळे यासाठी कायदा बनविण्यास सक्षम असल्यामुळे तसा कायदा करण्याची गरज भागवतांनी बोलून दाखविली.
    नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जी भावना व्यक्त केली त्याबद्दल महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत शिवतीर्थावर उध्दव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करुन तोच धागा पुढे धरुन राममंदिर उभारणीवर जोर देत जय श्रीराम चा नारा दिला आणि अयोध्येच्या राममंदिर न्यासाचे अध्यक्ष जनमेजयशरण महाराज यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन तमाम शिवसैनिक आणि हिंदुबांधवांसोबत आपण अयोध्येत 25 नोव्हेंबर रोजी येत असल्याचे घोषित केले. शिवतीर्थावर आजवर बाळासाहेबांची गर्जना होत असे तद्वतच ही उध्दव ठाकरे यांचीही गर्जना होती. जनसागराच्या भावना व्यक्त करणे त्यांच्या भावनेला हात घालणे आणि त्यांच्याच भावना आपण जाहीरपणे बोलत आहोत हेच तर उध्दव ठाकरे यांनी दाखवून दिले होते. त्याचबरोबर शिवसेना केंद्रात मोदी सरकारमध्ये आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये असली तरी आपण जनतेसोबत आहोत हेही उध्दव ठाकरे यांना दाखवून द्यायचे असल्याने दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर आल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, असा इशाराही देणे आवश्यक होते. देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष असल्याने दोघांचे विचार, दोघांची भूमिका भिन्न असणारच आणि तसे नसते तर हे दोन्ही पक्ष एक झाले नसते का? पण आमची युती ही नैसर्गिक आणि हिंदुत्वाच्या वैचारिक आधारावर आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच केले असल्याने उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मांडलेली भूमिका देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षितच म्हणावी लागेल. `  मॉब सायकॉलॉजी’ हाही भाग महत्त्वाचा आहे. उध्दव ठाकरे हे सत्तेतील वैधानिक पदावर नसल्याने त्यांना बोलण्याबाबत बंधन कुणी घालू शकत नाही आणि सुभाष देसाई व रामदास कदम हे मंत्री असले तरी पक्षाच्या व्यासपीठावर त्यांना शिवसैनिकांसमोर जे बोलणे आवश्यक होते तेच ते बोलले त्यामुळे प्रसार माध्यमे किंवा विरोधी पक्षांनी जर टीका केली तरी ते त्यांची जबाबदारी पार पाडताहेत असेच म्हणता येईल.
    महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही दसरा मेळावा गाजवला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची ही जबरदस्त वारसदार गोपीनाथरावांच्या पश्चात चांगला वारसा चालवित आहे आणि गोपीनाथरावांचे श्रध्दास्थान असलेल्या भगवान बाबांचे भव्य स्मारक पंकजाताईंनी सावरगांव या भगवान बाबांच्या जन्मगावी उभारले व समस्त अनुयायांसमोर खासदार भगिनी प्रीतम समवेत जे शक्तीप्रदर्शन केले तेही तितकच जबरदस्त होते आणि पंकजाताईंनी या सावरगांवच्या दसरा मेळाव्यात `मी गोपीनाथरावांची लेक आहे’, वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येणार ! गोपीनाथराव किंग मेकर होते तशी मी सुध्दा किंग मेकर आहे आणि मला पदाची कोणतीही लालसा नाही, हे दणक्यात सांगुन इथे सर्वे प्रमाणे नाही तर व्यक्ती बघून तिकिट दिले जाते असे जाहीर वक्तव्य केले. ही सावरगावात जमलेल्या हजारो लोकांची भावना होती. हा सुद्धा मॉब सायकॉलॉजीचाच भाग म्हणावा लागेल. त्यामुळे मोहन भागवत, उध्दव ठाकरे आणि पंकजा मुंडे या तिघांच्या दसरा मेळाव्यातून भाजपा प्रणित सरकार विरोधाचा `वास’ हुंगण्याचा प्रयत्न कुणी करु नये, हेच खरे.
    चौथा दसरा मेळावा हा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमीवर संपन्न झाला. हा दसरा मेळावा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहोळा होता आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर या विकासासाठी निधी कमी पडू न देण्याची ग्वाही दिली आणि  40 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्याचा धनादेश दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला सुपूर्द केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापोर नंदा जिचकार, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, डॉ. राजेंद्र गवईं पासून सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
    शिर्डी येथे श्री साईबाबा यांनी समाधी घेतल्याच्या घटनेला बरोबर शंभर वर्षे झाली. त्यानिमित्त शिर्डी येथे समाधी शताब्दीचा भव्य सोहोळा सुरु आहे आणि या सोहोळ्याला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबांचे आशिर्वाद घेतले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सर्व मंत्री, साईबाबा देवस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे आणि सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत देवदुर्लभ सोहोळा संपन्न होतानाच पंतप्रधानांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला. बोरीवलीचे साईभक्त पंकजभाई ओझा व प्रतिभा ओझा यांच्यामुळे, अजय महाडिक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका बोरीवलीच्या कोरा केंद्र मैदानावर साई भक्तांना दर्शनासाठी आणल्या होत्या. त्याचा आम्हालाही दर्शनाचा लाभ घेता आला. तीन दिवस चाललेल्या या पादुका दर्शन सोहाळ्यामुळे हजारो भक्त भाविकांना मुंबईत शिर्डी अवतरल्याचा अवर्णनीय आनंद उपभोगता आला. दादरच्या शिवाजी पार्कवर ही गेल्या 15 ऑक्टोबरला हाच सोहळा मुंबईकरांना अनुभवता आला.
    `सबका मालिक एक’ आणि `सबका साथ सबका विकास’ यासाठी श्रध्दा आणि सबुरी महत्त्वाची आहे. अर्थात, सूज्ञांस अधिक सांगणे न लगे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!