सोनसाखळी चोरांना धडा शिकवा – गौरव सिंह

नालासोपारा, दि. २७ (प्रतिनिधी) : वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसवा, त्यांना पकडणे सोपे जावे यासाठी पालघर पोलिसांनी नागरिकांनाच सहकार्याचे आवाहन केले आहे. सावध रहा, सतर्क रहा सोनसाखळी चोरांना धडा शिकवा, असे आवाहन पालघरचे पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांनी केले.
वसई तालुक्यात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोटरसायकल वरुनच नव्हे तर पायी चालत येऊनही सोनसाखळी चोर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरुन नेत असल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी पोलीस आपल्या परिने उपाय योजना करत असतातच, पण लोकसंख्या, गुन्ह्याचे प्रमाण आणि पोलीस बळ लक्षात घेता पोलिसांना या गुन्ह्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात असल्याने पालघरचे पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांनी नागरिकांनाच हुशार आणि धाडसी बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी वसई येथील वर्तक सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पोलीस अधिक्षक गौरव सिंह, वसईचे अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, खासदार राजेंद्र गावित, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती सुदेश चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सोनसाखळी चोरी हा रस्त्यावर घडणारा गुन्हा आहे. या गुन्ह्यात घट व्हावी, म्हणून एक कॅमेरा शहरासाठी लावा, असे आवाहन आम्ही नागरीकांना केले आहे. आम्ही स्वत: नवीन 32 कॅमेरे लावले असून 100 पेक्षा अधिक लोकांनी (व्यापारी सोसायटी व तत्सम) आपले कॅमेरे रस्त्याच्या दिशेने वळविले आहेत. त्यामुळे काही ठिकाणचे सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे शक्य झाले आहे, असे अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत पाटील यांनी सांगितले. सीसीटिव्ही कॅमेर्‍याबरोबरच पोलीस मित्र तयार करण्यावर आम्ही भर दिला आहे. आत्तापर्यंत 850 पोलीस मित्रांची नोंद झाली असून किमान 10 हजार पोलीस मित्र बनविण्याचा आमचा संकल्प आहे. सोनसाखळी चोर आणि बोगस पोलीस चोरांना पकडण्यासाठी आम्हाला त्यांचे सहकार्य होईल, असा विश्‍वासही विजयकांत सागर यांनी व्यक्त केला आहे.
चोर हा सावज आणि जागा शोधत असतो. रस्त्यावरुन चालताना महिला बेसावध असतात आणि त्याचाच फायदा हे सोनसाखळी चोर घेतात आणि भरधाव येऊन त्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन नेतात. त्यामुळे महिलांनी रस्त्यावरुन चालताना सावध रहावे, अंगावर घातलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन न करता ते कपड्याच्या आड ठेवावे. आपल्या आजूबाजूला संशयास्पदरित्या ये-जा करताना मोटरसायकल स्वार किंवा पायी चालणारा दिसल्यास सावध भुमिका घ्यावी, त्यातून सोनसाखळी चोराने गळ्यातून चेन खेचलीच तर चोर-चोर म्हणून आरडा ओरडा करावा किंवा 100 नंबरवर फोन करुन माहिती द्यावी, असे सागर यांनी सांगितले. शक्य तो चोराच्या गाडीचा नंबर, त्याने परिधान केलेले कपडे, अंगावर एखादी खूण असल्यास त्याचे वर्णन पोलिसांना द्यावे जेणे करुन आम्ही त्वरित नाकाबंदी करुन त्याला पकडू शकू असे ही सागर यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, सभापती सुदेश चौधरी यांची भाषणे झाली. वालीवचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी उपस्थितांना वाटप करण्यात आलेल्या माहिती पत्रिकेचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसईच्या पोलीस विभागीय अधिकारी डॉ. अश्‍विनी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात पोलिसांनी विविध पोलीस स्टेशन हद्दितील 27 गुन्ह्यातील 14 लाखांचा ऐवज परत केला. यावेळी सायबर सेलचे पोलीस अधिकारी प्रशांत यांनी सायबर गुन्हे आणि त्यापासून कसे सावध रहावे याची माहिती दिली. 
गेल्या पाच वर्षात वसई तालुक्यात झालेल्या सोनसाखळी चोरीचा आराखडा
सन  – गुन्ह्याचे प्रमाण
2014   – 123
2015  – 132
2016  – 97
2017  – 100
2018  – 132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!